वस्त्रे!

................................................
वस्त्रे
!
.............................................

मागचे विसरून ये माझ्यासवे आता पुन्हा!
ये लिहू माझे-तुझे गाणे नवे आता पुन्हा!

आज मी आलो नव्या गावात कायमचा, तरी
कालचे काहीतरी मज आठवे आता पुन्हा!

काय नक्की पाहिजे ते येत नाही सांगता...
वेगळे काहीतरी पण मज हवे आता पुन्हा!

मी सुखाचा एक झोका घेतला केव्हातरी...
सूर दुःखाचा मला हा जोजवे आता पुन्हा!

पानही माझ्यावरी उरले न हिरवे एकही...
 उतरती माझ्यावरी कुठले थवे आता पुन्हा?

दूर दे फेकून वस्त्रे पाप-पुण्याची जरा...
जन्मतानाचेच होऊ नागवे आता पुन्हा!

- प्रदीप कुलकर्णी
.....................................
रचनाकाल : ०१ जानेवारी २००६
....................................