आपण मस्त झाड व्हावे ...!!

झाडे कधी झोपतात ..?
झाडे कधी आळसावून जातात ..??
झाडाना कधी येतो कंटाळा ...???
एकाच ठिकाणी उभी असतात ..!
किती दिवसापासून ..
महिन्यापासून ....
वर्षापासून .....!!
 
झाडे सतत फुलत असतात  
झाडे सतत गात असतात 
फुले फुलवून  स्वागत करतात  
ऋतुनी बहरून जातात 
ऋतुनी मोहरून जातात 
 
झाडे फुलतात फुलांनी 
झाडे मोहरतात पाखरांनी 
झाडे काही घेत नसतात 
झाडे काही मागत नसतात 
देणे हा त्यांचा धर्म असतो 
त्यांचे मन म्हणजे आभाळ असते 
हे अगदी खरे असते 
  
झाडे बघावी अंधारात 
आपल्यातच ती मग्न असतात 
पान पान मिटून अगदी 
मिट्ट अशी हरवून जातात  
झाडे  तुमच्यावर माया करतात 
सावली होऊन हात ठेवतात 
  
झाडे उन्हात उभी असतात 
नि आपल्याला सावली देतात 
झाडे पावसात मिट्ट असतात 
आपल्यासाठी छत्री होतात .
झाडे किती सहन करतात
वीज  अंगावर घेऊन 
आपल्यासाठी जळून जातात 
असे आपण झाड व्हावे
कुणाचीतरी सावली व्हावे 
पावसामध्ये छत्री व्हावे 
एकदा तरी झाड व्हावे ......!!