अण्णा, आपण इतक्यात पाकिस्तानात जाणे योग्य आणि आवश्यक आहे काय?

अण्णा,  आपण  इतक्यात पाकिस्तानात जाणे योग्य आणि आवश्यक आहे काय?
पाकिस्तानी भ्रष्टाचारविरोधी शिष्टमंडळाचे निमंत्रण आपण सौजन्याला धरून स्विकारले असे आम्ही मानतो.  प्रत्यक्षात आताच तिकडे जाण्याचा आपला विचार नसेल अशी आम्हाला आशा वाटते.  कोणत्या तरी सामान्य संघटनेने तुमच्या मूळ कार्याला फाटे फोडण्याचा हा उद्योग चालवलेला आहे असे आम्हाला वाटते.  त्यामुळे  भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या खंद्या समर्थकांच्या मनातील भावना आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी हा प्रश्न!
’अभी दिल्ली बहोत दूर है।’
आपण हाती घेतलेले आंदोलन हे भारताच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्याचे अंगभूत सामर्थ्य असणारे आहे.  आपण म्हणता तशी ती ’स्वातंत्र्याची दुसरी लढाईच! ’ होय.   भूकबळी ते दहशतवाद अशा सर्वच समस्या विविध प्रकारच्या भ्रष्ट आचारातूनच गंभीर झाल्या आहेत.  याविरुद्धच्या लढाईला आता कुठे सुरुवात झाली आहे.  त्या लढाईवर तुमचे लक्ष केंद्रित होऊ नये आणि त्याला  इतर  फाटे  फुटावे  यासाठी अनेक मार्ग चोखाळले जात आहेत.  त्यापैकी अनेक मार्गांशी तुम्ही दिल्लीत दोन हात करून यश मिळविलेत.  पण ती फक्त सुरुवात होती आणि तुम्हाला इतका उस्फूर्त प्रतिसाद सर्व थरातून मिळेल याची सत्ताधारी लोकांना कल्पना आली नव्हती.  त्यामुळे वस्त्रहरण टाळण्यापुरते त्यांनी पडते घेतले आहे. 
निवडणुकीच्या लढाईत आपण निर्णायक विजय मिळवूच अशी सत्ताधारी लोकांना खात्रीच आहे. 
तेव्हां प्रत्यक्ष निवडणुक न लढवता विविध पक्षांमधील सर्व भ्रष्ट नेत्यांना पराभूत करण्याची लढाई जोवर जिंकली जात नाही तोवर आपल्या आंदोलनाला खरेखुरे बळ मिळणार नाही.  ते बळ मिळाले की मग खरे जनलोकपाल बिल,  निवडणूक सुधारणा बिल आणि इतर अनेक सुधारणांचा मार्ग मोकळा होईल.  तेव्हा आपली सर्व शक्ती एकवटून याच मुद्यावर आपण लक्ष केंद्रीत करावे अशी आमची विनंती आहे.
मूळ ध्येयापासून लक्ष विचलित करण्यासाठी जे अनेक फाटे
मुद्दाम फोडले जात आहेत,  त्यातीलच हा एक.  आपण  पाकिस्तानच्या आंदोलनासाठी मार्गदर्शक म्हणून तिकडे गेलात तर सर्वात जास्त आनंद इथल्या ’दागी’ नेत्यांना होईल,  की जे तुमचे विधिनिषेधशून्य,  बलवान आणि कट्टर विरोधक आहेत.  भारतात येऊन काय वाटेल ते करण्याची जणू अलिखित परवानगीच येथील भ्रष्ट राज्यकर्त्यांनी पाकिस्तानला दिली आहे.  पण पाकिस्तानने आपल्याला दिलेली नाही हे लक्षात घेतले पाहिजे.   पाकिस्तानात गेल्यावर त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घातल्याबद्दल तुम्हाला अटक  केली गेली तर त्यांना दोष देता येईल काय?   शिवाय तुम्हाला तेथे अडकविल्याने त्यांचाही फायदा आहे.  तुम्ही तेथे अडकून पडलात तर येथील तुमच्या आंदोलनाला ब्रेक लागेल.  येथील भ्रष्टाचारी सरकार टिकून राहील.  ते टिकण्यात पाकचेही हितच आहे.  तुमच्या जीविताला तेथे कांही घातपात होईल ही शक्यता वाटत नाही;  उलट ते तुम्हाला चांगली वागणूक देतील.  फक्त अडकवून ठेवतील.  घातपात करणे रामलीला मैदानावर त्यांना सहज शक्य होते.  पण असा मूर्खपणा त्यांनी त्यावेळी केला नाही.  तुम्हाला तिकडे अटक झाली तर इकडल्या आंदोलनाला भयानक ब्रेक बसेल.  सरकार तुम्हाला सोडवून आणायचे प्रयत्न केल्याचे दाखवेल पण खर तर तुमची सुटका लांबणीवर पडण्यातच त्यांचे हीत नाही काय?  कदाचित तुमच्या बदल्यात सर्व अतिरेक्यांना सोडवून घेण्याची संधी पाकिस्तानला अनायसे मिळेल.  पुन्हा आपले सरकार असे करावे लागल्याचे पाप मानभावीपणाने तुमच्या माथी मारेल.  कुणी सांगावे शिष्टमंडळाची तुमच्याशी विनासायास भेट घडवून आणण्यात असे सुप्त  हेतू असतीलही.  हे सर्व लक्षात घेता नुकतेच सुरू झालेले इथले अति महत्वाचे कार्य सोडून पाकिस्तानात जाणे महत्वाचे आहे काय याचा आपण पुन्हा  विचार करावा.   त्याऐवजी त्या पाकी शिष्टमंडळाला,   तुमच्या या आंदोलनाचा एकलव्याच्या धर्तीवर अभ्यास करायचा सल्ला द्यावा आणि शुभेच्छाही द्याव्यात.  आपण त्यांना अंगठा मागणार नाही आणि इतर कोणी मागितला तर ते देणारही नाहीत.  आपण यावर विचार करावाच असा आमचा हट्टाग्रह आहे.