राष्ट्रे मोठी का होतात

         दोन वेळा महायुद्धात बेचिराख झाल्यावरदेखील आज पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने जर्मनी वावरत आहे.या देशाच्या छोट्या शहरात न्यूक्लिअर रिऍक्टर पंप बनवतात.बेन्झ,बी एम डब्ल्यू,सीमेन्ससारख्या जागतिक दर्जाच्या उत्पादनाचे उद्योग त्या देशात आहेत.अशा देशातील नागरिक अतिशय चैनीत रहात असतील अशी तुमची अपेक्षा असेल.निदान माझी तरी तशी होती.

          माझ्या अभ्यासदौऱ्यासाठी मी हाम्बुर्गला पोचलो तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यासाठी एक स्वागत मेजवानी एका हॉटेलात आयोजित केली होती.आम्ही भोजनगृहात प्रवेश केला तेव्हां बरीच टेबले मोकळीच दिसली.एक तरुण  जोडी एका टेबलावर जेवण घेत होती पण त्यांच्या टेबलावरही फक्त दोन प्रकारच्या अन्नाच्या थाळ्या व दोन बिअरचे प्याले दिसले.इतक्या तुटपुंज्या जेवणात त्या जोडप्याला जेवणाचा आनंद मिळत असेल आणि अशा काटकसरी जोडिदाराला बहुतेक पुढच्या वेळी त्याची जोडिदारीण साथ देईल असे काही मला वाटले नाही.

     पलीकडच्या टेबलावर काही वृद्ध स्त्रिया जेवण घेत होत्या आणि त्याही अगदी मोजून मापूनच जेवत होत्या.म्हणजे पहिल्यांदा थाळीत घेतलेला पदार्थ अगदी चाटून पुसून संपवल्यावरच दुसरा पदार्थ मागवत.

     आम्हाला भूक सपाटून लागली होती त्यामुळे आम्ही मागवलेले पदार्थ केव्हांयेतात याकडेच आमचे लक्ष असल्याने त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्षच केले. गर्दी नसल्यामुळे आमचे पदार्थही अगदी लवकरच आले.जेवणानंतर इतर बरेच कार्यक्रम असल्याने आम्ही तसे जरा घाईनेच केवण उरकले.त्यामुळे आमचे पोट भरले तरी जवळजवळ एक तृतियांश अन्न आमच्या ताटात उरलेच होते.

     आम्ही उठून चालू लागलो तेव्हां मागून कोणीतरी आम्हाला बोलावत असल्यासारखे वाटले म्हणून वळून पाहिल्यावर त्या वृद्ध स्त्रियांनीच आम्हाला बोलावले होते असे दिसले व त्या इंग्लिशमध्ये बोलू लागल्या त्यामुळे आम्ही इतके अन्न वाया घालवल्यानद्दल त्या नाराज आहेत असे दिसले. त्यांच्या बोलण्यावरून त्या उगीचच पराचा कावळा करत आहेत अस आमच्या सहकाऱ्याला वाटले त्यामुळे तो म्हणाला,

" आमच्या जेवणासाठी आम्ही पैसे दिलेले आहेत त्यामुळे त्यातले आम्ही किती टाकले याविषयी तुम्हाला काही देणेघेणे असायचे कारण नाही."

हे ऐकून त्या स्त्रिया चांगल्याच रागावल्या व त्यातील एकीने आपल्या मोबाइलवरून कोणाला तरी फोन केला.थोड्याच वेळात सार्वजनिक सुरक्षा संस्थेचा एक अधिकारी तेथे उपस्थित झाला.व त्या स्त्रियांच्याकडून काय झाले हे कळल्यावर त्याने ५० मार्क चा दंड आम्हाला ठोठावला.आम्ही तर चाटच पडलो.आमच्या स्थानिक सहकाऱ्याने मात्र लगेच तो दंड भरला व त्या अधिकाऱ्याची तीन तीनदा माफी मागितली.

     त्या अधिकाऱ्याने आपल्या अधिकारवाणीत आम्हाला सुनावले," आपल्याला जेवढे खाणे शक्य असेक तेवढेच मागवत जा,पैसे जरी तुम्ही देत असला तरी त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंवर समाजाची मालकी आहे. ते वाया घालवण्याचा अधिकार तुम्हाला नाही.शरमेने आमवे चेहरे लाल झाले.आम्हाला त्याचे म्हणणे योग्यच वाटले. आणि ही जगातील एका श्रीमंत राष्ट्राच्या व्यक्तीची ही मानसिक धारणा होती.

      जरी आपण "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" असा श्लोक म्हणण्याचा उपचार कधी कधी पाळत असलो तरी आमव्यासारख्या भूकबळींच्या अनेक कहाण्या प्रसृत होणाऱ्या देशाला खरे तर हा मोठा धडा आहे पण आपल्याकडे असे झाले असते तर त्या वृद्ध स्त्रिया व नंतर त्या अधिकाऱ्याच्या मातृपितृकुळाचा उद्धार झाला असता हे नक्की.! कदाचित अधिकाऱ्याला धक्केही खावे लागले असते.     

  (हा मला आलेल्या एका विरोपाचा
अनुवाद आहे पण त्याचा मूळ स्रोत समजला नाही त्यामुळे अनुभवकथन करणारी
व्यक्ती कोणत्या देशाचा /ची नागरिक आहे हे समजले  नाही. )