भीती

पटाचा डाव अगदी रंगात आला होता आणि तेव्हढ्यात तो आवाज माझ्या कानावर पडला! आजीच्या घराच्या अगदी समोरच असलेल्या मशीदीतून नमाज चालू झाले.

मन कावरेबावरे व्हायला लागलं. मी जाऊन आईला  घट्ट मिठी मारली. तो आवाज बंद होईपर्यंत तिच्या कुशीतच डोकं लपवून बसून राहिलो. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आजही जेव्हा तो आवाज कानावर पडतो, तेव्हा जीव कासावीस होतो.

स्वतः:च्या अंगावर चाबकानं फटके मारून घेणाऱ्या त्या कडक लक्ष्मी ची भीती वाटते. ती वाकडी, जुनाट काठी त्या ढोलकीवर जोरजोरात घासल्यावर येणारा तो आवाज... भीती वाटते त्या क्षणाची. तो मार अंगावर बसल्यावर होणाऱ्या त्या वेदनेची.

भीती वाटते गडद अंधाराची. खरं तर अंधारापेक्षा ज्या गोष्टींना अंधार लपवून ठेवतो, त्या गोष्टींचीच जास्ती भीती वाटते.

नेमकं ह्याच क्षणाला आपल्या जवळची व्यक्ती नसेल तर हीच भीती मनात अक्राळ-विक्राळ रूप घेऊन बसते.

भीती वाटते कोणत्याही व्यक्तीच्या आजारपणाची. त्या क्षणी आजूबाजूला असलेल्या वातावरणाची. त्या आजारपणानंतर येणाऱ्या परिस्थितीची. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची.  

भीती वाटते जवळच्या व्यक्तीला गमावण्याची. एखाद्याचे भौतिक अस्तित्व नाहीसे होण्याची; ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाण्याची. त्याहून जास्ती भीती जाणवते ती त्या व्यक्तीला मनामधून गमावण्याची. त्या व्यक्तीच्या मनातून आपले स्थान कमी होण्याची.

भीती वाटते ती नकार पदरात पडेल ह्याची. तिला मनातली गोष्ट सांगितल्यावर तिच्याकडून मिळालेला नकार. नोकरी मध्ये इंटरव्यू दिल्यानंतर मिळालेला नकार. नकारापेक्षा स्वाभिमान दुखावण्याची भीतीच जास्ती वाटते.

नकाराच्या जोडीलाच भीती वाटते ती अपयशाची. खास करून जेव्हा खूप मनापासून कष्ट करून एखादी गोष्ट केलेली असेल.

ह्याच्या परिणामी, आत्मविश्वासाला गेलेल्या तड्याची भीती वाटते.

भीती वाटते अपयश पदरी पडल्यानं आलेल्या  'न्यूनगंडाची'. आणि नंतर मग ह्या अपयशापेक्षा हि, 'यश न मिळण्याची' भीती जास्ती वाटते.

भीती वाटते मानता चालू असलेल्या असंख्य चिंतांची;   'मनातल्या इच्छा, जबाबदाऱ्या पूर्ण कधी होणार' ह्या व्याकुळतेची.

भीती वाटते एकटेपणाची; आजूबाजूला माणसांची गर्दी असूनपण त्यात आपलं माणूस नसल्याची. भीती वाटते आपल्या हाकेला 'ओ' न येण्याची; इतरांपासून वेगळे पडण्याची आणि त्यामुळे आलेल्या असुरक्षिततेची.

भीती वाटते परिस्थितीची. 'तशी' यातनादेयी परिस्थिती एखाद्यावर ओढवेल की काय ह्या विचाराची.

आणि सर्वात जास्ती भीती वाटते ती 'माणसाची'. मतप्रवर्तन कधी होईल, मनातील विचार कधी कलाटणी घेतील सांगता येत नाही. एखाद्याच्या होकाराचा नकार कधी होईल सांगता येत नाही.

वेळोवेळी मिळणारा पश्चात्ताप, दुःख:, खोटेपणा, विश्वासघात.... नेमकी ह्याच गोष्टींची सर्वात जास्ती भीती वाटते.

अंधार आणि आवाजाची भीती कदाचित जाईल मनातून.

यशःप्राप्ती झाल्यावर अपयशाची भीती जाईल. साथीदार मिळाल्यावर एकटेपणाची भीती जाईल.

नकार पचवून त्याची सवय होईल. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्या चिंतेची भीती जाईल.

पण 'माणूस' ह्या गोष्टीची भीती मात्र मनात कायमच घर करून असेल.