जावळ ते टक्कल

         माझ्या थोरल्या बहिणीच्या नातवाच्या जावळासाठी अमेरिकेत जाणे शक्य नसले तरी मी अमेरिकेतच असताना
जावळ काढायचा तिच्या मुलीने घाट घातला म्हटल्यावर मला जाणे भागच होते.नाही म्हटले तरी माझ्या
बारशाच्या घुगऱ्या तिने खाल्ल्या होत्या,त्यामुळे तिला एवढा मान द्यायलाच हवा होता.
     नातवाच्या डोक्याला कसलीही इजा न होता जावळ काढणे या विषयावर नेहमीप्रमाणेच चर्चेच्या अनेक फेऱ्या पार
पडल्या.मी मात्र मनाने अजून त्या जुनाट काळातच वावरत असल्याने "त्यात काय एवढे माझ्या हातात कात्री द्या मीच काढतो जावळ."असे म्हटल्यावर ताईने एक असा कटाक्ष माझ्याकडे फेकला की त्या कात्रीने ती माझ्या जिभेचाच शेंडा उडवतेय की काय अशी भीती वाटू लागली.पण त्या चर्चेचा शेवट अनपेक्षितपणे माझ्या भाचीनेच केला.
"हे बघ मामा ही अमेरिका आहे इथ प्रत्येक गोष्ट शिस्तीत करावी लागते.मी मार्शाची अपॉइंट्मेंट एक महिन्यापूर्वीच
घेऊन ठेवली आहे"इति माझी भाची
"आता ही मार्शा कोण?ती काय जावळ काढण्यातली तज्ञ आहे की काय?"
" हो तसेच म्हण म्हणजे ती इतक्या हळुवारपणे केस कापते की आमच्या पिट्टूला कळणारही नाही की त्याचे केस कुणी काढतय"
   जावळ काढण्यासाठी नाभिकाला घरी बोलावण्यात येईल अशी माझी कल्पनाही खोटी ठरली मार्शाचे मोठे सलून होते
त्याला किड्स कट असे नाव होते.वातानुकूलित तर होतेच,शिवाय लहान मुलाना गुंतवून ठेवणारी हरतऱ्हेची खेळणी
तिथे होती.आम्ही सगळे पिट्टूला घेऊन तेथे गेलो. माझ्या भाचीने नावाजलेली मार्शा  म्हणजे एक गोड दिसणारी
आणि बोलणारी तरुणीच होती.आमच्या नातवाला तिने तिच्या खास खुर्चीत बसवले.ती आता आपल्यावर काही
शस्त्रप्रयोग करणार आहे अशी कल्पनाही तिने त्याला येऊ दिली नाही,त्याच्यासमोरच्या खुर्चीच्या भागावर बरीच खेळणी
ठेवून त्यात तिने त्याला अशा खुबीने गुंतवले की आपल्या केसांवर काही अत्याचार होत आहे याची त्या बिचाऱ्याला
कल्पनाही आली नाही.शिवाय सर्व मंडळींचे फोटोसेशन चालूच होते.अगदी शांतपणे तासाभराचा तो कार्यक्रम पिट्टूला
मुळीही न दुखवता पार पडला आणि तो न रडल्याबद्दल ताईने त्याचे मनापासून कौतुक केले.
" बघ हा पिट्टू, जराही रडला नाही. नाहीतर तू,तुझ्या जावळाला सगळ घर डोक्यावर घेतल होतस,अगदी बॅंडचा
आवाजही तुझ्या आवाजापुढे फिक्का पडला.
"अग ताई अशी मार्शा माझ्यासाठी आणली असतीस तर मी रडलो तर नसतोच उलट दररोजच जावळ काढायला
जाऊया असा आग्रह धरला असता" मी ताईला म्हणालो हे उद्गार माझ्या बायकोच्या कानावर पडणार नाहीत याची
काळजी घेण्याचा माझा प्रयत्न यशस्वी ठरला नाही आणि तिने " मग आता तुम्हीही घ्या की करून उरलेल्या केसांचे
जावळ मार्शाकडून"अशी माझी संभावना केलीच. .
   आणि मग माझ्या जावळाची दु:खद आठवण मला झाली.तेव्हांपासूनच तोच आमच्या कुटुंबाचा पिढीजाद प्रसिद्ध
बजरंग न्हावी माझ्या डोक्यावर आरूढ झालेला असणार याविषयी मला खात्री आहे. आजकालच्या सुधारित तंत्राने
केस कापणाऱ्या दुकानाच्या तुलनेत बजा अर्थात बजरंग न्हाव्याचा सगळाच पुरातन थाट.अगदी त्याच्या दुकानाच्या
नावापासून ! त्याच्या दुकानाचे नाव सरळ सरळ केस कापण्याचे दुकान असे होते अमेरिकन दुकानांच्या नावाच्या
सरळसोटपणाच्या या एका बाबतीतच फक्त त्याच्या दुकानाची तुलना होऊ शकत होती.
