तुझीच वाट बघतोय, अजुनही..!

          शेतातल्या पाटातून वाहणाऱ्या पाण्यानं वाट वाकडी करू नये म्हणून त्याला बांध घातला जातो. माणसांचं पण तसंच असत. त्याच आयुष्य सुरळीत चालण्यासाठी समाजानं त्याला एक चौकट ठरवून दिलेली असते आणि तो आयुष्यभर त्यातच जगत असतो, पण वाढत्या जोरामुळे पाण्यानं तो बांध तोडला तर त्याला कोणी दोषी तर ठरवत नाही ना? मग माणसाने ही चौकट तोडली तर कुठे बिघडत? सामाजिक व्यवस्था जीवनाला मार्ग आखून देते हे खरं! पण एखाद्या व्यक्तीने याच व्यवस्थेमुळे आपलं मन मारून तसंच कुढत जगावं का? शक्य असतानाही का त्याने हे समाजाचे बांध तोडून मनमोकळे, स्वच्छंदी जगू नये? का मनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात दुःख लपवून खोट्या आनंदाचे मुखवटे चढवून या समाजात नाटकीपणे वावरायचं? का मनमोकळेपणे रडायचं आणि हसायचंही नाही...? 

           हे आणि असेच खुप सारे प्रश्न मनाला अस्वस्थ करून जायचे. आणि हे प्रश्न आपल्याला सोडवता येत नाहीत म्हणून मनाची होणारी तगमग, तडफड कुठे व्यक्त पण करता यायची नाही. पण तु आयुष्यात आलीस आणि  दुःखाच्या या वाळवंटात जणू क्षणभर थंडगार कारंजे निर्माण करून निघून गेलीस. तुझ्यामुळे निर्माण झालेले तुषार चेहऱ्यावर झेलत असतांना या रणरणत्या उन्हातील प्रवास कधी सुखकर झाला ते कळल सुद्धा नाही. तुझ्या सहवासातील सुखाच्या किनारीमुळे माझ्या सारख्या रडत-कुढत जगणाऱ्या माणसाच्याही जीवनाला अर्थ प्राप्त झाला. वास्तव जीवनातील अनुत्तरित प्रश्नांनी कासावीस होणारा मी, जीवनाला कंटाळलेला मी, सतत नकारात्मक विचारांनी वेढलेला मी, सगळ्यांवर चिडचिडणारा-वैतागणारा मी रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझ्याही नकळत कधी आनंद शोधू लागलो हे समजले सुद्धा नाही. तुझ्याशी सतत भांडताना, मुद्दामहून तुझ्याशी वादविवाद करताना कदाचित मी या आयुष्यावर असलेला माझा रागच व्यक्त करत असेन. तरीही न थकता, न रागावता आणि संयमाने माझ्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे देताना तु दाखवलेला समंजसपणा मनात खोलवर कुठेतरी माझ्याही नकळत रुजत चालला होता, पण ते मान्य करायला हे मन कधीच राजी होत नव्हत. नकारात्मक गोष्टींचा मोठा प्रभाव असणाऱ्या माझ्या विचारशैलीला तुझ्या सकारात्मक विचारांचे आघात कदाचित सहन होत नव्हते. तुझ्या विचारांना उघड उघड विरोध करणारा मी आतून कुठेतरी डळमळीत होत चाललो होतो. पण सहजा सहजी हार मानायला हे दुष्ट मन राजी होत नव्हत. पण आज हे मान्य करताना मला कसलाही कमीपणा वाटत नाही. कदाचित थोडा उशीरच झाला हे कबूल करायला, आणि थोडा कसला खरंच खूपच उशीर केला मी. कारण तुझ्यामुळे माझ्यात झालेला हा आमूलाग्र बदल पाहायला तु आता येथे नाहीस. येथेच काय तु कोठे आहेस याचा कोणालाच पत्ता नाही. पण तु निघून गेल्यावरच माझ्यात झालेल्या या सकारात्मक परिवर्तनाचा मला साक्षात्कार झाला. खुप आतुरतेने तुझी वाट बघितली, तुला कधी एकदा हे माझे नवे रुप दाखवू असे झाले होते. पण देवळात जाऊन येते असे म्हणून घरातून बाहेर निघालेली तू अगदी सहज माझ्या आयुष्यातून निघून गेलीस. आधी चिडलो, संतापलो पण नंतर हळूहळू काळजी वाटू लागली, काळजीची जागा मग भीतीने घेतली, आणि भीतीची मग निराशेने. 
           खुप शोधलं तुला, अगदी जेथे जेथे शक्य होईल तेथे तेथे. पण शेवटी थकून परत आलो. कुणाच कुणावाचून अडत नाही म्हणतात. माझेही तसंच झाल. जगत राहिलो. जगत राहिलो म्हणण्यापेक्षा मरण्याची माझ्यात हिंमत नव्हती म्हणून आला दिवस ढकलत राहिलो. तुझी वाट बघून बघून आता माझी दृष्टीही क्षीण होत चालली आहे. स्मरणशक्तीही आता कमजोर झाली आहे, एवढी कि कधी कधी कसली वाट बघतोय मी हेही आताशा विसरायला होत मला. चालताना पायही साथ देईनासे झालेत आता, कधी तोल जाईल याचा नेम नाही. म्हणून सध्या या काठीचा खूपच आधार वाटतो मला, अगदी कधी काळी जगण्यासाठी तुझा आधार वाटायचा तसाच. रोजच्या सारखेच आजही गावाबाहेरच्या देवळात जाताना मनांत हुरहुर दाटून राहिली आहे. क्षीण झालेल्या दृष्टीने दूरदूर जाणाऱ्या वाटेकडे एकटक पाहताना जरा कुठे हालचाल झाली की आजही मनांत कालवाकालव होते. पोटात खोल खोल खडडा पडतो. नित्याचेच झाले आहे आता ते. अंधार पडू लागल्यावर परत घरी जाताना येणारे विचार तर नेहमीचेच. आज नाही आलीस, पण कधीतरी तुला परत यावेच लागेल. कारण माझ्या प्रश्नांची उत्तर तुला अजूनही द्यायची आहेत.  दुःखच देणार होतीस तर का फुलवलेस आनंदाचे बगीचे माझ्या जीवनांत...? तुटणारच होते तर का शिकवलेस स्वप्न बघायला मला..? जायचेच होते तर का आलीस माझ्या आयुष्यांत..?