तत्काळ इच्छापूर्तीचा प्रयोग

तीन ते पाच वर्षांपूर्वी खाली लिहिलेला प्रयोग माझ्या वाचनात आला होता. मी ताबडतोब या प्रयोगाशी स्वतःला जोडू (रिलेट करू) शकले होते. या प्रयोगातून हेच परत अधोरेखित होते की - लहान मुलांना शिस्त ही अत्यंत जरूरी असते. आम्ही एखाद्या गोष्टीचा हट्ट केला तरी आई-बाबा ठामपणे त्या गोष्टीस नकार देत असत, त्याचे महत्त्व मला हा प्रयोग वाचून कळले.

______________________________________________________

या प्रयोगाचे नाव ठेवू यात "तत्काळ इच्छापूर्तीचा (इन्स्टंट ग्रॅटीफिकेशन) प्रयोग"

तर स्टॅनफर्ड महाविद्यालयामध्ये १९६० मध्ये हा अफलातून मानसशास्त्रीय प्रयोग करण्यात आला. शास्त्रज्ञांनी ४ वर्षे वयोगटातील काही मुलामुलींना एका खोलीमध्ये पाचारण केले आणि त्यांच्यापुढे "मार्शमेलो" या लहान मुलांना अतिशय भुरळ घालणाऱ्या, गोळ्या-चॉकलेट सदरात मोडणाऱ्या पदार्थाने भरलेले ताट ठेवले. मुलांना हे सांगण्यात आले की ते हवे तेव्हा १ मार्शमेलो खाऊ शकतात

पण

जर थोडा अजून वेळ कळ काढली तर मात्र २ मार्शमेलो खाता येतील. पण शास्त्रज्ञ बाहेर जाऊन परत येणार तोपर्यंत जरा कळ काढावी लागेल.

आता विचार करा हा "पण" किती जिकिरीच असेल त्या चिमुरड्यांकरता. अर्थात आमिषही तितकच जबरी होतं. २ मार्शमेलो मिळणार होते.

मग झालं काय - काही शहाण्या मुलांनी खरच शास्त्रज्ञ येईपर्यंत धीर धरला. या मुलांच्या गटाला "अ" गट म्हणू यात.

तर दुसऱ्या गटाने मात्र "ब" गट- थोडा वेळ कुठे नाक खाजव, पाय खाजव, वाकुल्या दाखव करत कळ काढली पण अर्ध्या वेळात संयम संपून मार्शमेलो खायला सुरुवात केली. याच गटातील काहीजणांनी तर शास्त्रज्ञ गेल्या गेल्या मार्शमेलो खायला सुरुवात केली होती.

इथवर प्रयोग ठीकठाक वाटतो हो की नाही? खरी गंमत पुढे आहे. काही वर्षांनी संशोधकांना या मुलांच्या वागण्यात आणि त्यांच्या व्यावसायिक तसेच शैक्षणिक यशात काही दुवे आढळले ते पुढीलप्रमाणे. "अ" गट आणि "ब" गट या दोन्ही गटातील मुलांच्या व्यावसायिक तसेच शैक्षणिक, वैयक्तिक आयुष्यात कमालीचा म्हणजे अक्षरक्षः नाट्यमय फरक त्यांना आढळून आला.

"अ" गटातील मुले अधिक यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुण असलेली, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी, आपल्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल करण्यात प्रवीण, वैवाहिक आयुष्यात समाधानी, अधिक उत्पन्न कमावणारी आणि एकंदर यशस्वी आयुष्य जगणारी अशी आढळून आली.

तर "ब" गटातील मुले हे अल्प व्यावसायिक यश मिळवलेली, आरोग्य विषयक काळज्यांनी ग्रासलेली, असमाधानी, वैवाहिक आयुष्यात असंतुष्ट, कमी उत्पन्न असलेली आढळली.

_______________________________________________________

आहे की नाही जिनीअस प्रयोग आणि त्यावरचे संशोधनही!