जून २९ २००५

शुद्धलेखनाचे महत्त्व

शुद्धलेखनाचे महत्व किती, कुठे आणि कसे असावे ह्याची चर्चा करण्यासाठी हे सदर. ह्यापूर्वीही इथे शुद्धलेखनावर थोडी चर्चा झाली आहे. मनोगतावर शुद्धलेखनाचे नियम सोप्या शब्दात सांगणारे पुस्तक तर उपलब्ध आहेच, परंतु तेवढेच नाही, तर तत्काल उपयोगासाठी शुद्धीचिकित्सकही उपलब्ध आहे. असे असतानाही अशुद्ध लिखाणांची संख्या कमी नाही.

शुद्धलेखनाचे नियम (आणि नियमांचे अपवाद) लिहिलेले पुस्तक उपलब्ध असून पुरत नाही. प्रत्येक शंकेसाठी पुस्तक उघडून नियम/अपवाद बघण्यामधे वेळ तर जातोच, शिवाय लेखनाचा उत्साह कमी होतो. अशावेळी शुद्धलेखनासाठी एखाद्याला प्रवृत्त करायचे असल्यास काय करता येईल? कोणकोणत्या पद्धती अवलंबिता येतील? त्यात लेखकाचा उत्साहभंग वा विरस न होता त्याच्या लेखनात सुधारणा कशाप्रकारे घडविता येतील ह्याची चर्चा करण्यासाठी सर्व मनोगतींना आवाहन आहे.

माझ्या अनुभवानुसार एक पद्धत उपयोगी पडते जी मी पूर्वी यशस्वीरित्या (व्यक्तिगत निरोपाद्वारे काही मनोगतींच्या बाबतीत) हाताळली आहे ती अशी-
१. अशुद्धलेखन वाचनात आल्यास लेखकास व्यक्तिगत निरोपातून टीका पाठवणे. ह्यामधे लेखनाचा विषय, मांडणी, विचार ह्यापैकी चांगल्या असणाऱ्या गोष्टींबद्दल लेखकाचे प्रथम अभिनंदन व कौतुक करणे, व पुढे हे सर्व एवढे चांगले असताना त्यात शुद्धलेखनाच्या असंख्य/काही/बऱ्याच वगैरे चुका असल्याने वाचकाचा विरस कसा होतो हे सांगणे.

२. शुद्धलेखन सुधारण्यासाठी लेखकास मदतीचा हात पुढे करणे व तो हात स्विकारून लेखकाने शुद्धलेखन सुधारण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यास पुढीलप्रमाणे मदत करणे --
- त्या लेखकाच्या लेखनातील चुकीचे शब्द आणि त्या प्रत्येक शब्दासाठी असणारा योग्य शब्द सारणी-स्वरूपात लिहून त्या लेखकास व्य. नि. मधून पाठवणे. असेच त्या लेखकाच्या पुढे प्रसिद्ध झालेल्या लेखनासंदर्भातही करणे.
- चुकीच्या लिहिलेल्या शब्दासाठी योग्य शब्द लिहिताना थोडक्यात व सोप्या भाषेत त्यामागील नियम व तो नियम लागू होणारे इतर काही शब्द उदाहरणादाखल देणे.
- शक्य तेथे योग्य शब्दाची व्युत्पत्ती, संदर्भ वा स्पष्टीकरण देणे.

३. शुद्धलेखनाची इच्छा व्यक्त केल्याबद्दल तसेच त्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल लेखकाचे अभिनन्दन करणे.

माझ्या अनुभवानुसार "लेखन सुधारा, शुद्ध लिहा" असा आक्रोश करून काही साध्य होत नाही. केवळ पुस्तक जवळ बाळगूनही फारसा फायदा होत नाही. मुळात आपण एखादा शब्द चुकीचा लिहिला/लिहितो आहे हेच लेखकाच्या लक्षात येत नसेल तर ते सुधारायचे कसे? त्यामुळे कोणते शब्द चुकले आहेत आणि त्यासाठीचे योग्य शब्द कोणते हे सविस्तर लिहिल्यास त्याचा फायदा लेखकाला होतो, व किमान ते शब्द पुढच्या लिखाणात शुद्ध स्वरूपात लिहिले जाऊ शकतात.

ह्या पद्धतीचा फायदा लेखकास लेखन सुधारण्यास होतो हा माझा स्वानुभव आहे. ह्या पद्धतीव्यतिरिक्त इतर काही पद्धती, वा ह्या पद्धतीत बदल/सुधारणा सुचविण्यासाठी आपली मते जरूर लिहा.

Post to Feed

आपण शुद्धलेखनाविषयी ज
शद्ध जगणे
विचार आवडला...
मराठी लेखन मार्ग
प्रशासक आणि परखड
काही विचार
आस्था
मी सुधारलो !
थोडे वेगळे
मीराताई, अगदी मनातलं ब
शुद्धलेखन आणि अशुद्धल
जे प्रमाणित ते शुद्ध
लेखी आणि बोली
हो..
लेखी भाषा...
सुंदर विचार !
विनायकराव

Typing help hide