आमु आखा... ३

© 2003 Dana Clark येथून साभार ***तर अशा या जीवनशाळांना वीस वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त, नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सातपुडा युवक मेळावा भरवण्यात आला होता. आजवर जीवनशाळेतून शिकून बाहेर पडलेल्या आणि सध्या शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांना एकत्र आणणे हा एक उद्देश. पण या निमित्ताने एकंदरीतच स्थानिक युवकांचे संघटन करणे आणि त्यांच्यासाठी एक निश्चित असा निर्माणात्मक, विधायक कार्यक्रम ठरवणे यासाठीही या मेळाव्यानंतरच्या दोन दिवसात, एक शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सुरुवातीला एक छोटीशी मिरवणूक. कार्यक्रमाला बोलावलेले प्रमुख पाहुणे, शिक्षक, विद्यार्थी, गावोगावाहून आलेले माजी विद्यार्थी, कृतज्ञ पालक आणि माझ्यासारखे हौशेनवशे अशी मिरवणूक निघाली. घोषणा चालू झाल्या. पण कुठेही अनावश्यक गंभीरपणा दिसला नाही. काही काही लहान मुली तर चक्क मेधाताईंबरोबरच चेष्टा मस्करी करत होत्या. एका मुलीने खट्याळपणे 'मेधाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशी घोषणा दिली तर तिचा कान पकडून एक हळूच चापट दिली गेली. मग सगळ्या मुली खदखदून हसू लागल्या. असं खेळीमेळीचं वातावरण. कानावर पडणारी भाषा चक्रावून टाकत होती. बरेचसे शब्द कळत होते. ओळखीचे होते. पण वाक्याचा अर्थ लागेल तर शपथ. मध्येच मराठीचा भास होत होता. मध्येच गुजराती. तर बरेचसे अगम्य. भाषेची लयही थोडी वेगळीच. ही इथली भाषा. आदिवासींची मातृभाषा. पावरी आणि भिलोरी. मराठी, हिंदी आणि गुजरातीचे संस्कार असलेल्या या भाषा. नर्मदा परिवारातील बहुतेक बिगर आदिवासी लोकही याच भाषांमधून अगदी सराईतपणे बोलत होते. मिरवणुकीतल्या घोषणाही मुख्यत्वे स्थानिक भाषेत आणि मग हिंदी, मराठी वगैरे भाषात. नर्मदेचं खोरं महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश असं तिन्ही बाजूंना पसरलेलं आहे. खरं तर नर्मदा नदी ही महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश यांची सीमाच आहे. या खोर्‍यातून प्रामुख्याने आदिवासींची वस्ती आहे. पावरा आणि भिल्ल या दोन्ही प्रमुख जमाती. या दोन्ही जमाती, तिन्ही राज्यात पसरलेल्या आहेत. पावरांची भाषा पावरी. पाडवी, पावरा, वसावे, वळवी अशी आडनावं प्रामुख्याने दिसत होती. मिरवणुकीतून चालताना गाव नजरेस पडत होतं. आपण एका अतिशय लहान आणि आधुनिकतेचा फारसा स्पर्श न झालेल्या गावात पोचलो आहोत हे जाणवत होतं. सगळ्याच सुविधा अगदी प्राथमिक म्हणाव्या अशा. गाव तालुक्याचं असल्यामुळे जरातरी लगबग. सरकारी कचेर्‍या, एक न्यायालय, एक आर्ट्स कॉलेज आणि शेपाचशे घरं. त्या घरांमधून जाणारे अक्षरशः: पाच दहा वीत रुंदीचे कच्चे रस्ते. एक मुख्य रस्ता. संपलं गाव. एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत रमत गमत चक्कर मारायला मोजून अर्धा तास लागेल. गावातल्या रस्त्यांवरून आदिवासींची संख्या लक्षणीय. त्यातले काही ठराविक पद्धतीचं आडवं लुंगीसदृश वस्त्रं नेसलेले. बायकांची साडीच, पण नेसायची पद्धत वेगळी. आपण काहीतरी वेगळ्याच जगात आलो आहोत, काही तरी वेगळं करतो आहोत अशा रोमांचकारी भावनेनं भारलेला मी, ते सगळं अधाशीपणे शोषून घेत होतो. मिरवणूक सभास्थानी पोचली. उपस्थिती जोरदार होती. स्त्रिया आणि मुलींची उपस्थिती पुरूषांच्या बरोबरीने होती. एक  भलाथोरला मांडव. एका बाजूला व्यासपीठ. प्रमुख मंडळी व्यासपीठावर बसली. त्यात बाहेरून आलेल्यांच्याबरोबरच अगदी पहिल्यापासून जीवनशाळांशी निगडित असलेल्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांचाही समावेश दिसत होता. रूढार्थाने अडाणी अशिक्षित असे ते बायकापुरूष कमालीच्या आत्मविश्वासाने तिथे विराजमान झाले होते. इतकेच नाही तर पुढे कार्यक्रमाच्या ओघात त्यांनी जोरदार भाषणंही केली. व्यासपीठाच्या पुढच्या बाजूला आदिवासी समाजातील काही प्रमुख ऐतिहासिक व्यक्तींची चित्रं लावली होती. तंट्या भिल्ल, बिरसा मुंडा यांच्या जोडीलाच फुले, आंबेडकर वगैरेही होते. प्रत्येक फोटोसमोर एक तीर जमिनीत रोवलेला. प्रत्येक फोटोसमोर एक एक दीप लावला गेला आणि कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले.

