निशब्द

निशब्द

शब्दांचे हार आणि शब्दांचेच तुरे, निशब्दासाठी पडतात सर्वच अपुरे!
शब्दांचेच प्रश्न आणि शब्दांतलीच उत्तरे, ‘निशब्दा’साठी खेळ आहेत सारी ‘प्रश्न आणि उत्तरे’!
शब्दांच्या पतंगाला शब्दांचाच दोरा, आकाशाला जरी भिडला तरी कोराच्या कोरा!
शब्दांच्या किनार्यावर वाहते आहे शब्दांचीच नांव, कसा कळेल तिला कधी निशब्दाचा ठांव !
शब्द म्हणजे आहे प्राणाची भाषा, प्राणाच्या जाणत्याला मात्र कसलीच नाही आशा!
शब्दांच्या गाद्या आणि शब्दांचेच लोड, "स्वस्थ" वाटत नाहीये ना.. मग आता तरी सोड!
शब्दाला शब्द जोडून का घालवतोस वेळ व्यर्थ, शब्दाला कधी का असतो स्वतःचा असा अर्थ!
शब्दांचा बाजार आणि शब्दांचाच खेळ, निशब्दाला 'जाण', वाया चाललांय वेळ!
शब्दांची बंधने आणि शब्दांवरील भक्ती, मिळाली आहे कारे तुला व्यर्थ धारणांमधून मुक्ती!
शब्दांची वळणे आणि शब्दांच्याच वाटा, "स्वगृहा"पासून लांब लांब नेतात ह्या वाटा! :-)
शब्दांचा संग आणि शब्दांचेच रंग, शब्दांच्या 'अलिकडचा' आहे निशब्दाचा संग!
शब्दांच्या कवायतीमधील शब्दांचेच श्रम, जाणून घेरे तू..... ‘ब्रह्म म्हणजे भ्रम’!
शब्दांचे पांडीत्य आणि शब्दांचाच बाजार, "निराधार" आहेस "तो" तू, जो साऱ्या ब्रम्हांडाचा आधार!
शब्दांचा प्रभाव आणि भावाचा अभाव, कसा कळेल रे तुला तुझा मूळ "स्व"भाव!!
शब्दातील तुझा "मी", शब्दातीलच तुझा "तू", सदगुरू कृपेने कळेल... निशब्दाचा "जाणता" तो खरा "तू"!

सप्रेम

-नितीन राम
www.abideinself.blogspot.com