धूमकेतू

 खरं तर माझा विश्वास च बसत नव्हता. पण होय, काही महिन्यांपूर्वी मला एक धूमकेतू दिसला. सुरवातीला खूप च काळा, सुस्त आणि थंड होता तो.
खरंतर कोणीही न शोधू शकलेला असा धूमकेतू मी शोधून काढला होता. त्याच्या जोरावर मी खूप प्रसिद्ध झालो असतो. तरीसुद्धा मी फारसं लक्ष दिलं नाही.
जवळून जात असताना माझ्या गुरुत्वाकर्षणामुळे  तो माझ्याकडे आकर्षित व्हायला लागला. माझ्या दिशेनी वेगानी चालून यायला लागला. 
वातावरणात प्रवेश करताच तो हळू हळू तो चमकू लागला. लोकांच्या सहजासहजी दृष्टीस पडू लागला.
त्याची तेजस्विता इतकी वाढली कि त्यामुळे माझे डोळे दिपून गेले. त्या प्रकाशाशिवाय मला काहीच दिसत नव्हतं.
मग मी डोळ्यावर काळ्या काचेचा चष्मा लावला. त्या तेजामधून धूमकेतूच खरं रूप हळू हळू दिसू लागलं. तो आपल्यावर आदळून काही वाईट होऊ नये ह्यासाठी मी त्याची कक्षा बदलली. मग मला फेरी मारून तो परत जाईन ह्याची खात्री केली.
माझे डोळे एखाद्या दिवशी अजून तीक्ष्ण होतील. तेव्हा मला काळ्या चष्म्याची गरज लागणार नाही. 
काही झालं तरी तो एक धुमकेतूच आहे. जसं तो लांब जाईल तसं त्याची तेजस्विता कमी कमी होत जाणार आहे. हळू हळू लोकांच्या नजरेतून तो निघून जाईल.
एक दिवस असं येईल कि तो इतका निस्तेज आणि काळा पडेल कि कोणाचं त्याच्याकडे लक्ष जाणार नाही. कोणी त्याला डोळ्यांनी आणि दुर्बिण लावून सुद्धा पाहू शकणार नाही.
तो धूमकेतू म्हणजे आकाशाच्या निर्वात पोकळी मध्ये हिंडणारी एक सर्वसाधारण दगडधोंडा असेल. ज्याला काहीच महत्व नसेल. तेव्हा त्याला माझी नक्की आठवण येईल. त्या तेजास्वीतेची जाणीव होईल.
त्याची कक्षा खूप लांबची आहे. काही दिवसांनी जेव्हा तो परत येईल, तेव्हा वेळ खूप पुढे गेला असेल.
त्याच्या नव्या तेजास्वीतेला कारणीभूत ठरायला माझ्याऐवजी कदाचित कोणी दुसरा असेल.