प्रेमापोटी...

सुरुवातीला सर्वच पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने झाले. म्हणजे, एका टोपलीत एक भलीमोठी रानकाकडी, काही सीताफळं आणि एक पंचा. अचानक काही कल्पना नसताना एकदम माझंही नाव पुकारलं गेलं. गडबडून गेलो. पण मंचाजवळ गेलो. मग अशीच एक टोपली मलाही देण्यात आली. मी तिथे आयुष्यात पहिल्यांदाच आलेला. ते ही नुसताच बघ्या म्हणून. सन्मान वगैरे काय? पण नंतर श्रावणने सांगितले की घरी आलेला पाहुणा, त्याचे यथोचित स्वागत व्हायला हवे या भावनेतून हे दिले जाते. तर ती टोपली मी हातात घेतली. परत खुर्चीकडे यायला निघालो तर मेधाताई म्हणाल्या की घोषणा द्या. माझ्या आधीही ज्यांचे ज्यांचे स्वागत झाले होते, त्यांनी घोषणा दिल्या होत्या. पण माझ्यावरही तीच पाळी येईल असे वाटले नव्हते. पण मेधाताई म्हणाल्या की तशी एक पद्धत आहे, तुम्हीही द्या घोषणा. सकाळपासून बर्‍याच घोषणा कानावरून गेल्या होत्या. पण जास्तीत जास्त ऐकलेली एक घोषणा माझ्याही तोंडून बाहेर पडली..... "आमु आखा..... "  माझा आवाज पडेल. फारसा दम अथवा जोर नसलेला. मूठही फारशी न वळलेलीच. लाजेकाजेस्तव दिलेली घोषणा... पण त्या माझ्या तसल्या ओरडण्यालाही समोरून अक्षरशः गरजत प्रतिसाद आला... ".... एक से. " "आपण सगळे एक आहोत. / हम सब एक है. "ची पावरी / भिलोरी आवृत्ती. जास्तीत जास्त कानावर पडणारी घोषणा. एकंदरीतच या चळवळीचं मूलभूत विचारसूत्र दाखवणारी. असं आगतस्वागत झालं आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. सूत्रसंचालक होता विजय वळवी. याच्याबद्दल सांगावेच लागेल. हा स्वतः आदिवासी समाजातील. शिकलेला. बी. पी. एड. (शारीरिक शिक्षण) केले आहे त्याने. नोकरीही करत होता. पण नर्मदा परिवाराच्या संपर्कात आला आणि मग पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. नोकरीत जितके कमावेल त्यापेक्षा खूप कमी मानधनावर काम करतोय. नर्मदा बचाओ आंदोलन हे मुळात सुरू झाले ते विस्थापितांसाठी. त्यांच्या हक्कासाठी. सगळेच आदिवासी काही विस्थापित नाहीत. त्यांना खरंतर आंदोलनाशी काही सोयरसुतक असण्याचे तसे कारण नसावेही. म्हणजे, नसले तर ते जगरहाटीला धरूनच म्हणता यावे. विजयही तसा विस्थापनाचे संकट न ओढवलेल्या, पण आदिवासी समुदायातलंच. ना त्याचे गाव बुडले ना घर-शेत. पण आता नर्मदा परिवार केवळ विस्थापन, पुनर्वसन वगैरे मुद्द्यांच्याही खूप पुढे आला आहे. एकूणच नवनिर्माणात्मक काम नर्मदा परिवाराच्या एकंदर कार्याचा बहुतांश भाग व्यापतो आहे याचे विजयसारख्या तरूणांना परिवारात यावेसे वाटते हे द्योतक आहे. अर्थात, पुनर्वसन हे अजूनही झालेले नाहीये, होत नाहीये त्यामुळे ते मुख्य आणि कळीचे मुद्दे आहेतच. पण आदिवासींसाठी सामाजिक आणि रचनात्मक कामे खूपच जोमाने चालू आहेत. जीवनशाळांचे काम हे त्यातलेच एक मुख्य.

