इंग्रज नसते तर...

आपल्या माननीय पंतप्रधानांचे लांगूलचालन बऱ्याच चर्चांना, विचारांना चालना देऊन गेले. माझेही मत.


इंग्रजांमुळे हे फायदे झाले ते फायदे झाले हे म्हणणे माझ्यामते अयोग्य आहे. इंग्रज हे तात्कालिक कारण होते.


सगळ्याच देशांमधे पूर्वी राजेशाही होती. त्यांना लोकशाही पर्यंत पोहोचण्यासाठी किंवा विकास साधण्यासाठी गुलामगिरीत राहावे लागले नाही. क्रांती ही अटळ असते आणि तिला कुणीच रोखू शकत नाही. आणि ती वाऱ्यासारखी पसरते तिला छोट्या छोट्या प्रांतांच्या सीमा नक्कीच अडवू शकत नाहीत. त्यामुळे भारताच्या एकसंधतेचे (??) पण श्रेय इंग्रजांना देण्याचे कारण नाही.


यातून एक प्रश्न मला पडला तो असा - हिंदुस्तान / भारत (ज्यात अरबस्तान पासून ब्रह्मदेशापर्यंत चा प्रदेश यायचा) याची संकल्पना कधीपासून अस्तित्वात आली? म्हणजे इंग्रजांच्या आधीच्या हिंदुस्तानात लोकांना अशी कल्पना असायची का की आपण एवढ्या मोठ्या प्रदेशातले लोक आपल्याशी काहीतरी नाते ठेवून आहेत?


१*** साली ब्रह्मदेश (म्यानमार) हिंदुस्तानापासून विलग करण्यात आला. अशा एका वाक्यात ब्रह्मदेशाचा इतिहास आमच्या पाठ्यपुस्तकात गुंडाळला होता. त्याला विरोध नव्हता का झाला? त्याला फाळणी वगैरे का म्हणत नाहीत? (अरबस्तानाची कथा मला माहित नाही.)


तिबेट - भारतात होते का? ते जर चीन ने ढापले असेल तर त्याचाही उल्लेख इतिहासात नको का? पाकव्याप्त काश्मीर आणि सियाचेन यांच्यापर्यंत शालेय इतिहास पोहोचतच नाही. (इतिहास काही चित्रपटकथा नाही की 'मग त्यांना स्वातंत्र्य मिळाले आणि सारे गुण्यागोविंदाने राहू लागले' असे काहीतरी म्हणून सांगता करावी.)


असो. इंग्रज आले नसते आणि समजा अशी क्रांती झाली असती तर आजचे चित्र नक्कीच खूप वेगळे असते. ते कसे असते हा एक मोठा संशोधनाचा विषय होईल.
१. हिंसा, रक्तपात तर झालाच असता कारण कुणीही स्वतःहून सत्ता सोडत नाही.
२. क्रांतीची व्याप्ती केवढी असली असती हे सांगणे कठीण आहे. पण अखंड लोकतंत्र भारताचे स्वप्न पाहणारे वीर नक्कीच निर्माण झाले असते.
३. हिंदू मुसलमान समस्येची तीव्रता कमी असती.
४. गुलामगिरीची प्रवृत्ती नसती.
...


आणि असे बरेच मुद्दे निघतील. जास्त लिहीत नाही कारण जसा जसा विचार करतोय तसा विषय भरकटतोय. इतरांचे या विषयावरचे विचार ऐकायला नक्कीच आवडेल...