प्रतिमा

परवाच फेसबुकवर एक वाक्य वाचनात आलं. - "इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात ह्याची आपण पर्वा करण्याची काहीच गरज नाही". जरा खटकलंच मनाला.
दर वेळेस मनाप्रमाणे वागत गेलो तर लोकांच्या मनात काय इमेज तयार होईल आपली? इंग्रजीमधल्या "image" ह्या शब्दाला मराठी शब्द कोणता हे खूप वेळ झाला तरी आठवतच नव्हतं.
रेडियो वर "प्रतिमा सिल्क" ची जाहिरात ऐकली आणि तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. इतका सोपा मराठी शब्द का नाही आठवला हे एक न उलगडलेलं कोडं राहिलंय.
लोक आपल्याबद्दल काय विचार करतात ह्याच्याकडे १००% दुर्लक्ष करणं बरोबर वाटत नाही. एखादी गोष्ट बरोबर की चूक हे नक्की कसं ठरवलं जातं?
समाजामध्ये एखाद्याची प्रतिमा तयार तरी कशी होते?
ह्या प्रश्नांची करणं पाहायला गेलं तर पहिलं उत्तर हेच मिळतं की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात त्यावरून तुमची प्रतिमा ठरते. काय चूक आणि काय बरोबर ह्या गोष्टी हे त्या त्या समजानुसार ठरवल्या जातात.
आपण आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्यात हिंडत असतो. समाजातील प्रत्येक गटाचा आपल्याबद्दल विचार करण्याची एक वेगळी पद्धत असते.
एकाच व्यक्तीबद्दल प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. एखाद्या चांगल्या व्यक्तीवर काही समाजकंटकांनी ताशारे ओढले म्हणून ती व्यक्ती वाईट किंवा अयोग्य ठरत नाही.
आणि उलटपक्षी, एखादी व्यक्ती आपल्याशी चांगली वागते ह्याचा अर्थ ती व्यक्ती चांगली असेलच असं म्हणता येणार नाही.
तरीसुद्धा 'ती व्यक्ती आपल्याशी कशी वागते' फक्त तेवढ्यावरूनच एखाद्या व्यक्तीबद्दल आपले मत चांगले आहे की कलुषित आहे ते आपण ठरवत असतो.
किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं तर अशाप्रकारे एखादी व्यक्ती तुमच्या मनात त्याची प्रतिमा तयार करत असते.
ह्याचाच अजून एक आयाम म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीजवळ दुसऱ्या व्यक्तीला मांडत असतो. आपल्या परिचयातील "ती" व्यक्ती कशी आहे हे आपण ओळखून असतो.
अश्या व्यक्तीबद्दल जेव्हा समोरच्याकडे जे काही बोलू त्यावरूनच समोरच्या व्यक्तीच्या मनात "त्या" व्यक्तीची प्रतिमा तयार होत असते.
अश्या वेळेस "त्या" व्यक्तीची प्रतिमा ही ती व्यक्ती स्वतः: न तयार करता कोणी दुसरीच व्यक्ती तयार करत असते हे लक्षात घेतले पाहिजे.
तुमच्यावर विश्वास ठेवून समोरची व्यक्ती "त्या" तिसऱ्या व्यक्तीचा छाप मनात नक्की करत जाते.
काही जण म्हणतात की "फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन". आता ह्या ठराविक बाबतीतच झालं तर हे खरं ठरू शकतं.
पण दर वेळेस पहिल्या इम्प्रेशन वरून समोरील व्यक्ती कशी आहे ह्याचा अंदाज लावणे चुकीचे ठरू शकते.
राजेश म्हणाला "मनाला वाटेल तसं; 'स्वच्छंदी' म्हणू हवंतर, वागायला हरकत नाहीच नाही. दुसरा आपल्याबद्दल काय विचार करतो त्याची पर्वा करायची गरज नाही.
पण आपल्या वागण्यामुळे कोणी दुखावला तर जात नाही ना ? ह्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.". मुद्दा मनाला पटला एकदम.

शेवटी काय, तर आपली प्रतिमा इतरांच्या नजरेत चांगली उमटली जावी ह्यासाठी स्वतः:ची प्रतिमा स्वतःच्या नजरेत चांगली असली पाहिजे. माणूस जगाला फसवू शकतो पण स्वतः:ला नाही.
स्वतः:चा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मदत घ्यावी लागते. ह्या बाबतीत आपण स्वतः:च आरसा व्हायचं. त्यात आपल्या मनाचं प्रतिबिंब पाहायचं.
कोणाच्या नजरेत आपली काय प्रतिमा आहे हे स्वतः:लाच परत एकदा सांगायचं.