ऐसी अक्षरे : नव्या संकेतस्थळाची घोषणा व हार्दिक निमंत्रण

नमस्कार.
 
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर  'ऐसी अक्षरे' नावाच्या नव्या मराठी संवादस्थळाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
 
मराठीमधील लेखनातून, मग ते ललित असो की वैचारिक, माहितीपूर्ण असो किंवा खेळीमेळीच्या गप्पाटप्पा असोत - लेखकांचे व वाचकांचे जीवन काही अंशांनी समृद्ध करणे, हे 'ऐसी अक्षरे' चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आंतरजाल हे मराठी साहित्यनिर्मितीचे व वाचनाचे माध्यम म्हणून समृद्ध करणे हे त्याला पूरक उद्दिष्ट आहे. हे साधण्यासाठी लेखकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला प्रोत्साहन, उत्तम लिखाणाची व लेखकांची विशेष नोंद, लिखाणाला श्रेणी देण्याची सुविधा देणे याद्वारे प्रयत्न केला जाईल. सदस्यांनी एकमेकांशी सुसंवाद साधण्याची क्षमता हे संकेतस्थळांचे बलस्थान आहे. त्याचा वापर करून घेण्यासाठी समधर्मी सदस्यांना हितगुज करण्याची संधी उपलब्ध असेल. नियमितपणे काही सांस्कृतिक कट्टे आयोजित करून त्यात आपापल्या क्षेत्रात मान्यवर ठरलेल्या व्यक्तींना बोलावण्याचा मानसही आहे. यातून पारंपारिक माध्यमे व आंतरजालीय माध्यम यांमधील दरी कमी होईल अशीही आशा आहे.
 
संकेतस्थळाचे अधिकृत उद्घाटन दिवाळीच्या दिवशी होईल. पण आत्ता या घडीला संस्थळ कार्यरत आहे. तिथे येऊन आपला आयडी राखून ठेवावा, व ह्या संकेतस्थळाच्या बाळरूपाविषयी तुमचे अभिप्राय, सूचना, अडचणी, प्रश्न अवश्य कळवा ही विनंती. तसेच आपण सर्वांनी आपुलकीने लेखन करून व उत्तम लेखनाला प्रतिसाद देऊन सहभागी व्हावे हीदेखील मनापासूनची इच्छा.

'ऐसी अक्षरे' वर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत!