रामदेवबाबाच्या निमित्ताने

नुकतेच आपण सर्वांनी भारतीय राजकीय रंगमंचावर 'रामदेवबाबा' नावाचे नाट्य बघितले. यात कोणाचीही बाजू न घेता तटस्थ वृत्तीने या सर्व प्रकाराकडे बघायचे ठरवले तर काय दिसते ?

रामदेवबाबाची उद्दिष्टे काही असोत, तो काही मोठा अर्थतज्ञ नाही. त्यामुळेच अतिरेकी मागण्या, स्वतःच्या प्रतिमेची एनकॅशमेंट आणि हुसकल्यावर भरमसाट कांगावा या सर्व घटना अपेक्षेप्रमाणेच घडल्या. पण केंद्र सरकारमध्ये एवढे मोठे मुत्सद्दी असूनही सरकार असे का वागले त्याचे आश्चर्य वाटले. आधी त्याच्याशी वाटाघाटी करणे हेच एवढ्या मोठ्या देशाच्या सरकारला शोभेसे नाही. त्यात शेवटी मध्यरात्री अचानक, अमानुष पोलिसी हल्ला करून सरकारने स्वतःचे हंसे करून घेतले आहे.
भाजपनेही या प्रकरणात अत्यंत संधिसाधु, अपरिपक्व व हास्यास्पद भूमिका निभावली आहे. कहर म्हणजे राजघाटावर त्या सुषमाबाईंनी नृत्य करून जो तमाशा केला आहे तो टी. व्ही. वर बघून तर एक सामान्य नागरिक म्हणून मनांत एक अगतिकपणाची प्रकर्षाने जाणीव झाली. उन्मत्त व भ्रष्ट काँग्रेसला आजतरी भाजप हा एकमात्र विकल्प आपल्यासाठी आहे. पण त्यांनीही गेल्या काही वर्षांत (विशेषतः बाजपेयींनंतर) इतके केविलवाणे आणि उबगवाणे वर्तन केले आहे की आपल्याला तारणारा आता कोणीच राहिला नाही ही भावना मनांत दाटून येते.
अण्णा, रामदेवबाबा यांचे उद्देश जरी चांगले असले तरी ते दोघेही 'एक चांगला नेता' या कसोटीवर उतरू शकत नाहीत. आजमितीला आपल्या देशाला या सर्व सत्ताधारी लुटारुंपासून वाचवणारा नेता हवा आहे. तो लवकर मिळो या आशेवरच आपले भवितव्य अवलंबून आहे.
समाधान एवढेच आहे की काळा पैसा हा विषय ऐरणीवर आल्यामुळे निगरगट्ट सत्ताधीशांना थोडे तरी भय वाटू लागेल.