मूर्ख कोण?

मूर्ख कोण? हल्ली हे ठरवणं जरा कठीणच होऊन बसलंय. थोडा विचार केला आणि खालील काही मुद्दे सापडले. बघा पटतात का.

जास्त मनावर घेऊ नका. याकडे फक्त विरंगुळा म्हणून पाहण्याचा प्रयत्न करा.
खालील गोष्टी करणारी माणसं सपशेल मूर्ख आहेत असं आमच्या निदर्शनास आलं आहे.
१. वेळेवर कर भरणारा आणि खड्डे असलेल्या रस्त्यावरून एम एटी चालवत जाणारा.
२. आपल्याच देशात राहून काहीतरी चांगलं करून दाखवण्याची इच्छा असणारा.
३. अस्खलीत मराठी बोलणारा.
४. मुलांना मराठी मिडियम मध्ये घालणारा.
५. संस्कृत किंवा मराठी विषय घेणारा.
६. सकाळी लवकर उठून रात्री लवकर झोपणारा.
७. दुपारी बाराच्या आत किंवा रात्री आठच्या आत जेवून घेणारा.
८. ऑफिसमधील काम वेळेवर संपवून घरी लवकर येणारा.
९. जिथली वस्तू तिथे ठेवणारा.
१०. एखादी जुनी वस्तू काळजीपूर्वक जपून ठेवणारा.
११. लहान किंवा मोठ्या कोणालाही चटकन उलट उत्तर नं देणारा.
१२. शक्यतोवर कोणालाही नं दुखावणारा.
१३. शारिरिक मारामारी करायला घाबरणारा.
१४. मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये गेल्यावर गोंधळून जाणारा.
१५. तान्ह्या बाळाला कौतुकानं तीट लावणारी आई.
१६. आईनं शिवलेली गोधडी किंवा जुनकट दिसणारी सोलापुरी चादर वापरणारा.
१७. बायकोनं नं चुकता कुंकू लावावं किंवा छानपैकी बांगड्या घाल्याव्यात अशी अपेक्षा ठेवणारा.
१८. वयानं मोठ्या असलेल्या माणसाला उलट उत्तर द्यायला नं धजावणारा.
१९. माहीत नसलेल्या विषयावर उगाचच अथॉरिटी असल्यासारखं नं बोलणारा.
२०. सुंदर दिसणाऱ्या मुलीकडे दहा वेळा विचार करून आणि तिला कळणार नाही असं पाहून बघणारा.
२१. आपल्याला जगाचं गुढ उलगडलेलं आहे असं समजून लोकांना उपदेश नं करणारा.
२२. जेवढ्यास तेवढं बोलणारा.
२३. अनेकदा कंपनीच्या खर्चानं विमान प्रवास करूनही दरवेळी आपल्याला इमिग्रेशनला अडवतील की काय अशी भीती वाटणारा.
२४. म्हाताऱ्या माणसांच्या गप्पा ऐकून त्यात सहभागी होणारा.
२५. नायलॉनच्या निळ्या, लाल फुलाफुलांच्या पिशव्यांतून हल्लीच्या काळातही भाजी आणणारा.
२६. केळी, चिकू, पेरू यासारखी सामान्य माणसाला परवडणारी फळं अजुनही रस्त्यावरून विकत घेणारा.
२७. केवळ अंबानी, टाटा किंवा फार तर एन आर आय यांनाच परवडणारा हापूस आंबा खाऊ न शकणारा आणि त्यामुळे मद्रासी आंब्याच्या रस काढून त्यात समाधान मानणारा.
२८. उगाचच आपण कवी व्हावं, लेखक व्हावं असं नं वाटणारा.
२९. आपल्याला गाण्याचं शास्त्रीय ज्ञान उत्तम आहे असा भ्रम नसणारा आणि त्यामुळे शास्त्रीय किंवा नाट्यसंगीत यात फारसा नं रमणारा.
३०. अजुनही रिक्षेत लागणारी कुमार शानूची गाणी ऐकून सुखावणारा.
३१. सोशल सेन्स किंवा रेस्पॉन्सिबिलिटीच्या नावाखाली मंडळं, कट्टे, क्लब अशा ठिकाणी न जाणारा.
३२. एखाद्याची चार चौघात उगीचच जिरवण्याची आवड मुळातच नसलेला.
३३. सतत आणि उगाचच बायकांच्यात नं घुटमळणारा.
३४. मी आयुष्यात असं काहीतरी करीन की लोक लक्षात ठेवतील च्यायला, अशी महत्त्वाकांक्षा नसणारा.
३५. एखादा चांगला आणि बराच प्रगती केलेला माणूस पाहिल्यावर हा आमच्या जातीतला असणार असा फुकाचा अभिमान नं बाळगणारा.
३६. मैत्री करण्यापूर्वी समोरच्याचं आडनाव, जात, आर्थिक स्थिती या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारा.
३७. नवऱ्याला अहो जहो करणारी बायको.
३८. स्वयंपाक उत्तम करणारी हल्लीच्या काळातील मुलगी.
३९. सासरी गेल्यावर माहेरी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवून आनंदी राहणारी मुलगी.
४०. सासरचं आडनाव लावणाऱ्या मुली.
४१. स्वतःच्या खाण्यापिण्याचा अभिमान न बाळगणारा.
४२. वर्गातील मुलगी रस्त्यावर दिसली तर स्वतःहून ओळख दाखवणारा.
४३. चटकन एखाद्यावर विश्वास ठेवणारा.
४४. अभ्यासात फारशी प्रगती दाखवत नसतानाही छान छान गोष्टी खाण्याची आवड असलेला.
४५. जुन्या मित्रांना नं विसरणारा.
४६. फारशी ओळख नसतानाही एखाद्या कुटुंबात सहज मिक्स होणारा.
४७. सतत आपल्या अवती भोवती भरपूर माणसं असावीत असं वाटणारा.
४८. आपण फक्त माणसं जोडली पाहिजेत याहून जास्ती महत्त्वाकांक्षा नसलेला.
४९. माझा मुलगा चांगल्या प्रतीचा शिक्षक होऊ शकतो असं लोकांना सांगणारे आईवडील.
५०. चार लोकांत बसल्यावर एखादा छानसा विनोद झाल्यास खळखळून हसणारा.
हुश्श.. दमायला झालं. अजुनही बरेच मुद्दे सापडू शकतील.
पण जाऊ दे ना. कशासाठी हा मूर्खपणा?
दिलसे.