३३. चेहरा पुसून टाका

रिंझाई नांवाच्या झेन मास्टरची कथा फार रम्य आहे. रिंझाई जेव्हा सिद्ध झाला तेव्हा त्यानं त्याच्या गुरुला विचारलं ‘मास्टर व्हेअर एम आय? ’ रिंझाई हरवला..... हे स्वतःला हरवणं सिद्ध होणं आहे!  रिंझाईला स्वतःचा चेहरा पुसून टाकता आला, रिंझाई आता कुठेही नाही आणि  सर्वत्र आहे!   

झेन संप्रदायात ‘सिद्ध’ वगैरे असा फार मोठा शब्द नाही ‘नो माइंड’ असा साधा शब्द आहे. जेव्हा तुम्हाला आपल्या खांद्यावर काही नाही असं वाटेल तेव्हा तुम्ही सिद्ध झाला असाल, त्याला ते ‘नो माइंड’ म्हणतात.

तुमचा चेहरा हरवलेला असेल, तुम्ही नसाल,... नुसती अथांग मोकळीक असेल, अनिर्बंध मुक्तता असेल, नुसतं मोकळं आकाश असेल, एक निस्तब्ध शांतता आणि रम्य माहौल असेल!

कधी तरी पहाटे उठा, उशीला पाठ टेकून शांत बसा आणि कल्पना करा की आपल्याला चेहरा नाहीये. ही वस्तुस्थिती आहे, सतत चालू असलेल्या विचारांमुळे आपल्याला चेहरा आहे असं वाटतं किंवा जो काही चेहरा आहे तो आपला आहे असं वाटतं. वास्तविकात आपल्याला चेहरा नाही, आपण एक चेहरा रहित अस्तित्व आहोत. चेहऱ्यामुळे व्यक्तिमत्त्व आहे आणि व्यक्तिमत्त्व हा एकमेव पेच आहे. व्यक्तिमत्त्वातून मुक्तता म्हणजे ‘नो माइंड’ अवस्था आहे,   संपूर्ण अस्तित्वाशी एकरूपता आहे, आपलं वेगळेपण हरवून जाणं आहे.

काही क्षण जरी तुम्हाला आपल्या खांद्यावर काहीही नाही असा अनुभव आला तरी तुम्हाला इतकं हलकं वाटायला लागेल की विचारता सोय नाही, त्या क्षणी तुम्हाला रिंझाई त्याच्या मास्टरला जे म्हणाला त्याची प्रचिती येईल,   तुम्ही स्वतःलाच विचाराल ‘व्हेअर एम आय? ’. तुमची ही अवस्था जितका वेळ टिकेल तितका वेळ तुम्हाला एक तरंगाईतता जाणवेल, तुमचे काहीही आणि कितीही प्रश्न असोत, सारे प्रश्न एका क्षणात संपल्या सारखे वाटतील. जन्मोजन्मीचा ताण एकदम नाहीसा झाल्यासारखा वाटेल, एकदम शांत वाटायला लागेल.

झाडं, पक्षी, प्राणी, सगळे निवांत दिसतायत कारण त्यांना आपण वेगळे आहोत असं वाटत नाही, हे ‘वेगळे आहोत असं वाटणं’ ही आपली अस्तित्वापासून झालेली फारकत आहे. ही फारकत वास्तविक नाही काल्पनिक आहे पण तीचं मूळ आपण आपल्याला व्यक्ती समजतो हे आहे. चेहरा विसर्जित झाला की फारकत संपली!

पाश्चिमात्य आणि आपल्या विचार सारणीत हाच फरक आहे, पाश्चिमात्य विचार सरणी व्यक्तिमत्त्व दृढ करा म्हणते आणि अध्यात्म व्यक्तिमत्त्व विसर्जित करा म्हणते. सगळं लौकिक जग हे आकाराचा गौरव करणारं असल्यामुळे जवळजवळ प्रत्येकजण व्यक्तिमत्त्व सघन करण्यामागे असतो. सघन व्यक्तिमत्त्वाचं समाजाला अपरिमित आकर्षण आहे, त्यातून लौकिक दृष्ट्या कितीही प्रगती झाली तरी अस्वस्थता कायम राहते. एकदा चेहरा सघन झाला की तोच आपली सामाजिक ओळख होतो आणि मग समाज त्याचा असा काही उदोउदो करतो की आपण कितीही चेहरा विसर्जित करण्याचा प्रयत्न केला तरी समाज तो विसर्जित होऊ देत नाही. खरं तर इतका कष्टानं कमावलेला चेहरा संबंधीत व्यक्तीच विसर्जित होऊ देत नाही, समाजाकडून त्याचं सतत शिक्कामोर्तब मिळवत राहते आणि चेहरा हरवला तर काय हीच भीती होऊन बसते!