    त्याच पाटीवर खाली प्रो. हे प्रोप्रायटरचे लघुरूप असले तरी बजाला ते प्रोफेसर या शब्दाचे आहे असे वाटे आणि
माझी मान आवळून मग प्रोफेसरचे लेक्चर चालावे तसे त्याच्या मशीनपेक्षाही वेगात त्याचे तोंड चाले.त्याच्या
दुकानाइतकीच पुरातन त्याच्या दुकानातली खुर्ची होती आणि त्यात कधी काळी असणारा काथ्या बाहेरील अभ्र्याचा पार
निकाल लागला असल्याने बाहेर डोकावून त्यावर बसणाऱ्याच्या पार्श्व्बागाचे चिमटे काढत असे. त्याचे मशीन चालण्यापेक्षा
खरे तर कुरकुरच जास्त करी आणि त्यात माझ्या केसांचे पुंजके कापले न जाता अधिकतर ओढून तोडलेच जात त्याचाच
खरे तर मला त्रास जास्त होई.मशीन नीट चालत नसे म्हणून त्याने कात्रीचा आधार घेतल्यावर मला जरा थोडे बरे वाटते
न वाटते तोच त्या कात्रीचीही धार कमीच असल्याने कसेबसे कापले गेलेले केसांचे पुंजके खाली न पडता मानेला गुंडाळलेल्या
फाटक्या कापडातून आत शिरून लडिवाळपणे मानेशी खेळ करू लागत आणि अशा प्रकारे केस कापणाऱ्याच्या सर्वांगाशी केसांचा
प्रेमळ संवाद घडू लागे आणि त्यामुळे मान,कंबर आणि शरीराचे इतर भागही खाजवण्यासाठी बोटे शिवशिवू लागत
मात्र बजाच्या मगरमिठीत सापडल्याने कुठलीही हालचाल शक्य नसे.
    अशा संकटास महिन्याकाठी कमीतकमी एकदा तरी मला तोंड द्यावे लागे.तरी त्यातल्या त्यात माझ्या काही इतर मित्रांच्या
तुलनेत माझी स्थिती बरी होती. कारण त्याना तळ्याकाठी धोकटी घेऊन बसणाऱ्या गुंडू न्हाव्याच्या वस्तऱ्याला तोंड (नव्हे डोके)
द्यावे लागे आणि वस्तऱ्याच्या कमीतकमी फटकाऱ्यात डोक्याचे मैदान साफ करण्याचा धडा गुंडूने चीपर बाय डझन वाल्या
गिलबर्थकडून घेतला असावा.त्यामुळे वस्तऱ्यांच्या मोजून सात फेऱ्यात  त्यांचे केस तो होत्याचे नव्हते करून टाकत असे
त्यातला एक फायदा निश्चितच म्हणता येईल तो म्हणजे त्यांची सुटका त्याच्या मगरमिठीतून पटकन होई व त्यासाठी
खर्चही बराच कमी येई.
       त्यामुळे जनूमामांचा लहानपणी मला मोठा हेवा वाटायचा आणि त्याचे कारण अगदीच विचित्र होते ते म्हणजे
मामाना अगदी साफ गुळगुळीत टक्कल होते त्यांच्या डोक्यावर अगदी औषधालाही केस नव्हता.मला वाटायचे
किती मज्जा आहे त्यांची,कारण त्यामुळे आमच्यासारखे दर महिन्याला बजा (बजरंग ) न्हाव्याच्या तावडीत मान
द्यायची पाळी त्यांच्यावर येत नाही.त्यावेळी बाकी इतर अनेक गोष्टींची वाढ व्हावी अशी इच्छा खूप असे.उंची वाढावी
म्हणून दिसेल त्या आडव्या दांड्याला मी लोंबकळत असे व आपली उंची किती वाढली याचा दररोज शोध घेत असे
बुद्धीची वाढ व्हावी अशी केवळ माझीच नाही तर घरातल्या सगळ्यांचीच इच्छा असे पण तिच्यात काही वृद्धी होण्याचे
लक्षण नव्हते मात्र ती सगळी कसर केसांनी भरून काढलेली आणि बजाच्या तावडीतून सुटून पंधराही दिवस होतात न
होतात तोच केसांची झुलपे कानावर डोकावू लागायची आणि आमच्या वडिलांची तीक्ष्ण नजर त्यांच्याकडे जायचीच की
लगेच आमची रवानगी बजाकडे व्हायची.