केवलसिंग गुरुजी

कार्यक्रमाची सुरुवात, जीवनशाळांच्या प्रवासात अगदी सुरुवातीपासून सामील असलेल्यांच्या मनोगतापासून झाली. सगळ्यात आधी बोलले. केवलसिंग वसावे. आदिवासींपैकी जे काही थोडेफार शिकलेले तरुण होते त्यापैकी एक. त्यांचे गाव निमगव्हाण, ता. अक्राणी (धडगाव) हे बुडितातले एक गाव. त्या माध्यमातून आंदोलनाशी जोडले गेले. जेव्हा जीवनशाळा सुरू झाल्या तेव्हा त्यांनी मग पूर्णपणे त्याच कामाला वाहून घेतले. त्यांच्या गावी सुरू झालेली जीवनशाळा ही दुसरी. ता. १४ ऑगस्ट १९९२ला सुरू झालेली. तेव्हापासून आजतागायत, अगदी निष्ठेने या कामाला सर्वस्वी वाहून घेतलेला माणूस म्हणजे केवलसिंग गुरुजी. आता ते वडछील (शोभानगर) या पुनर्वसित गावातील जीवनशाळेचे काम बघतात. त्यांनी जीवनशाळांच्या कामाचा आणि सद्यस्थितीचा थोडक्यात आढावा घेतला. आजपर्यंत आदिवासींचा ज्ञात इतिहास हा नागर संस्कृतींशी संबंध आल्यानंतरचा आहे. हा इतिहासही नागर संस्कृतींनी मांडलेला आहे. आदिवासीमध्ये जी मौखिक इतिहासाची परंपरा आहे ती जपली पाहिजे आणी यापुढचा इतिहास हा आदिवासींनी एक निश्चित अशी भूमिका घेऊन जाणीवपूर्वक घडवला पाहिजे असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. जीवनशाळातून शिकून बाहेर पडलेल्या आणि नंतरच्या आयुष्यात भरीव असे काही करणार्‍या काही माजी विद्यार्थ्यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला. त्याही विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत अतिशय सुरेख पद्धतीने व्यक्त केले. जीवनशाळेतील काही माजी विद्यार्थी, पुण्याजवळील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्यापैकी काहीजण या कार्यक्रमाला आवर्जून आले होते. त्यांनी मारलेली भरारी थक्क करणारी आहे. त्यांच्यापैकी कोणी राज्य तर कोणी राष्ट्रीय पातळीवर खेळतो आहे. नजिकच्या काळात, यातले काही खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करायची शक्यता खूपच जास्त आहे. भीमसिंग नावाचा एक खेळाडू इतका मोलाचा आहे की बारावीची परीक्षा देता यावी म्हणून शासनाने त्याला विमानाने झारखंडला नेले आणि परत आणले. तो म्हणाला, "आम्ही जेव्हा आकाशात विमान बघत असू तेव्हा आम्हाला हे ही कळत नव्हते की ते विमान आहे, त्यात माणसं बसून प्रवास करतात. पण आज मी शिकलो, बाहेर पडलो, खेळाडू झालो आणि मला सरकार विमानातून घेऊन गेले. जीवनशाळेत गेलो नसतो तर इथेच कुठे एखाद्या पाड्यावर अडकून पडलो असतो. " सगळीच मुलं मनापासून बोलली. या कार्यक्रमाच्या आधी साधारण बारा पंधरा दिवस, मुंबईहून श्री. अमरजित आमले यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईहून स्पंदन नावाचा एका नाट्यविषयक ग्रुप धडगावात आला होता. त्यांनी जीवनशाळातील काही मुलांसाठी नाट्यप्रशिक्षण शिबिर तिथे घेतले होते. मुलांनी अगदी भरभरून त्या सगळ्या उपक्रमाला प्रतिसाद दिला होता. या मुलांनी एक छोटेसे नाटक करून दाखवले. नाटकाची गोष्टही, अपरिहार्यपणे, तिथे चाललेल्या संघर्षाबद्दलच होती. अजून काही भाषणं झाली आणि दिवसभराचा कार्यक्रम संपला. पण आदिवासींचा कोणताही कार्यक्रम नाचाशिवाय संपत नाही. त्याप्रमाणे मग नाच सुरू झाला. पोरंच काय पण मोठे स्त्रीपुरुषही मग बेभान नाचले. चांगला अर्धापाऊण तास नाच झाल्यानंतरच