३६. पुन्हा जागृती

अफलातून प्रश्न आणि अनुभवातून उत्तर,

पहिला प्रश्न: एखादा माणूस प्रत्यक्ष झोपला नाही तर म्हणजे शरीर झोपले व तो जाणीवेत जागा राहिला तर त्याला निद्रानाशाची व्याधी झाल्यासारखे अस्वस्थ वाटणार नाही काय?

पहिली गोष्ट, सर्व अध्यात्माची सुरुवात आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत ही आहे. आपल्याला शरीराची जाणीव आहे, आपण शरीर झालेलो नाही.

आपण शरीर असू तर अध्यात्म निरर्थक होईल कारण मग अमृताचा शोध तो काय? शरीरा बरोबर आपण ही संपून जाऊ. शरीर जाईल पण आपण जसेच्या तसे राहू हा अध्यात्माचा केंद्रबिंदू आहे.

आता या क्षणी तुम्ही आहात तिथून दहा पावलं चाला आणि परत या, तुमच्या लक्षात येईल की आपण जसेच्या तसे आहोत, सगळी हालचाल शारीरिक पातळीवर झाली. हे मूळ भान आहे आणि हे हरवणं म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या झोप!

जेव्हा शरीर जागं असतं तेव्हा आपण (किंवा जाणीव किंवा आत्मा) सभोवताली जे चाललंय ते जाणू शकतो, शरीर झोपल्यावर आपलं सभोवतालच्या जगाचं भान शून्य होतं. ही प्रचलित अर्थानं झोप आहे. आपण जेव्हा जाग आणि झोप म्हणतो तेव्हा त्या दोन्हीही शारीरिक पातळीवर घडणाऱ्या घटना असतात पण या दोन्ही स्थितीत आपल्याला स्वतःची जाणीव नसते.

जर तुम्ही वर सांगितलेला चालण्याचा अत्यंत साधा प्रयोग केवळ पाच मिनिटं केलात आणि त्यावेळी आपण चालत नाही शरीर चालतंय हे भान ठेवलंत तर तुम्हाला लक्षात येईल की आपण आकार नाही, आपण केवळ जाणणारी एक निराकार क्षमता आहोत. घडतंय सगळं, कळतंय सगळं, पण होत काही नाही अशी आपली स्थिती आहे. तुम्ही आणखी पाच मिनिटं हा प्रयोग चालू ठेवलात तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला वजन नाही, वजन शरीराचं आहे.

हा दैहिक प्रयोग झाला पण ही अत्यंत बेसिक गोष्ट आहे इथे चूक झाली की मग पुढे सगळं चुकत जातं.

एकदा आपण देहापेक्षा वेगळे आहोत हा तुमचा अनुभव झाला की मग कोणत्याही दिवशी पहाटे जाग आल्यावर लगेच उठू नका, फक्त शांत बसा. आपण देह नाही हे भान ठेवा आणि तुमच्या लक्षात येईल की विचार फक्त डोक्यात चालू आहेत, जे काही शब्द आणि प्रतिमा दिसतायत त्यांचं क्षेत्र मेंदू पुरतं मर्यादित आहे. आता तुम्ही मनापासून वेगळे झालात.

आता दिवस भरात केव्हाही निवांत वेळ मिळेल तेव्हा माझा जागृती हा पहिला लेख परत वाचा. झोप म्हणजे मनाचा किंवा जाणीवेचा किंवा तुमचा कळण्याच्या क्षेत्राकडून न कळण्याच्या क्षेत्राकडे प्रवास आहे.

आता हा बोध घेऊन बिछान्यावर पडाल तेव्हा झोप येते म्हणजे नक्की काय होतं ते बघा. विचारांची रहदारी लॉजिकल राहत नाही, हळूहळू विचार भरकटायला लागतात, तुम्हाला विचारातलं तारतम्य कळेनासं व्हायला लागतं, मग विचार हवेत तरंगल्या सारखे व्हायला लागतात आणि काही कळायच्या आत तुम्ही नेणीवेच्या क्षेत्रात जाता!