     पण तेच केस लहानपणी मी त्यांचा इतका तिटकारा केला म्हणून सूड उगवल्यासारखे अकालीच मला सोडून जायला
लागले आणि मग मात्र मी हादरलो.कारण त्यावेळी मात्र शहरातील अद्यावत मेन्स पार्लर किंवा न्यू औटलुक अशा ज्या नावातून
ते केस कापण्याचे दुकान असावे असा संशयही येणार नाही आणि आत शिरल्यावरही तेथील वातानुकूलित हवेत गुबगुबीत
खुर्चीत स्थानापन्न होताच झोपीच जावे असे वाटावे अशा प्रकारच्या दुकानात मी केस कापू लागलो होतो आणि तेथील
कारागीर (आता न्हावी हा शब्द बाद)किती कमीतकमी केस कापून कटिंग झाली असे जाहीर करायचे याबाबतीत
एकमेकाशी स्पर्धा करू लागल्यामुळे केस कापण्याच्या क्रियेचा त्रास न होता ते इतके कमी केस का कापतात या प्रश्नाचे
उत्तर शोधण्याचाच त्रास अधिक होऊ लागला.
       अशा काळात केस कमीतकमी कापायचे असल्यामुळे केसांवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या तेथल्याच एका कारागिराने त्याची
कातरी लागण्याची वाट न पहाताच माझे केस मला सोडून जात आहेत हा शोध लावून "साहेब टक्कल पडायला लागलेले
दिसते" असा त्याचा पंचनामा केल्यावर मात्र असे आपले लाडके केस आपल्याला सोडून चालले या कल्पनेने त्रस्त होऊन
आता त्याना कसे वाचवावे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी डोके खाजवल्यामुळे काही कल्पना तर सुचण्याचे दूरच उलट आणखी
काही केस मात्र माझा निरोप घेऊ लागले.अगदी मुंजीतसुद्धा फक्त घेरा राखून बाकीचे केस कमी करण्याचे माझ्या जिवावर आले
होते.पण लोकाग्रहास्तव त्यावेळी आयुष्यात फक्त एकदाच पुन्हा नाही अशा कबुलीवर वडीलधाऱ्यांचा तो आग्रह मी मान्य
केला होता पण आता ती गोष्ट आपल्या हातातही राहिली नाही हे समजून मी अगदी बेचैन झालो.
   जनूमामांनीच मला "अरे त्यात वाईट काय वाटून काय घेतोस लक्षात ठेव "खल्वाटो निर्धन: क्वचित ।"असे सांगून
माझ्या धनप्राप्तीतील उज्वल भवितव्याकडे माझे लक्ष वेधून मला धीर देण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मित्र मैत्रिणीना
अजून त्या विषयाचे महत्व वाटत नसल्यामुळे त्यांच्याकडून माझी नाचक्की होण्याविषयी मला खात्री होती.शिवाय
माझ्या मैत्रिणीबरोबर चाललो असता तिचा मित्र म्हणून मला न ओळखता तिचा बाप म्हणून मला ओळखतील की
काय अशीही भीती मला वाटू लागली.
    माझ्या एका मित्राची मनोहरची त्यावेळी मला तीव्रतेने आठवण झाली.त्यालाही अगदी छान,दाट कुरळे केस होते आणि तो त्यांची निगाही  फारच काळजीपूर्वक राखत असे.मध्यंतरी बरेच दिवस आम्ही भेटलो नव्हतो आणि एक दिवस घराची घंटी वाजल्यावर दार उघडायला गेलो आणि आणि एक अगदी अपरिचित चेहऱ्याचा एक माणूस दारात उभा होता,मी त्याच्याकडे पहाताच पहिल्यांदा त्याने,"तू मला ओळखणार नाहीस " अशीच सुरवात केली आणि त्याचा आवाज ऐकल्यावर मात्र मी त्याला ओळखले आणि "अरे मन्या तू?" असे उद्गार माझ्या तोंडून बाहेर पडले.अशीच परिस्थिती काही दिवसांनी आपली होणार आणि आपल्यालाही ज्याला त्याला  नव्याने ओळख करून द्यावी लागणार असे वाटून मी अगदी हताश झालो.  
   त्यामुळे टक्कल पडू लागताच केस पुन्हा उगवावे म्हणून जेवढे म्हणून उपाय करणे शक्य होते तेवढे मी करून
पाहिले.निरनिराळ्या जाहिरातींतील वेगवेगळ्या औषधींचा वापर मोठ्या प्रमाणात करून होणाऱ्या खर्चामुळे जनूमामांनी
मला दिलेल्या दिलासायुक्त भवितव्याला अपवाद ठरून मी आताच निर्धन होणार असे वाटू लागले.जाहिरातीतील औषध
वापरण्यापूर्वीचे टक्कलयुक्त व नंतरचे दाट केस असणारे दोन्ही चेहरे माझ्याकडे बघून कुत्सित हास्य करून मला"क्या फसाया"
म्हणत असल्याचा भास मला होऊ लागला.
    सुदैवाने माझ्या उत्तमांगाने मला धीर देऊन भानावर आणले."अहो इतके हताश का होता,किती तरी थोर लोकांना टक्कल आहे म्हणून त्यांचे काय अडले आहे ?" यात बराच तथ्यांश होता.त्यामुळे आता टक्कल पडल्यामुळे का होईना  थोर होण्याची मी वाट पहात आहे.