मग कार्यक्रमाची सांगता झाली. या पहिल्या एका दिवसातच माझ्याकानावरून खूप काही गेलं होतं. इतरांकडून ऐकणं आणि प्रत्यक्ष त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींकडून अनुभवकथनाच्या रूपाने ऐकणं यात आकलनाच्या दृष्टीने खूप फरक पडतो. इतके सगळे ऐकले होते की एखाद्या जीवनशाळेला भेट देता येईल का असे वाटू लागले होते. पण या सगळ्या रगाड्यामध्ये कोणाला विनंती करावी की आमच्यासाठी एखादी धावती भेट जमवता येईल का हे मला नको वाटत होते. शिवाय जीवनशाळा सगळ्या अगदी नर्मदेच्या किनारी बुडितातल्या भागात असतील, म्हणजेच खूप लांब वगैरे असतील असा माझा तोपर्यंत समज होता. त्यामुळे हे सगळे काही जमणार नाही अशाच समजुतीत मी गप्पच बसलो. कार्यक्रम आटोपल्यानंतर, रात्रीच्या जेवणाच्या आधी, पुढच्या दोन दिवसांच्या शिबिराच्या तयारीची पाहणी करण्यासाठी एक बैठक भरली. त्या बैठकीत स्वतः मेधाताईंनीच 'जीवनशाळा बघायची आहे का? ' असे विचारले. आता एवढी छान संधी मी कसला सोडतो. प्रश्न पूर्ण व्हायच्या आत माझा होकार गेला होता. मग लगेच तिथेच सगळा प्रोग्रॅम ठरला. दुसर्‍या दिवशी पहाटे सहाच्या सुमारास निघायचे. धडगावपासून जवळच त्रिशुल नावाच्या गावी एक जीवनशाळा आहे. ती बघायची. तिथून जवळच बिलगाव नावाचे एक गाव आहे. तिथे मायक्रो पॉवरजनरेशनचा एक प्रयोग झाला होता. स्वदेस चित्रपट याच घटनेवर बेतलेला आहे. तो प्रयोग बघायचा, आणि परत यायचे असा कार्यक्रम ठरला. बडवानीची काही मंडळी आली होती शिबिरासाठी. त्यांच्याबरोबर आंदोलनाची जीप होतीच. त्यांच्यापैकी काही लोकांनाही यायचे होतेच. त्यामुळे सगळी व्यवस्था हातोहात झाली. दिवसभराच्या दमणुकीने रात्री झोप छान आणि अगदी गाढ लागली. पण जायच्या उत्सुकतेपोटी सकाळी लवकर उठताना फार त्रास नाही झाला. अंघोळ परत आल्यावरच करायची होती. त्यामुळे लवकर तयार झालो. सगळे एके ठिकाणी नव्हतो झोपायला. कोणी कुठे, कोणी कुठे असे झोपलो होतो. त्यामुळे सगळे जण, जिथे योगिनी, चेतन वगैरे कार्यकर्ते राहतात तिथे जमलो. बघतो तर मेधाताई स्वतः आमच्या साठी चहा करून वाट बघत होत्या. खरं तर दिल्लीहून एक पत्रकार बाई आल्या होत्या. दिवसभर निवांत वेळ मिळत नाही म्हणून रात्री सगळे निजल्यावर त्या दोघी बोलत बसल्या होत्या. मुलाखतच झाली. पत्रकार बाईच झोपल्या साडेबारा एकला. त्यानंतर मेधाताई झोपल्या असतील केव्हातरी. पण मंडळी वेळेवर जायला पाहिजेत आणि पोटात काहीतरी टाकून गेली पाहिजेत म्हणून मेधाताई, योगिनी आणि रेवती पहाटे लवकर उठून आमच्यासाठी चहा बिस्किटं तयार ठेवून वाट बघत होत्या! अंधारातच निघालो. त्रिशुलच्या दिशेने. रस्त्यातच सूर्योदय झाला. मोकळी हवा. हलकीशी थंडी. कमालीचा ताजेपणा जाणवत होता. साधारण पाऊणेक तास गाडी, आधी थोडावेळ डांबरी रस्त्यावरून आणि मग बराच वेळ कच्च्या रस्त्यावरून वळणं घेत, छोटे घाट ओलांडत जात राहिली. एकूणच सातपुड्यात सलग अर्धा किलोमीटरही रस्ता काही सरळ जात नाही. एखाद दोन वळणं येतातच तेवढ्यात. आजूबाजूला छोटे छोटे पाडे, वस्त्या दिसत होत्या. एके ठिकाणी गाडी थांबली. तिथून पुढचा रस्ता पायीच चालायचे होते. गाडी जात नाही शेवट पर्यंत. आमच्या नशिबाने पायी जायचे अंतर अगदीच थोडेसे होते. अगदीच अर्धाएक किलोमीटर. शाळा आली.