काही वर्षांपूर्वी मी अनुपम खेरची मुलाखत बघत होतो, तो म्हणाला ‘आज मी इतका प्रसिद्धीच्या झोतात आहे की या झोतातून जेव्हा मी जेव्हा बाहेर जाईन तेव्हा माझं काय होईल मला सांगता येत नाही. एखाद्या दिवशी मी गाडीतून उतरेन आणि माझा ऑटोग्राफ घ्यायला कुणी पुढे येणार नाही त्या दिवशी बहुदा मी आत्महत्या केलेली असेल! ’ इतका चेहरा महत्त्वाचा आहे.

म्हणजे एकतर चेहरा लोकांनी मानावा म्हणून प्रत्येक जण प्रयत्नात आहे, अत्यंत थोडे लोक त्या प्रयत्नात यशस्वी होतात आणि मग चेहरा हरवणं ही कल्पना सुद्धा करवत नाही.

जो चेहरा अजून फारसा समाज मान्य नाही तो खरं तर सुदैवी आहे कारण असा चेहरा स्वतःला पुसायचं साहस करू शकतो. एकदा हा चेहरा हरवून बघा, रिंझाई सारखा अनुभव एकदाच घेऊन बघा... ‘व्हेअर एम आय? ’ एकदा  चेहरा हरवण्याची मजा कळली की आपण किती सुदैवी आहोत ते तुम्हाला कळेल. हा दिलासा नाही, वस्तुस्थिती आहे.

एकहार्टनी  ‘पॉवर ऑफ नाऊ’ च्या प्रस्तावनेत म्हटलंय की त्याला स्वतः बरोबर राहणं अशक्य झालं, अत्यंत निराशेत त्यानं अनेक वेळा सगळं संपवण्याचे प्रयत्न देखील केले. एक दिवस त्याच्या मनात विचार आला ‘ स्वतः बरोबर राहणं मला असह्य झालंय म्हणजे नक्की काय झालंय? कुणाला कुणाबरोबर राहणं असह्य झालंय? मी एक आहे की दोन? या दोन मी पैकी एकच खरा असेल आणि या विचारा सरशी त्याचं मन थांबलं! म्हणजे विचार थांबले, डोक्यात सदैव सुरू असलेला संवाद थांबला आणि तो ‘नो माइंड’ ला उपलब्ध झाला!

ही ‘नो माइंड’ स्थिती तुम्हाला रोज पहाटे उपलब्ध आहे, प्रत्येक शांत झोपेनंतर सांजवेळी उपलब्ध आहे, तुम्ही फक्त तिची दखल घ्या. एकदा ही स्थिती कळली की मग तुम्हाला ती प्रत्येक प्रसंगात आणता येईल, प्रत्येक कृत्यात आणता येईल, वरवर सगळं चालू राहील आणि सभोवताली मात्र एक कायमची शांतता असेल.

एकहार्ट म्हणतो, त्याच्या जीवनात नंतर किती तरी सुंदर अनुभव आले आणि गेले पण ही शांतता मात्र कायम आहे.  ही कायमची शांतता पहिल्यापासूनच आहे पण मनाच्या गोंधळामुळे, या सदैव चाललेल्या बडबडीमुळे ती लक्षात येत नाही.

मी देखील तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही फक्त आपल्या खांद्यावर काही नाही या अनुभवात खोल उतरा, तुम्हालाही कळेल चेहरा फसवा होता शांतता वास्तविक होती.

संदीप खरे 'आताशा असे हे मला काय होते' या कवितेत म्हणतो :

कशी ही अवस्था, कुणाला कळावे

कुणाला पुसावे, कुणी उत्तरावे?

किती खोल जातो तरी तोल जातो

असा तोल जाता कुणी सावरावे?

एकदा चेहरा पुसला की जीवनात एक तोल येतो, प्रसंग काहीही असो तुम्ही स्थिर राहता. नृत्याचा सगळा रियाज फक्त हा तोल साधण्यासाठी आहे. एकदा हा तोल साधला की तुमच्या प्रत्येक कृत्यात डौल येतो, साधं चालणं देखील मजेचं होतं.

एकदा चेहरा पुसला की तुम्हाला गाण्याची सम काय आहे ते कळतं, तुमचे शब्द स्वर होतात आणि बोलणं लयबद्ध होतं!

 एकदा चेहरा पुसून तर बघा!

संजय

____________________________________________

ज्यांना माझं पटत नाही त्यांनी कृपया लेख वाचून उगाच तिरकस प्रतिसाद देऊ नयेत, मी काय कशाचंही उत्तर देईन पण अशी उत्तरं देण्यात माझा निष्कारण वेळ जातो आणि त्याचा कुणालाही काही उपयोग होत नाही. त्यापेक्षा तुम्ही माझ्या लेखनाकडे दुर्लक्ष करावं, ते सगळ्यांना; म्हणजे तुम्हाला, मला, माझ्या वाचकांना आणि प्रकाशकांना, श्रेयसकर होईल .

संजय