जानेवारी १९ २०१२

शिल्पोत्सव उत्सव (हस्तकला प्रदर्शन)

१९/०१/२०१२ - स. ११:००
२२/०१/२०१२ - सा. ६:००

मुंबईत कुलाबा येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे १८ जानेवारीपासून 'शिल्पोत्सव उत्सव' हे प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनातील वैशिष्ट्य म्हणजे तेथे ठेवण्यात आलेले एक नावीन्यपूर्ण टेबल!

ठाणे - मुंबई येथे वास्तव्य असलेले श्री शरद नाडगौडा यांनी हे 'बेड-साइड ऍडजस्टेबल रीडिंग टेबल' डिझाइन केले आहे! असे म्हणतात ना, की गरज हि शोधाची जननी आहे... अगदी तसेच काहीसे या बाबतीत घडल्याचे श्री नाडगौडा सांगतात! त्याचे असे झाले, की चार वर्षांपूर्वी श्री नाडगौडा यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते आणि त्यामुळे हात प्लॅस्टर मध्ये होता. तेव्हा हिंडणे फिरणे कमी झाले, पलंगावर पडून राहून कंटाळा आला, पण काही करू शकत नाही, वाचनाची भरपूर आवड असूनही हातात पुस्तक धरून फार वेळ वाचनही करू शकत नाही अश्या अवस्थेत त्यांना जी गरज भासली आणि कल्पना सुचली त्यातून या नावीन्यपूर्ण टेबलचा शोध लागला. हे टेबल पलंगाच्या बाजूला ठेवायचे आणि त्यावर आपले पुस्तक किंवा पेपर वगैरे ठेवून आपल्या हाताला कसलाही ताण न देता आरामात पडल्या पडल्या मनसोक्त वाचन करायचे! या रीडिंग बोर्डची उंची कमी जास्त करता यावी यासाठी फक्त एक कळ दाबायची, रात्री वाचन करायचे असल्यास त्यावर रीडिंग लॅंप आहेच! शिवाय मोबाईल फोन, पेन, चश्मा वगैरे सर्व तिथल्या तिथे ठेवायला देखिल सोय केली आहे!

श्री नाडगौडा अक्षरशः ते एकच वेड डोक्यात घेऊन कसलेही अभियांत्रिकी ज्ञान नसताना सुद्धा या टेबलला मूर्तरूप देण्यासाठी सतत चार वर्षे झटले. मुंबई, पुणे, इचलकरंजी, कोल्हापूर, बेळगाव, वगैरे सगळीकडे वणवण करून अनेक कारागिरांच्या मदतीने त्यांनी आपला शोध प्रत्यक्षात आणला. अलीकडेच त्यांच्या या टेबलला दिल्ली येथे भारत सरकारच्या 'डिपार्टमेंट ऑफ सायन्स ऍंड टेक्नॉलॉजी' कडून मान्यता मिळाली, तेथून पुढे त्यांच्या सूचनेनुसार कानपूर येथील 'आर्टिफिशिअल लिंब्स मॅनु. कॉर्प. ' या भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या कंपनीचे तांत्रिकी आणि वितरण साहाय्य मिळण्याची व्यवस्था झाली. सध्या त्या कंपनीतील इतर काही वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत आणि हे नावीन्यपूर्ण टेबल देखिल ठेवलेले आहे.

लवकरच कानपूरच्या ऍलिम्को कंपनी मार्फत हे टेबल बाजारात येणार आहे आणि वयाच्या ८०व्या वर्षी हा अभिनव शोध लावणाऱ्या श्री शरद नाडगौडा यांच्या नावावर या टेबलचे 'पेटंट' देखिल  येणार आहे!

Post to Feed
Typing help hide