लाभली नाही कधीही

लाभली नाही कधीही स्वस्थता त्याच्या जिवाला
शाप जो संवेदनांचा घेउनी जन्मास आला

खोलवर बसतात रुतुनी ह्या जगाचे शब्द जहरी
अन्‌ सहज जाते मनावर मौनही घालून घाला

दंशही अदृश्य असतो, रक्तही अदृश्य असते
ज्यावरी जनवाघुळांचा चालतो गोपाळकाला

सर्व शस्त्रांहून भीषण बोटभर तो तीक्ष्ण अवयव
चामडी ही लोळवाया जीभ शिकवी चाबकाला

बैठकीचे गालिचे अन्‌ चादरी रक्ताळलेल्या
ह्या घराच्या ओसरीवर रोज भरते काकशाला

फाकणार्‍यांनी शिकावे अंशुमानापासुनी की
सांज प्रत्येकास नेते ओढुनी अस्ताचलाला