४३. पुन्हा एकदा, भोजन!

भोजन या लेखावर इतके दिलखुलास प्रतिसाद आलेत की पुन्हा या विषयावर लिहावंस वाटतंय
पहिली गोष्ट : भूक जरी भोजनाचा केंद्र बिंदू असली तरी संपूर्ण भोजन प्रक्रिया ही 'भूक, डाएट पॉंईंट आणि स्वाद' या तीन परिमाणांचा ट्रायो आहे.
कोणीही दिग्गजानं या विषयावर काहीही लिहिलं असलं तरी अन्नाच्या घटक पदार्थांच्या विश्लेषणा पेक्षा 'स्वाद' हा भोजनातला नि:संशय निर्णायक घटक आहे.
स्वाद म्हणजे चव आणि गंध यांचा संयुक्त परिणाम आणि सर्व सजीव सृष्टी हाच घटक अन्न ग्रहणा साठी प्रमाण मानते.
अन्नाच्या घटक पदार्थांचं विश्लेषण हे कितीही सायंटिफिक असलं तरी तृप्ती आणि शरीर स्वास्थ्य साधू शकत नाही कारण स्वाद ही संवेदना आहे आणि विश्लेषण निव्वळ वैचारिक आहे.
भोजनाचा आनंद निष्कासित करणारं दुसरं महत्त्वाचं कारण स्वादा ऐवजी विश्लेषणाला दिलेलं महत्त्व हे आहे
डाएट पॉंईंट हे भूक आणि स्वाद या संवेदनां मुळे अनायासे लाभलेलं तिसरं परिमाण आहे.
तुम्ही ज्या वेळी भुकेनं, स्वादपूर्ण भोजन कराल तेव्हा नेहमी ठराविक आहारातच तुम्हाला तृप्तीचा अनुभव येईल, तुम्ही आवश्यकते पेक्षा जास्त खाणार नाही. याचं मानसिक कारण ही तितकंच महत्त्वाचं आहे, तुम्हाला थोडी भूक उरणं हे पुढच्या आस्वादा साठी किती श्रेयस्कर आहे याची कल्पना आलेली असेल!
थोड्याश्या भूके मुळे राहणाऱ्या सजगतेची (अलर्टनेस) दुनिया भोजना इतकीच मोहमयी आहे.
ओव्हर इटींगचं खरं कारण चवीचा मोह नसून अतृप्ती आहे!
---------------------------------------------------------------
भोजन प्रक्रियेत आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यावीशी वाटते ती अशी की भोजन, पचन आणि पुन्हा अन्न निर्मिती ही संपूर्ण प्रोसेस एक नैसर्गिक रिसायकलिंग प्रक्रिया आहे.
अन्न वाया गेलं ही मानवी समजूत अत्यंत चुकीची आहे.
हे मी अशा साठी सांगतोय की वाया घालवू नका, 'खा' हा चुकीचा ऍप्रोच आहे.
शक्यतो लागेल तेवढंच अन्न तयार करा पण उरेल म्हणून खाऊ नका. उरलेलं अन्न असेल तसं, जणू काही आपणच जेवणार आहोत इतक्या चांगल्या भावनेनं, जिथे गरज आहे तिथे, अत्यंत चांगल्या स्थितीत असताना, कोणताही आळस न करता पोहोचवा पण ते शक्य नसेल तर आहे तसं अन्न सरळ निसर्गाला समर्पित करा.
आपण जेव्हा उरू नाही म्हणून खातो तेव्हा निसर्गाच्या रिसायकलिंग प्रोसेस मध्ये शरीराची आणखी एक प्रोसेस येते आणि त्याचा शरीराला तोटा तर होतोच शिवाय निसर्गाच्या रिसायकलिंग प्रोसेसला आपण नवा अडथळा निर्माण करतो!
उरलेलं अन्न तुम्ही पुन्हा खाणार असाल तर ठेवण्याची जागा पोट नसून फ्रीज आहे हे लक्षात ठेवा.
--------------------------------------------------------
आणखी एक गोष्ट : सर्व अन्न एकदम वाढून घेऊ नका, त्यानं खाण्याचं (संपवण्याचं) मानसिक दडपण येतं.
नेहमी आवडता पदार्थ प्रथम घ्या. चुकीच्या सुरुवातीनं रिपल्सिव मूड तयार होतो आणि जेवण स्वच्छंद न राहता बंधन होतं.
पोळी सोडता सर्व पदार्थ शक्यतो वेगवेगळ्या बोउल्स मध्ये घ्या आणि पोळी सोडून सर्व पदार्थ चमच्यानं खा, यामुळे जाणीव एकसंध राहते आणि सर्व पदार्थ योग्य प्रपोर्शन मध्ये खालले जातात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
वरण-भात तर विशेष करून बोउल मध्येच घ्या, यानी भाताच्या प्रमाणावर एकदम नियंत्रण येतं आणि तांदुळाची नजाकत (तुम्ही बासमती वापरत असाल तर) बर्करार राहते.
कॉम्बिनेशननं जेवा आणि तसंच वाढून घ्या म्हणजे तुम्ही पोळी, भाजी, कोशिंबीर, आमटी आणि लोणचं असं कॉम्बिनेशन करणार असाल तर तेच पदार्थ हवे तेवढे घेऊन एका मागोमाग एक ग्रहण करा. यानी जेवणाचा रिदम राहतो आणि स्वादाची जाणीव एकसंध राहते.
भुकेचं नेहमी भान ठेवा तरच तुम्हाला डाएट पॉंईंट कळू शकेल, ज्या क्षणी थांबावंस वाटेल तिथे थांबता येईल इतकंच अन्न ताटात असेल याची खबरदारी घ्या.
जेवताना उठू नये हा चुकीचा नियम आहे, वाढून घेण्यासाठी तुम्ही जितक्या वेळा उठाल तितक्या वेळा तुमची भुकेची जाणीव आणि पदार्थ वाढून घेण्याचं प्रमाण योग्य राहील.
-------------------------------------
आता शरीर स्वास्थ्या बद्दल थोडं लिहितो :
शरीर स्वास्थ्य याचा अर्थ शरीराची योग्य मापं असा नाही तर उत्तम प्रतिकार शक्ती असणारं (म्हणजे सहसा कोणतंही औषध न लागणारं), नेहमी उत्साही असणारं आणि तुम्ही ज्याच्याशी कंफर्टेबल आहात असं शरीर.
काय आहे स्वास्थ्य पूर्ण शरीराचं खरं परिमाण? तर, आपण शरीरा पासून वेगळे आहोत हा तुम्हाला विनासायास आणि केव्हाही असलेला बोध!
काय असावं अशा शरीराचं रहस्य? तर हा ट्रायो, मस्त ओढ लावणारी मनस्वी भूक, अत्यंत स्वादपूर्ण भोजन आणि डाएट पॉंईंटची रहस्यमय सीमा रेषा!

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १