"खोटं नसतं बोलायचं!!" (टाइमपास - आस्वादापुरती कविता)

ऐक ना...
आज म्हणे तू "दिवसभर फक्त खरंच बोलायचं.... "
तो घामाघूम, पुटपूटला स्वतःशीच... "आज काय नवं संकट? "
पण तिच्या लडिवाळ - गुबगुबीत चेहऱ्याकडे पाहून
आवंढा गिळला सरसकट
म्हणाला...
"का गो राणी.... असा काय म्हणतेस?
मी मूळी बोलतच नाही तुझ्याशी कधी काही खोटं!! "

बोलतोस.... बोलतोस!!
आज काय- मिटींगच होती, उद्या काय- पार्टीच आहे
परवा काय प्रेझेंटेशन म्हणे!
गेलेल्या परवाला- बॉस ने थांबवला.. काल मात्र वेळेत निघता आलं नाही
परवा म्हणे मिटींगच्या नावाखाली बॉस च्या घरी मॅच पाहत बसलास??
हजारदा सांगते निघताना फोन करत जा,
सांगितलेली कामे करत जा- कधीतरी कप भर चहा करून देत जा
पण तुला ते जमत नसतं
मग नव-नवीन बहाण्यांचा तुझ्याकडे साठा असतो
अगं तुलाच फोन करणार होतो,
आज मी तू सांगितलेलं सगळं आणणार होतो
तुला जरा बाहेर नेणार होतो,
तू का टाकलास ग चहा, थोड्यावेळात मी करणार होतो
असा काही बाही सांगतोस..
बोलतोस.... बोलतोस खूप खोटं बोलतोस...

बोल, आज "दिवसभर" तू खरं बोलशील?
जे जमलं नाही त्यामागचं खरं कारण देशील?

'माझीसुद्धा अट आहे, हळूच तो म्हणाला'
पाहिजे ते बोल "आज अभय आहे तुला...! "

'मी खरं बोलेन, पण तू रागावणार नाहीस,
कारणे मागणार नाहीस, तण-फण करत- ओरडून बोलणार नाहीस.... '

गालात धसलेली खळी दिसली.... "चालेल" म्हणत ती खुद्दकन हसली!

अरे पण ऑफिसला न जाता, झालं काय घरात असं निवांत बसायला?
'सुट्टी होती आज, बॉस कडे जाणार होतो मॅच पाहायला!! '
रागाने तिचा चेहरा गोरा- मोरा, पण आता सांगते कुणाला,
"करार" करून बसली आता नको का नीट वागायला?

'माझी मॅच म्हणजे तुझी अडचण, तुझा महत्वाचा एपिसोड नेमका बुडत असतो!
तुझी किरकिर- तुझी चिडचिड, म्हणून मी तिकडेच जात असतो...
आज घरात बसेन म्हणतो,
निवांत मॅच बघेन म्हणतो....!! '
एरव्ही तर म्हणतोस, "माझ्यामुळे सिरिअल्स आता आवडतात तुला?? "
'प्रश्न नको विचारुस, आज आहे तस्सच बोलायचा मूड आहे मला... '

'मस्त, ऑर्डर कर पंजाबी भाजी,
तुझ्या त्या पुळचट भाज्यांचा वीट आलाय मला.... '
अरे, रोज तर म्हणतोस "मस्तच झाली भाजी... तुझ्या हाताला चव आहे प्रेमफुला??. "
'कारण विचारू नकोस तू, खरं जे काय तेच बोलू दे मला.. '

उसना आव आणत हसून ती म्हणाली...
अरे लक्ष नाही का तुझं, पाहा मी नवी नेलपेंट लावली
'रंगांची अज्जिबात जाण नाही तुला,
झालीये का ग कमीत कमी इयत्ता पहिली? '

असू देत, चल बाहेरच जाऊ आज आपण जेवायला,
आले पाच मिनिटात तू पण कपडे घे बदलायला,

ती तयार होऊन..
पाहा मी कशी दिसते,
जराशी जाड झाले का रे?
'आरसा बोलतो काय ते,
वेगळं मी काय सांगायला हवं..
कपडे गच्च झालेत तुला सारे
ह्यातून तूच काय ते ओळखायला हवं'

एक उत्तर धड देत नाहीस, म्हणजे रोज खोटी कौतुकं करतोस ना?
'कारण काय सारखी विचारतेस, आज मी खरं बोलतोय ना? '

अरे खरं बोलायचं म्हणजे सतत हर्ट नसतं करायचं.....
"कमाल आहात राव...
मन राखून गोड बोललं की तुम्हीच म्हणता,

"खोटं नसतं बोलायचं!! "