कृतज्ञता

      अल्जेरियांहून परततांना घेतलेल्या भेट-वस्तुंना मी शोभिवंत कागदात बांधत होते. ह्यांनी मोजायला सुरुवात केली, हे ह्यांच्या बहिंणींसाठी, हे लेकीसाठी, हे जावयासाठी, हे लेकीच्या सासूबाईंसाठी..................!!!        

एका अगदी नीटनेटक्या रंगीत कागदात बांधलेल्या वस्तूवर हात ठेवून ह्यांनी विचारलं अग हे कोणासाठी? यावर नाव पण नाही लिहील आहेस. मी त्यावर हळूच हात फिरवला आणि म्हटल, "हे, हे ना रंजनासाठी", त्या धुणी-भाडी करणाऱ्या बाईसाठी, इतक्या छान कागदात बांधून वगैरे! आता तू तीला अगदी साग्रसंगीत हळदी-कुंकू लावून, पाठीवर हात फिरवून हातात देणार, होय ना? " असं म्हणून हे खूप वेळ हसत होते. त्या वस्तुवरून हात फिरवता-फिरवता माझ्या डोळ्याच्या कडा मात्र पाणावल्या. अल्जेरियाला मी एकटीच येणार होते त्या पंधरा दिवसातल्या सगळ्या घटना डोळ्यासमोर तरळून गेल्या. 

       ह्यांना कंपनीने प्रोजेक्टसाठी डेप्युटेशनवर अल्जेरियाला पाठवलं, माझ्या व्हिसाच काम होताच मी ही तिकडे जायच अस ठरल, पेपरवर्क होता होता तीन महीने गेलेत, माझा अल्जेरियाला यायचा दिवस नक्की झाला. ज्यादिवशी ह्यांचा फोन आला त्यानंतर फक्त पाचच दिवस उरले होते. त्यात सगळी तयारी एकटीने  करायची, सगळी पीठं दळून आणायची, भाजणी, मेतकूट, मसाले, हे आणि ते......! सगळे नातेवाईक डोंबिवलीत होते, पण सगळे त्यांच्या व्यापात इतके मग्न, की मला मदत करायला येणं शक्यच नव्हते. विमानाचा फार मोठा प्रवास एकटीने करायचा या विचाराने हातापायातले त्राणच गेले होते. निघायच्या दिवशी सगळे भेटायला येत होते, त्यांच्या सततच्या सुचनांनी मनावरच दडपण आणखीनच वाढले होते.   जातांना जेवून निघायचे होते, पण तेवढी पोळी-भाजी करायलाही सवड होत नव्हती. पाच तासच उरले होते. एक अगदी जवळची नातेवाईक आली होती खुप वेळ गप्पा मारत होती, घडयाळाचा काटा पुढे पुढे सरकत होता, मनावरच दडपण वाढत होतं. जे नातेवाईक विमानतळावर सोडवायला येणार होते, त्यांना फोन केला तर निरोप ऐकण्यात त्यांचा काहीतरी गोंधळ झाल्यामुळे त्यांना आज निघायचे हे माहितच नव्हते. हे अल्जेरियाला प्रोजेक्टसाठी आलेत त्या दरम्यान भारतात मी एकटीच होते, एकच मुलगी, तीचं नुकतच लग्न झालेलं, तिच्या जाण्याने मन आधीच उदास झालेलं, ह्यांनी निघतांना त्यांच्या मोठया भावाजवळ राहणाऱ्या आईला खुप विनवल, "आई, घरात ही एकटीच आहे, तेव्हा तु तिच्या जवळ रहायला ये", इतर अनेक वेळा त्यांच्याकडे येऊन राहणाऱ्या त्यांच्या आईने यावेळेस मात्र नाही सांगितल. ह्यांच्याअगदी जवळच्या नात्यातली एकजण तर प्रवासाच्या शुभेच्छाचा फोनही करायला विसरली. 

    गेले तीन महिने ’ती’ सतत माझ्या बरोबर होती, ताई जेवल्यांत की नाही? बरं वाटत नाही कां?, चला मी दवाखान्यात येते तुमच्याबरोबर, करमत नाही का?, मग संध्याकाळी येऊन बसते तुमच्याशी गप्पा मारायला, असं सारख चाललं होतं तीच. जायच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता आली, सगळा फ्रिज आवरला. मी येणाऱ्या जाणाऱ्याशी बोलण्याच्या गडबडीत होते, सगळे गेले, मी घरभर फिरले तर सगळ घर निटनेटके आवरून ठेवले होते, सगळ्या फर्निचरवरती चादरी टाकल्या होत्या खाली गालिचावर बसून ती माझ्याकडे बघून हसत होती, तीच्या काळ्या चेहेरऱ्यातून दिसणारे पांढरेशुभ्र दांत आणि तीच हसण खुप जवळच वाटल मला. माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली " बसा ताई जरा शांत, केंव्हाच्या तडतड करता आहात, हा चहा घ्या, मी पोळी-भाजी करणार, आज बाहेर जेवायला गेला आहात अस समजा आणि माझ्या हातच जेवा".

    तीच्या हातच जेवतांना माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. जवळच कोण आणि दुरच कोण असा संभ्रम निर्माण करणारा होता तो क्षण!!!  कोण होती ती? काय होतं तीच माझ नातं? तीच्यासाठी होती ती सुंदर कागदात बांधलेली मौल्यवान भेटवस्तू!!! तीच्या माझ्यातल्या अनामिक नात्याला कृतञतेचा सलाम होता तो!!!.
                              
                                                  *********************************