ज्ञानेश्वर किती आणि (वयाने)केवढे ?

      मनोगतवर पाऊल टाकताना बरोबर पाच वर्षापूर्वी (०८/०६/२००६)मी एक चचेचा प्रस्ताव सादर केला होता. "संतांची मराठी भाषा"असा विषय होता. त्यावर बरेच प्रतिसादही आले होते पण माझ्या मनातील शंकेचे पूर्णपणे निरसन झाले नव्हते. आता जो चर्चेचा प्रस्ताव सादर करत आहे त्यात मागील प्रस्तावाचे थोडेफार बीज आहेच. पण यात फक्त ज्ञानेश्वरांविषयीचाच विचार मांडला आहे.ज्ञानेश्वरी  व ज्ञानेश्वरांचे अभंग वाचले तर एक गोष्ट ठळकपणे निदर्शनास येते ती म्हणजे ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे वळण व ज्ञानेश्वरांच्या अभंगातील मराठी भाषेचे  वळण  यात मोठा फरक जाणवतो. मी संपूर्ण ज्ञानेश्वरी आजच्या मराठी भाषेत ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केल्यामुळे (त्यातील काही भाग मनोगतवर पण प्रकाशित केला गेला होता.)मला ते विशेष जाणवले आणि ती गोष्ट म्हणजे ज्ञाबेश्वरीतील ओव्यांची भाषा  अभंगाच्या  भाषेच्या मानाने अधिक कठिण व वेगळ्याच धर्तीची आहे.      
     याशिवाय अभंगांचाही स्वतंत्रपणे विचार करायला जाता त्यातही दोन प्रकार आढळतात.ते   प्रकार विषयानुसार नाहीत तर अभंगांच्या कर्त्याच्या उल्लेखासंबंधी आहेत.बह्वंश अभंगकर्त्यांनी आपले नाव शेवटच्या चरणात टाकले आहे.उदा:तुका म्हणे म्हणजे तुकारामांचा अभंग,जनी म्हणे म्हणजे जनाबाईचा,एका जनार्दनी म्हटले की एकनाथमहाराज, दास म्हणे म्हणजे रामदास इ. या सर्वांनी आपल्या प्रत्येक अभंगाचा शेवटचा चरण याच पद्धतीने लिहिला आहे.मात्र ज्ञानेश्वरांच्या अभंगात कर्त्याचा उल्लेख तीन प्रकारे केलेला दिसतो. "बापरखुमादेवीवरु" हा अंतीम चरणात उल्लेख असलेल्या अभंगांची संख्या जास्त आहे.पण त्याशिवाय "ज्ञानदेव म्हणे" असा उल्लेख शेवटच्या चरणात असणारे काही अभंग आढळतात तर मला माहीत असलेल्या एका अभंगात "ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड"असा उल्लेख आहे.एका अभंगात "म्हणे ज्ञानेश्वरा " असा उल्लेख आहे.
      बहुतेक अभंगकर्त्यानी आपल्या नामोल्लेखाची पद्धत सर्व अभंगात एकच ठेवलेली दिसते यास अपवाद फक्त ज्ञानदेवांचाच.ही शंका मनात सारखी बाळगत असताना काही जुने मासिकांचे अंक चाळत असताना "युगवाणी"या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राच्या ऑक्टो/मोव्हे. /डिसें १९८९ च्या अंकात  श्री.सु.बा.कुलकर्णी यांचा "ज्ञानदेवांचा कालखंड : काही नवी समीकरणे" हा लेख वाचण्यात आला.आणि त्यात अनेक साहित्यिक संशोधकांनी ज्ञानेश्वरांच्या कालखंडाचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आहे.व त्यांनी ज्ञानदेवांच्या आयुष्यमर्यादेवरही  मते नोंदवली आहेत व त्यांच्यानुसार ज्ञानेश्वरांची आयुर्मर्यादा शके ११२२ ते १२०२ म्हणजे ८० वर्षांची होती याशिवाय संशोधकांविषयी त्यानी पुढील उद्गार काढले अहेत.  "ज्ञानदेव एक की दोन इतक्यावर न थांबता ज्ञानदेव हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून ती एक कपोलकल्पित व्यक्ती आहे ,विठ्ठलपंतांच्या मानसिक उत्क्रान्तीची ती एक अवस्था आहे असे प्रस्ताव मांडण्यापर्यंत संशोधकांची मजल गेली आहे."  
    या गोष्टींचा विचार करून ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर ही एक वेगळी व्यक्ती असावी तर दोन प्रकारच्या म्हणजे बापरखुमादेवीवर असा उल्लेख असणाऱ्या व स्पष्ट ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वर असा उल्लेख असणाऱ्या अभंगांचे कर्ते आणखी दोन वेगवेगळे ज्ञानेश्वर असे एकूण तीन ज्ञानेश्वर असावेत व ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वरांची वयोमर्यादा ८० वर्षाची असावी असा विचार मांडावा वाटतो.   संपादन करून पान सुपूर्त केल्यावर त्यातला मजकूर येथे दिसला नाही तर इतर काही न करता कंट्रोल-एफ५ (ctrl-F5) ह्या कळी वापरून पान ताजेतवाने करावे. त्यानंतर सूचना दिसल्यास त्यावरील 'रीसेंड' हा पर्याय निवडावा.