ऑक्टोबर २२ २०११

अमेरिका मुर्दाबाद!

पाकिस्तानातील एका बाजारात ’अमेरिका मुर्दाबाद’च्या घोषणा देणार्‍या पाकिस्तानी नागरिकांचा "वॉल स्ट्रीट जर्नल"मध्ये गेल्या बुधवारी प्रसिद्ध झालेला फोटो खूप लोकांनी पाहिला असेल. पाहिला नसेल तर तो दुवा क्र. १ इथेही पहाता येईल. सगळ्यात पुढे डाव्या बाजूला संतापाने वेडा-वाकडा झालेल्या चेहर्‍याचा एक दाढीवाला माणूस आणि त्याच्या आजूबाजूला यथा-तथा कपडे घातलेले १०-१५ लोक! पण नीट पाहिल्यास दिसेल कीं खरी परिस्थिती तशी नाहीं कारण या निदर्शकामागील हे लोक छद्मीपणे हसताना दिसत आहेत!

त्या निदर्शकांच्या हातात फलक आहेत आणि ते निदर्शक वार्ताहारांच्या पुढे-पुढे करत आपापले फलक कॅमेर्‍यांच्या भिंगांसमोर आणत आहेत. फलकांवर "अमेरिका मुर्दाबाद", "अमेरिकेला चेचून टाका" यासारख्या घोषणा लिहिलेल्या आहेत. यातले बहुसंख्य निदर्शक जहालमतवादी वृत्तपत्रांच्या पाठिंब्यावर जमविलेले होते[१]. ओसामा बिन लादेन यांच्या मृत्यूनंतरही "ISI झिंदाबाद"च्या फलकांसह अशीच निदर्शने इस्लामाबादला झाली होती!

यातल्या "अमेरिकेला चेचून टाका" या फलकाने मला (मला म्हणजे कामरान शफींना) ४१ वर्षे मागे नेले आणि त्यावेळच्या "भारताला चेचून टाका" मोहिमेची आठवण करून दिली. ही मोहीम पाकिस्तानी लष्कराने एका लाहोरहून प्रकाशित होणार्‍या उर्दू वृत्तपत्राच्या सहकार्याने उभी केली होती[२]. आजच्या तरुण पिढीतील पाकिस्तानी वाचकांना या ४१ वर्षांपूर्वीच्या मोहिमेची माहितीसुद्धा नसेल. कारण ही मोहीम पाकिस्तानच्या त्यावेळी झालेल्या विभाजनाच्या निषेधार्थ होती. या विभाजनात स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीने पाकिस्तानचा अर्धा भूभाग कापला गेला होता आणि तिचे अर्ध्याहून जास्त नागरिक विभक्त होऊन ’बांगलादेश’चे नागरिक झाले होते.

त्यावेळी आपण एका आर्थिकदृष्ट्या दुबळ्या[३] पण आपल्याहून खूप मोठ्या देशाला चेचून टाकायला निघालो होतो. तसे पहाता शस्त्रास्त्रांबाबत आपली आणि भारताची बर्‍यापैकी बरोबरी होती. पण यावेळी काय परिस्थिती आहे? यावेळी आपण कुणाला चेचून टाकायला निघालोय? आपण निघालोय अमेरिकेला चेचून टाकायला! जगातल्या एकुलत्या एक महासत्तेला! आपले लष्कर आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठी, आर्थिक मदतीसाठी आणि नैतिक पाठिंब्यासाठी ज्या महासत्तेच्या औदार्यावर अवलंबून असते आणि ज्या महासत्तेच्या पाठिंब्याच्या बळावरच पाकिस्तानी सरकार सार्‍या जगावर गुरगुरत "दादागिरी" करत असते त्याच महासत्तेला चेचून काढायला आपण निघालो आहोत!!

अलीकडेच "अमेरिकेला चेचून टाका" मोहीमवाल्या एका जिहादी लेखकाने त्याच्या ब्लॉगवर "अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला कशी आली" याबद्दल नेमकी माहिती वाचकांना देण्यासाठी त्याच्या ब्लॉग-वाचकांना आवाहन केले आहे. मी (शफीसाहेबांनी) जेंव्हां १९६५ सालच्या भारताबरोबरच्या लढाईनंतर पाकिस्तानी खड्या सैन्यात कमिशन घेतले (इमर्जन्सी कमिशन नव्हे) त्यावेळी मी जे पाहिले ते खाली देत आहे.