आधी थोडावेळ एका कच्च्या रस्त्यावरून चालल्यावर एका शेतातून जावं लागलं. शाळेचे प्रशस्त आवार.बांबूच्या तट्ट्यांनी बनलेल्या खोल्या. विद्यार्थी इथेच राहतात. आणि इथेच वर्ग भरतात. हा वर्ग इयत्ता तिसरीचा. संवाद. जीवनशाळेशी संबंधित सगळी माहिती तक्त्यांच्या रूपात कार्यालयात लावण्यात आली होती. कर्मचारी किती, कोण, त्यांच्या जबाबदार्‍या, गावप्रतिनिधी कोण, कुठले, इतर सांख्यिक माहिती वगैरे सगळंच. माहितीच्या अधिकाराचा कायदा आता झाला आहे. त्यातल्या सेक्शन ४ प्रमाणे जी काही माहिती एखाद्या आस्थापनात जाहीरपणे लिहून ठेवावी लागते त्यातली बहुतेक सगळी माहिती जीवनशाळांमधून नीटपणे दाखवलेली असते. आणि गंमत म्हणजे हे सगळे ते करत आहेत, हा कायदा त्यांना लागू नसतानाही! जीवनशाळांमधून, मुलांना शिकवायला, निरनिराळ्या संकल्पना समजवून द्यायला विविध प्रकारचे साहित्य वापरले जाते. हे साहित्य, शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या तज्ज्ञाने बनवलेले आहे आणि जीवनशाळांना मदत म्हणून पुरवले गेले आहे. इतकेच नव्हे तर जीवनशाळांमधील शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शनपर शिबिरांनाही पाठवले जाते. हे आहे त्रिशुल जीवनशाळेतले साहित्य. शैक्षणिक साहित्याबरोबरच ढोलकीही आहे. नाचगाणे हे आदिवासींच्या अंगी उपजतच असते असे म्हणाले तरी चालेल.या सगळ्या साहित्याचा उपयोग आपण कसा करतो हे समजावून सांगत आहेत, त्रिशुल जीवनशाळेतील एक शिक्षक, श्री. तुकाराम पावरा. ते स्वतः जीवनशाळेतून शिकून गेले आहेत. आणि आता पुढील शिक्षण संपवून ते परत जीवनशाळेत शिक्षक म्हणून आले आहेत. अतिशय तळमळीचा कार्यकर्ता. सगळे आयुष्य याच कामी घालवायचा निर्धार आहे त्यांचा.या जात्र्याबाई. इथल्या मावशी. स्वयंपाक, साफसफाई, इतर कामे करतात. आंदोलनात खूप पूर्वीपासून सहभाग. पार दिल्लीपर्यंत जाऊन आल्या आहेत. तिथेच मागच्या बाजूला गावच्या कारभार्‍याचे घर होते. कारभारी म्हणजे गावच्या पाटलासारखा. शाळेला दिवाळीची सुट्टी होती. त्यामुळे मुलं कोणीच नव्हती. पण हा एक छोटासा पण धीट मुलगा आमच्याकडे फारच कुतूहलाने बघत होता. मला त्याचे डोळे फार आवडले. त्रिशुळ येथील कार्यक्रम आटोपला. आम्ही बिलगावकडे निघालो. तिथल्या त्या प्रयोगाबद्दल कुतूहल होते. (गूगल मध्ये bilgaon असे सर्च केल्यास बरीच माहिती मिळते. वानगीदाखल हे बघावे. ) अर्धाएक तास प्रवास केल्यावर बिलगाव आले. एका उंचशा डोंगरावर, नदीच्या काठावर वसलेले गाव. नदी असलेल्या बाजूला दरी सारखी रचना, पण फार खोल नाही. नदीवर एक बंधारा घातलेला. याच बंधार्‍यातील पाण्याच्या साहाय्याने एक छोटासा जलविद्युतनिर्मितीचा प्रकल्प उभा केला गेला होता. ही साधारण २००३ सालातील गोष्ट आहे. या प्रकल्पातून तयार होणार्‍या विजेवर बिलगाव आणि आसपासच्या काही वस्त्यांवर चोवीस तास वीज मिळत होती. तसा हा भाग बुडिताच्या क्षेत्रापासून थोडा दूरच आहे असे सर्वेक्षण होते. तरीही, हा प्रकल्प उभारताना संबंधित आधिकार्‍यांशी विचारविनिमय करून, त्यांच्या परवानगीने उभारला होता. हेतू हा की सरदार सरोवरात पाणी भरले की होणार्‍या बुडितात हा प्रकल्प बुडून जाऊ नये. मात्र एवढी काळजी घेऊनही त्या नंतर आलेल्या पहिल्या पावसात जे पाणी चढले त्यात हा प्रकल्पही बुडून गेला! सरकारचे