तुम्ही या जाणीवेच्या नेणीवेत होणाऱ्या रूपांतरणात स्वतः:चं स्मरण ठेवलंत, स्वतःशी संलग्न राहिलात तर शरीर नेणीवेच्या क्षेत्रात जाईल पण तुम्ही जाणीवेच्या क्षेत्रात राहाल. ही झोपेची अत्यंत प्रगाढ अवस्था आहे. विचार थांबल्यामुळे शरीर इतकं गाढ झोपेल की शरीराला जाग आल्यावर तुम्हाला पूर्णपणे पुनर्जीवित झाल्यासारखं वाटेल.

निद्रानाश म्हणजे विचारांनी तुमचं इतकं लक्ष वेधून घेतलंय की तुम्ही स्वतःप्रत येऊच शकत नाही. आता नॉर्मल झोपेत घडणारी प्रक्रिया म्हणजे विचारांचं इल्लॉजिकल होणं आणि हळूहळू विरून जाणं थांबलंय. ही मानसिक अस्वस्थता आहे, बेतहाशा सक्रिय झालेल्या मनामुळे इन्सोमेनिया होतो. रेस्टिलची गोळी तुमची विचाराची प्रक्रिया केमिकल प्रोसेसनी थांबवते, तुम्ही नेणीवेच्या प्रभावाखाली जाता आणि मग शरीर झोपतं!

दुसरा प्रश्न : या विरुद्ध तो खूप उर्जावान असेल- असे झाले तर त्याची विश्रांती काय असेल- सतत जागृत अवस्था प्राप्त झाल्यावर तो विश्रांती कशी घेईल?

जागृत पुरुषाला मनाची प्रक्रिया थांबवण्याची गरज नसते, तो हवा तेव्हा विचार करू शकतो आणि विचार झाल्यावर ती प्रक्रिया आपोआप थांबते. त्यामुळे गीतेत :

तस्यां जागर्ती भूतानां सा निशा पश्यते मुने: (२/४७)

म्हणजे ज्ञानी दिवसा निद्रेचं सुख उपभोगतो असं म्हटलंय. ज्ञानी पुरुषाला दिवस आणि रात्र सारखी होते कारण त्याची जाणीव अपरिवर्तनीय झालेली असते. मनाला तंद्रा म्हटलंय (म्हणजे दिवसा लागलेली झोप) आणि रात्रीच्या झोपेला निद्रा म्हटलंय म्हणजे न कळण्याची स्थिती. ज्ञानी तंद्रा आणि निद्रा दोन्ही पासून मुक्त होऊन नेहमी कळण्याच्या स्थितीत राहतो.

इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तुम्ही (म्हणजे जाणीव), मन आणि शरीर या तीन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. जाणीवेला जराशी लागलेली डुलकी म्हणजे मन आणि पूर्ण लागलेली झोप म्हणजे शरीर!

हे मी पुन्हा सांगतो, स्थिर झालेलं मन म्हणजे जाणीव, सक्रिय झालेली (किंवा उन्मुख झालेली) जाणीव म्हणजे मन आणि सघन झालेलं मन म्हणजे शरीर. सघन झालेलं पाणी म्हणजे बर्फ, द्रवरूप झालेला बर्फ म्हणजे पाणी आणि पाण्याची अत्यंत तरल अवस्था म्हणजे वाफ पण मूळ सगळं पाणीच! हे अगदी तसंच आहे जाणीवेला आलेली तंद्रा म्हणजे मन आणि मनाचं सघनी करण म्हणजे शरीर पण मुळात सगळी जाणीवंच, म्हणजे तुम्हीच!

जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत या तिन्ही अवस्था आहेत पण जाणीव निराकार असल्यामुळे मन आणि शरीर या तिच्या आकार स्वरूप अवस्थांत ती  अपरिवर्तनीय राहते. तुम्ही जाणीवेत राहून विचार करू शकता, शारीरिक क्रिया करू शकता आणि झोपू शकता. या प्रत्येक क्रियेत तुम्ही स्वतःशी संलग्न राहता म्हणून कायम स्वस्थ राहता. हा तुमचा अनुभव झाला की झालात तुम्ही सिद्ध! मजा आहे, करून बघा.

संजय