मी पाकिस्तान मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेत असताना आम्हाला ब्रिटिश काळातल्या "No.4 Mk 1" या बोल्ट-ऍक्शनवाल्या रायफलवर आणि .३०३ लाईट मशीन गन (LMG) वर प्रशिक्षण दिले गेले होते. मे १९६६ मध्ये आम्ही जेंव्हां आमच्या पहिल्या तुकडीत (unit) प्रवेश करते झालो त्यावेळी आम्हाला अमेरिकन बनावटीची अर्ध स्वयंचलित (semi-automatic) .30 M-1 रायफल आणि .30 Browning स्वयंचलित रायफल (BAR) light machine gun आणि .३० भारी machine gun दिली गेली. ही सारी शस्त्रें कोरियन युद्धाच्या वेळची उरली-सुरली शस्त्रें होती व ती त्या युद्धाच्या समाप्तीनंतर पाकिस्तानकडे वळविण्यात आली होती.

आम्हाला भली मोठी M38 Willys जीपही मिळाली होती. आम्ही गमतीने तिला "छोटी विली" (Little Willy) म्हणायचो. फारच तगडी असलेली ही जीप नेऊ तिथे जायची व पडेल ते काम करायची. पुढे हिचा M-38 A-1 असा नवा (आणि सुधारित) अवतारही आला. ही जीपही कुठेही जायची आणि कांहींही करायची. ही M38 तावी नदीतून नेलेले मला आजही आठवते. त्यावेळी तिचा exhaust pipe पाण्याखाली दोन फूट होता. याखेरीज पाऊण टनी डॉज गाडी, अडीच टनी कार्गो गाडी आणि पॅटन रणगाडे व F-86, F-104, F-16 जातीची लढाऊ विमाने, C-130 ही सैनिक आणि माल वाहून नेणारी विमाने आणि ORION-P3C ही पाणबुडी-विनाशक (Anti-submarine) विमानेही मिळाली होती. (सारी ORION-P3C विमाने अलीकडेच अल कायदाच्या आतंकवाद्यांच्या मेहरान येथील नाविक हवाई तळावरील हल्ल्यात नष्ट झाली ही किती नामुष्कीची गोष्ट आहे!). या खेरीज नौदलातील जहाजे, क्रूझर्स, पाण्यातील सुरुंग काढणारी जहाजेही अमेरिकेकडूनच मिळाली होती. हा सारा इतिहास इतक्या सहजपणे विसरणार्‍या आपल्या (पाकिस्तानी) लोकांचा धिक्कारच केला पाहिजे!

अमेरिकेची क्षमा मागण्याचा माझा मनसुबा नाहीं. कारण मी अमेरिकेकडून जास्त साह्य मिळावे म्हणून कांही मूलभूत बदल करणार्‍या अयूब खानपासून ते जुलमी झिया आणि वाईट चिंतणार्‍या मुशर्रफपर्यंतच्या लष्करशहांना पाठिंबा देणार्‍या त्यांच्याधोरणाचा पुरस्कर्ता मुळीच नाहीं. मी फक्त गेल्या कित्येक दशकांच्या आपल्या लष्करासंबंधीच्या अमेरिकेच्या औदार्याची माहिती इथे देत आहे. दुर्दैवाने आपले लष्कर या औदार्याला (तथाकथित) राष्ट्रीयतेच्या नांवाखाली ओळखत नाहीं असे वाटते.

हे कृत्य म्हणजे बेइमानीची आणि दुटप्पीपणाची हद्दच आहे. हा प्रचार केवळ स्वतःच्या उणीवापासून व अलीकडील अबोटाबादच्या (Abbottabad) बिन लादेनच्या हत्त्येपासून आणि मेहरान येथील नाविक हवाईतळावरील पीछेहाटीपासून जनतेचे लक्षदुसरीकडे वळविण्यासाठी केला जात आहे. या घटनांमुळे आपल्या लष्कराचा नाकर्तेपणा आणि भोंगळपणा सार्‍या जगाला दिसलेला आहे. अशा लटक्या उन्मादाने आणि दुराग्रहाने रचलेली निदर्शनें वापरून असल्या समस्या दृष्टिआड सारता येतात. या समस्यात मग "नाहीशी" केलेली माणसे आणि सलीम शहजादसारख्या वार्ताहाराचा अमानुष आणि निर्दय खून वगैरेसारख्या गोष्टीही येतात.

