हात मागे बांधुनी तू

हात मागे बांधुनी तू धाडले लढण्यास का?
कापुनी मम पंख देवा झोकले उडण्यास का?

का दुराग्रह आप्त करती स्वार्थ त्यांचा साधण्या?
संपण्याची आस असता लावले उरण्यास का?

माल साठेबाज भरती कमवण्या मोठा नफा
लाट मंदीची तरी मज काढले विकण्यास का?

का जगा ठाऊक नाही मी कफ़ल्लक हा असा !
शुन्य शिल्लक, व्यर्थ खाते घेतले लिहिण्यास का?

संपली उपयुक्तता अन गवसले उत्तर मला
गंध सरलेल्या फुलांना फेकले सुकण्यास का?

जलविना आकाशगंगा पाप धुण्याला नसे
तेज तिजला फक्त आहे लाभले दिसण्यास का?

मखमली नजरेत तुझिया चांदणे दिसते मला
प्रेमभावांना धुमारे लागले फुटण्यास का?

आठवांच्या मोसमाला पालवी फुटली अशी !
आज कळले आसवांना धाडले झरण्यास का?

सांग तू "निशिकांत" आता प्रेमभंगाची व्यथा
तुज कधी पर्याय होते गावले मरण्यास का?

ही अजून एक दोन काफ़ियाची गजल सेवेत सादर.