सर्वेक्षण चुकीचे होते हे मानायला सरकार आजही तयार नाही. अजूनही हा वाद चालूच आहे, आणि सरकारचे म्हणणे असे आहे की हे पाणी दुसर्‍याच काही कारणांमुळे चढले होते. आणि लोकांचे म्हणणे असे आहे की पाणी चढण्याची कारणं धरणाशीच संबंधित आहेत. एक विहीरसदृश्य बांधकाम आणि त्यात येणारा एक कालवा एवढ्याच आता प्रकल्पाच्या उरलेल्या खुणा आहेत. बिलगावात आता वीज आहे का ते आठवत नाही. पण बहुधा नसावी. याच गावात एक सरकारमान्य आश्रमशाळा आहे. ती पण बघायला मिळाली. जीवनशाळेच्या पार्श्वभूमीवर, या शाळेची अवस्था (की दुरवस्था? ) प्रखरतेने उठून दिसली. एक वर्ग. छपराविना.बांधकाम चालू होते. मध्येच वादळ आले आणि काही छपरं उडून गेली! हे सगळे बांधकाम सिमेंट आणि पत्रे वापरूनच केले पाहिजे का? असा विचार मनात आला. तिथे गरमीही चांगलीच असते. दुपारी चांगलेच तापत होते. मग बांबूच्या तट्ट्यांच्या भिंती विद्यार्थ्यांना अधिक आरामदायक ठरल्या नसत्या का? उत्तरं शोधायला हवीत.अजून एक वर्ग, आणि भोकं असलेल्या छपरातून येणारं ऊन.कोरडी हवा आणि ऊष्णता यांचा परिणाम. एक मेलेला बेडूक. सडून जायच्या ऐवजी वाळून गेलेला. एव्हाना अकरा वाजत आले होते. ऊन भयानक तापले होते. आम्हाला नऊ वाजेपर्यंत परतायचे होते. पण अकरा इथेच वाजले. मग अजून कुठे भटकणे सोडून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. धडगावात पोचेतो बारा वाजत आले होते. एव्हाना शिबिर सुरू झाले असेल म्हणून मग तसेच थेट ऑफिसवर गेलो. शिबिराचे दोन्ही दिवसाचे कामकाज इथेच आयोजित केले होते. साधारण सत्तर ऐंशी युवक युवतींचा गट. त्यांनीच ठरवलेले होते की युवकांची एक संघटना उभी करायची आणि त्याद्वारे काही विधायक कामं हाती घ्यायची. संघटनेचे नाव 'नर्मदा युवा दल'. हे नावही सर्व ज्येष्ठाशी चर्चा करून ठरवलेले होते. या संघटनेची औपचारिक घोषणा आणि हाती घेण्यात येणार्‍या कार्यक्रमांबाबत विचारविनिमय आणि निर्णय असे शिबिराचे साधारण स्वरूप. "जल जंगल और जमीन, हो जनता के अधीन" हा एकंदरीतच आंदोलनाच्या उद्दिष्टांचा गोषवारा म्हणता येईल. स्थानिकांच्या सहभागाशिवाय, संमतीशिवाय कोणत्याही नैसर्गिक संसाधनांचा उपयोग होऊ नये ही मागणी आहे. आमच्या बरोबर पुण्याहून आलेल्या श्री. विनय र. र. या शिबिराच्या सुरुवातीला एक गमतीदार खेळ घेतला. साधारण दहा शब्द ठरवले गेले. ते एका फळ्यावर लिहिले. प्रत्येक शिबिरार्थीला एक कागद आणि पेन्सिल दिली. तो शब्द वाचताच मनात काय येते ते प्रत्येकाने त्या कागदावर लिहायचे. प्रत्येक शब्दाला दहा पंधरा सेकंद. हे सगळे कागद एकत्र करून त्याचा अभ्यास केला गेला. त्यातून जे काही निष्कर्ष किंवा उल्लेखनीय प्रतिसाद असतील ते जाहीर केले गेले. म्हणलं तर खेळ, पण म्हणलं तर या युवकांचा कानोसा घेणारी युक्ती. काही जणांनी जे लिहिलेले होते खरंच उत्तम होते, उत्स्फूर्त होते. एकाने लिहिलेली युवकाची व्याख्या खरंच अप्रतिम होती. त्याने लिहिलेले होते... "येणार्‍या कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरा जातो तो युवक. " श्री. विनय र. र.... शब्दांच्या खेळाचे निष्कर्ष जाहीर करताना.