आनंद वाटणारा देव !

देव-आनंद यांना एका चाहत्याचा मानाचा मुजरा,

नावातच आनंद असणारा माझा सर्वात आवडता कलाकार, काळाच्या पडद्याआड गेल्याचे समजले आणि मी मिनिटभरताच  गाईड, जॉनी मेरा नाम, हम दोनो, बाझी, नौ-दो-ग्यारह,काला बाजार, तेरे घर के सामने -- अश्या कितीतरी सिनेमांची नावे डोळ्यासमोर तरळून गेली...

सध्या म्हणजे, १९९० नंतर=> नव्या जमान्यातली सिनेमा/गाणी/संगीताची खास चव उरलेली नाही, नुसता धांगडधिय्या आणि अंगप्रदर्शन ह्यामध्येच सगळे सिनेमा उरकतात. - अशी हमखास टिका होते ! आणि बहुतांशी ते खरे देखील आहे असे मला वाटते. अगदी बोटावर मोजण्याएवढे दर्जेदार अपवाद सोडले तर बाकी सगळेच 'गल्लाभरू' ह्या कॅटॅगरी मध्ये येतात. असो आजचा विषय तो नाही, आणि त्यावर जास्त बोलण्यात अर्थ देखिल नाही !

देव आनंद आणि माझी कधी समोरासमोर भेट झाली नाही, परंतु खूपं इच्छा होती भेटीची ( अगदी लक्ष्मीकांत बेर्डेसारखीच). मी लहानपणी चित्र-आकलन होऊ लागले तेव्हापासून देव आनंद ची गाणी पाहत ऐकत आलो आहे, घरी आई-बाबा जुन्या गाण्यांच्या व्हिडिओ कॅसेट लावायचे तेव्हा १० पैकी ५ गाणी देव साहेबांचीच होती  तेव्हापासून कळत नकळत थोडी देव-आनंद स्टाइल कॉपी होऊ लागली. 

शाळेत मॉनिटर रोज एक सुविचार लिहायचा, आणि आम्हाला तो वर्गवाणीच्या वहीत लिहावा लागायचा...ज्या दिवशी काही नवीन मिळणार नाही तेव्हा २ सुविचार ठरलेले असायचे,

१) दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही.!

२) केस वाढवून देव-आनंद (आणि इथे हमखास देवानंद असे लिहिले जायचे) होण्यापेक्षा  ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा !

दुसरा सुविचार कायम डोक्यात जायचा, आणि मी ह्या वाक्याला कधीही मान्य करण्यास तयार नसायचो !- हा सुविचार म्हणून असायच्या त्या दिवशी मी जागा रिकामी ठेवून घरी जाऊन काहीतरी शोधून लिहायचो पण हे लिहिणे मला मान्यच नव्हते !! फक्त केस वाढले म्हणजे देव-आनंद होता येते काय? की फक्त ज्ञानाने तुम्हाला कोणी विवेकानंद म्हणणार? उगीच आपले ट-ला-ट जोडून काहीतरी यमक जुळवायचे आणि सुविचार म्हणायचं!

उत्तम संवादफ़ेक, नृत्य (उत्तम नसले तरी बीभत्स नक्कीच नाही), आणि जबरदस्त संवाद-कथानक मिळालेले सिनेमे. जेवढे बघितले तेवढेच पुन्हा पाहण्याजोगे !! आणि अगदी सगळा सिनेमा नाही, तरी देव-आनंद ची गाणी तर नक्कीच अजरामर आहेत ! ह्या माणसाच्या आयुष्याला कितीतरी पैलू आहेत ते विकिपीडिया/गूगल वर एका क्लिक मधून समजेलच.

मध्यंतरी "हम दोनो" हा सिनेमा इस्टमनकलर मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा मी मंगला टॉकीज ला तिकिट काढून गेलो होतो, मधलेच तिकिट मिळाले होते - माझ्या एका बाजूला एक आजी आजोबा बसले होते, आणि दुसरीकडे ३ साठीच्या आसपासची माणसे, - मी गॉगल, जॅकेट काढले, जागेवर बसलो, हँडग्लोव्हस काढले आणि मोबाईल सायलेंट केला, माझे अत्याधुनिक वागणे पाहून त्यांचे तिकिट पुढे करत आजोबा मला म्हणाले - हम दोनो' इथेच लागणार आहे ना ? का आम्ही मल्टिप्लेक्स चा स्क्रीन चुकलोय ते सांगता का प्लीज ? !

मी आजोबांना म्हणालो, आजोबा हाच आहे हॉल आणि मी सुद्धा हम दोनो पाहायलाच आलोय, त्यांना एवढा आनंद झाला ह्या वाक्याचा - आजी म्हणाल्या देव आनंद लहान-थोर सर्वामध्ये प्रसिद्ध आहे म्हणजे  ! सिनेमा संपेपर्यंत आजी-आजोबा माझ्याशी गप्पा मारत होते, इंटरवल मध्ये वडापाव खाताना त्यांच्या जुन्या आठवणी सांगत होते आणि मधून मधून ब्लॅक&व्हाईट च्या वेळी आणि ही नवीन निर्मिती अशी कंम्पॅरिझन पण करून सांगत होते  !

सिनेमाच्या सुरवातीलाच अत्यंत नम्रपणे देव आनंद प्रस्तावना करून सिनेमाची सुरुवात होते. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की हम दोनो च्या रंगीतीकरणानंतर बाकी सुद्धा प्रस्तावित सिनेमा रंगीत करण्याचा मानस होता, पण आता बहुदा आपण सगळेच त्या आनंदाला मुकणार आहोत,  कदाचित सिनेमा रंगीत मिळेलसुद्धा पण त्याच्या सुरुवातीला प्रस्तावनेसाठी आता  "आनंद" मिळणार नाही !

पुण्यात डेक्कन ला लकी नावाचे एक रेस्टॉरंट होते त्यामध्ये देव-आनंद ह्यांचा एक खूप मस्त फोटो होता, आम्ही जेव्हा जेव्हा तिथे चहा प्यायला जायचो तेव्हा तेव्हा कायम देव आनंदची गाणी आपसूक'च तोंडातून बाहेर पडायची. आणि संपूर्ण माहोल फ्रेश होऊन जायचा.

"मैं जिंदगी का साथ निभाता चला गया" म्हणत सगळी दुःखे विसरवणारा, "अपने पे भरोसा है तो एक दांव लगा ले" ह्या ओळींवर खोल विचार करणारा, "याद किया दिल ने कहॉं हो तुम", "चुडी नही ये मेरा दिल है","फुलों के रंग से", "रुक जाना ओ जाना", "अभी ना जाओ छोडकर" म्हणत नायिकेसाठी नाचत गात आपले प्रेम व्यक्त करणारा, "ये दिल ना होता बेचारा", "है अपना दिल तो आवारा", "जो भी प्यार से मिला" च्या तालावर गेला दिवस आपला म्हणणारा.   एक जिंदादिल, चिरतरुण आणि रसिकप्रिय देव-आनंद आपला निरोप घेऊन "यहाँ कौन है तेरा" नियम सिद्ध करत  पुढच्या सफरीवर गेला आहे.

एक देव - दुसऱ्या देवाच्या आत्म्याला शांती देवो !

--

आशुतोष दीक्षित.