सलीम शहजाद यांच्या अमानुष खुनानंतर ISI ने अतिशय आढ्यतेने आपल्या "चमचा" मीडियाद्वारा जाहीर केले होते, कीं ते त्याच्या खुनाचा छडा लावण्यात कसलीही कसर ठेवणार नाहींत आणि त्यांच्या खुन्याला पकडतील. खरे तर या खुनाच्या संशयाच्या सार्‍या खुणा ISI च्याच दिशेनेच बोट दाखवीत होत्या. आता या खुनाला चार महिने होऊन गेले पण त्यांच्या खुन्याला अद्यापही अटक झालेली नाहीं. थोडक्यात ISI वाले जी ऐट मिरवतात त्यात कांहींच दम नाहीं.

पुन्हा एकदा आपल्या ’रोमेल’ आणि ’गुडेरियन’ची[४] ऐट दाखविणार्‍या आपल्या सेनाधिकार्‍यांच्या लुटपुटीच्या "सात्विक" संतापाकडे वळू. अमेरिकेवर ते किती अवलंबून आहेत आणि कसे अमेरिकेच्या मिठीत आहेत हे या सेनाधिकार्‍यांना चांगले माहीत आहे. अमेरिकेने सार्‍या जगापुढे त्यांचा दुटप्पीपणा जाहीर केलेला आहे. आपले लष्कर कसे वाईट लोकांशी शय्यासोबत करत आहे हे सार्‍या पाकिस्तानी जनतेला माहीत झाले आहे मग अमेरिकेला राग आल्यास त्यात त्यांचे काय चुकले? आणि अफगाणिस्तानमधील भावी राजवटीत मोलाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने वापरले जाणारे चुकीचे परराष्ट्र धोरण अद्यापही तसेच आहे. मग तालीबान, आणि तालिबानचे मित्र हक्कानी वगैरे पाकिस्तानच्या दृष्टीने चांगले कसे? कारण त्यांची आतापर्यंतची कृत्ये एकजात वाईटच आहेत.
--------------------
टिपा:
[१] त्या मानाने भाड्याने घेतलेली तट्टेही खूप कमी दिसत आहेत!-अनुवादक
[२] पाकिस्तानी मीडिया आणि पाकिस्तानी वृत्तपत्रें त्यांच्या लष्कराला आणि ISI संस्थेला Deep State या नावाने संबोधतात!
[३] हे मूळ लेखक कामरान शफी यांचे मत आहे आणि १९७१ साली ते बर्‍याच अंशी खरेही होते!
[४] दुसर्‍या महायुद्धातले सुप्रसिद्ध आणि पराक्रमी जर्मन सेनाधिकारी. इथे लेखकाने सध्याच्या पाकिस्तानी सेनाधिकार्‍यांची टर उडविण्यासाठी त्यांची उपमा दिलेली आहे!

(पाकिस्तानी फौजेतील माजी वरिष्ठ अधिकारी कामरान शफ़ी हे पाकिस्तानचे खूप विख्यात स्तंभलेखक आणि समालोचक आहेत. त्यांनी डेली टाइम्स, डॉन सारख्या वृत्तपत्रांत लेखन केलेले असून सध्या ते ’एक्सप्रेस ट्रिब्यून’साठी लिहितात. वरील लेख ’एक्सप्रेस ट्रिब्यून’मध्येच २९ सप्टेंबर २०११ रोजी सर्वात प्रथम प्रसिद्ध झाला होता. बेनझीर भुत्तोंच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांचे वृत्तपत्र सचिव होते).


(या कामरान शफी यांनी लिहिलेल्या आणि २९ सप्टेंबर २०११ रोजी "एक्सप्रेस ट्रिब्यून"मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या "Hate America, Crush America" या सुंदर लेखाचा मी अनुवाद केलेला आहे. हा आजच ई-सकाळवरही प्रकाशित झालेला आहे. या लेखात आलेले प्रथमपुरूषी उल्लेख लेखकाबद्दलचे आहेत. )

Post to Feed
Typing help hide