नुकत्याच स्थापन झालेल्या नर्मदा युवा दलाच्या वतीने कोणते कार्यक्रम हाती घेण्यात यावेत यासाठी शिबिरार्थींकडूनच त्यांची मतं घेण्यात आली. त्यांची मतं एका फळ्यावर मांडण्यात आली. फळ्यावरील सगळेच मुद्दे युवकांनी स्वतःच सुचवलेले आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर मग एक एक करून उलट सुलट चर्चा झाली. आणि मग तीन ते चार मुद्दे अंतिमतः निवडले गेले. या मुद्द्यांभोवती नर्मदा युवा दलाचा पहिला कार्यक्रम हाती घेण्यात येईल. त्या दिवशी रात्री, सरदार सरोवर धरण, विस्थापन, पुनर्वसन इत्यादी विषयांवर शिबिरार्थींना सविस्तर माहिती मिळावी म्हणून काही डॉक्युमेंट्रीज दाखवण्यात आल्या. नर्मदा नवनिर्माण अभियानातील बहुसंख्य कार्यकर्ते हे धरणाशी अथवा विस्थापनाशी थेट संबंध नसणारे आहेत. त्यांना त्या विषयाची माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. तिसरा दिवस, शेवटचा. चर्चासत्रं पुढे चालू झाली. जागोजागी समांतर कामं करणारे काही इतर कार्यकर्तेही या कार्यक्रमाला आले होते. त्यांनी त्यांचे अनुभव शिबिरार्थींसमोर मांडले. मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरे झाली. खालच्या डावीकडच्या फोटोत आहेत चिंचवड येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि मानवी हक्क संरक्षण समितीचेअध्यक्ष, श्री. मानव कांबळे. उजवीकडे, श्री. इब्राहिम खान.श्री. तुकाराम पावरा. वर त्रिशुल जीवनशाळेबद्दल लिहिताना यांच्याबद्दलच लिहिले आहे. जीवनशाळेतून शिक्षण घेऊन, पुढचे शिक्षण झाल्यावर परत जीवनशाळेत शिक्षक म्हणून परत आले. ही, ज्यांनी आतापर्यंत आंदोलनात जीवाभावाची साथ दिली, अशी काही व्यक्तिमत्त्वं.... यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा.हे नूरजी पाडवी. खोर्‍यातील प्रमुख कार्यकर्ते. त्यामुळे यांचा दरारा आहे परिसरात. तरुणपणात आजूबाजूच्या इलाख्यात टेरर म्हणून ख्याती. त्यावेळी ते एका कडव्या डाव्या संघटनेचे काम करत. पण पुढे, हिंसेचा (आक्रमकतेचा) त्याग केला, संपूर्णपणे शांततामय आणि लोकसंघटनाच्या मार्गाने चालणे जास्त फायदेशीर आहे हा दृढविश्वास. त्यांचे शब्द, "चर्चा केल्यानेच आम्हाला या काळात किमान काही लोकांसाठीचं पुनर्वसन मिळालं आहे. बाकीचे लोक इथं डोंगरांवर वर चढून राहू तरी शकतात. आम्ही हिंसाचार केला असता तर हे शक्य झालंच नसतं. मरण हाच निकाल ठरला असता. " हिंसा-अहिंसेच्या वादात याहून जास्त परिणामकारक विधान क्वचितच असू शकेल.राण्या डाया. वय सत्तरीच्या आसपास. अगदी सुरुवातीपासून आंदोलनात सक्रिय सहभाग. यांना यांच्या आधीच्या बारा पिढ्यांची नावे, त्यांच्या कहाण्या मुखोद्गत आहे.   मौखिक परंपरेने इतिहास जतन करणे ही इथली पद्धत. पण आता जीवनशाळेतल्या काही शिक्षकांनी हे सगळे नीट लिहून काढायला सुरुवात केली आहे. गावाचा इतिहास, ते गाव कसे वसले, तिथे कोण कोण नांदून गेले वगैरे. यांचं नाव विसरलो. याही गेल्या पंचवीसेक वर्षांपासून आंदोलनातल्या साथीदार. तीनही दिवस अतिशय बारीक लक्ष देऊन सगळं ऐकत होत्या. शेवटच्या दिवशीच्या चर्चेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अचूक बोलल्या. मेधाताईंनी शिबिरार्थींना काळ्या पैशाची व्याख्या विचारली. नेमकी उत्तरं येईनात तेव्हा या बाईंनी नेमकं उत्तर दिलं, पावरी भाषेत, "ज्याचं अकाउंटिंग ठेवलं जात नाही तो काळा पैसा. "*** साधं पण रुचकर जेवण. मसाल्यांचा उपयोग नाहीच. मीठ आणि मिरची पावडर हाच मसाला. डाळभात आणि एखादी उसळ. मधल्या दिवशी मक्याची भाकरी होती. जिथे बैठक व्हायची तिथेच जेवणं व्हायची. अजिबात सांडलवंड न होता. जेवणं झाली की आवश्यक ती सफाई पाच मिनिटात होऊन जागा परत बैठकीसाठी तयार व्हायची. ***शिबिरातील युवकांनी घेतलेले विविध संकल्प... ***शिबिराचा समारोप नर्मदा युवा दलाच्या स्थापनेच्या औपचारिक घोषणेने झाला. श्री. मानव कांबळे यांच्या हस्ते या दलाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. या दलासाठी कमीत कमी एक वर्ष पूर्णवेळ कार्यकर्त्याच्या भूमिकेत काम करण्यासाठी जे युवक तयार असतील त्यांची नावं यावेळी नोंदवण्यात आली. एका मोठ्या कापडी फलकावर शपथ लिहिली होती. पूर्णवेळ काम करायला तयार असणार्‍यांनी त्यावर आपले नाव, गाव लिहावे अशी योजना होती. शपथेचा फलक आणि आवाहन केल्यानंतर पुढे येणारा सगळ्यात पहिला युवक, सुनील पावरा. एकंदर सतरा ते अठरा युवक तिथल्या तिथेच पुढे आले. येत्या काही दिवसात अजूनही बरेच युवक पुढे येतील. या युवकांना योग्य तो कार्यक्रम देण्याचे काम शिबिरात झालेच आहे. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करायचे काम सगळेच ज्येष्ठ सातत्याने करतीलच. ***शिबिर संपलं. एक वेगळाच अनुभव माझ्या गाठी होता. मेधा पाटकर आणि त्यांचे सहकारी म्हणजे केवळ नर्मदा बचाओ आंदोलन एवढीच मर्यादित कल्पना घेऊन आतापर्यंत वावरत होतो. पण नर्मदा परिवारातर्फे चालणारे नवनिर्माणाचे विधायक काम हे त्याहीपेक्षा अधिक व्यापक आणि अत्यंत मूलगामी आहे हा मला झालेला साक्षात्कार. त्याशिवाय, हे सगळे बघताना, समस्यांबद्दल ऐकताना, माझ्या आयुष्याला फारसा धक्का न लावताही या सगळ्यात योगदान देण्याच्या असंख्य कल्पना मनात आल्या होत्या, ही एक अजून जमेची बाजू. येताना मी नवखा होतो. आता थोडासा का होईना पण आतला झालो होतो. निरोपाचे नमस्कार झाले. आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो. आम्हाला शहाद्यापर्यंत सोडायला एक काळीपिवळी मागवली होती. त्यात बसून आम्ही निघालो. धडगावच्या वेशीवर एकदम गाडी थांबली. चेतन आणि अजून काही कार्यकर्ते रस्त्यात उभे होते. आम्ही निघता निघता मेधाताईंनी त्यांना आमच्यासाठी काही सीताफळं बांधून द्यायला सांगितली होती. तीच घेऊन ते आले होते. धावत पळत. त्या वजनदार पिशव्या त्यांनी आमच्या हवाली केल्या. चेतनने जोरात गर्जना केली.... "आमु आखा.... "निरोप देणारे, निरोप घेणारे सगळेच ओरडले... ".... एक से"माझा आवाज अजूनही पडेल कॅटेगरीतच. मात्र मूठ किंचित अधिक घट्ट वळलेली.क्रमशः

***

<span style="color: #999999; ">वाचकांना आवाहन : वाचकांना जीवनशाळा, नर्मदा नवनिर्माण अभियान, नर्मदा बचाओ आंदोलन किंवा या लेखमालेच्या अनुषंगाने इतरही काही मुद्द्यांवर काही प्रश्न विचारायचे असल्यास, त्यांनी ते aamu.aakhaa@gmail.com या इमेल पत्त्यावर पाठवावेत. 'आमु आखा'ची लेखन टीम त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेल. कृपया हे लक्षात घ्यावे की ही उत्तरे सर्वस्वी 'आमु आखा'च्या लेखन टीमच्या आकलनावर आधारित असतील. त्यांच्याशी आमु आखाच्या लेखन टीम व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनेचा काहीही संबंध अथवा उत्तरदायित्व नसेल.