५६. अस्पर्शित

स्वरूप हरस्थितीत अस्पर्शित आहे या बोधासरशी, हा तुमचा अनुभव होता क्षणी तुम्ही मुक्त आणि स्वच्छंद होता. या अफलातून परिमाणाविषयी तुमच्याशी संवाद साधताना मला कमालीचा आनंद होतोय.

_________________________

ओशोंचं एक अफलातून वाक्य आहे ‘परमात्माने अस्तित्वको बीना छुए हुवे सम्हाला है’ (अष्टावक्र महागीता). म्हणजे निराकाराला किंवा आपल्याला कसलाही स्पर्श होत नाही. जो काही स्पर्श होतो तो शरीराला, मनाला किंवा फार तर हृदयाला होईल पण आपण सदैव अस्पर्शित राहतो.

ऑपरेशन थिएटरामध्ये एखादं शरीर आपल्यासमोर उघडलं तर आपण भोवळ येऊन पडू पण निष्णात सर्जन ते ओपन करून त्यातली गुंतागुंत दुरुस्त करू शकतो कारण तो त्या सर्व प्रक्रियेत अस्पर्शित राहतो; आणि इतका स्थिर सर्जन पत्नीच्या एखाद्या रिमार्कनं, तिच्या केवळ शब्दांनी, व्यथित होऊ शकतो. काय असेल याचं कारण? तर त्याची अस्पर्शितता जी सर्जरी करताना उपलब्ध असते, ती उपहासात्मक कमेंटनं हरवते, हा स्पर्श कुठे आणि कसा होतो याचा उलगडा या लेखात करतोय, लक्षपूर्वक वाचा.

__________________________

आपल्या पाच संवेदनांपैकी सर्वात जास्त, जवळजवळ पंचाऐंशी टक्के वापरली जाणारी संवेदना दृष्टी आहे, बाकीच्या पंधरा टक्क्यात इतर चारही संवेदना सामावल्या आहेत. आता पेच असायं की सर्वात दुर्लक्षित पण सगळ्यात प्रभावी संवेदना स्पर्श आहे.

दृष्टी खालोखाल अधिक वापरली जाणारी संवेदना श्रवण आहे म्हणजे संवेदनांचं सारं विश्व दृष्टी आणि श्रवण यांनीच व्यापलंय; स्वाद, गंध आणि स्पर्श नगण्य आहेत. स्पर्शाशिवाय जग म्हणजे आभास आहे, सो इन अ वे वी आर लिव्हींग इन अ व्हर्च्युअल रियालिटी कारण स्पर्श ही वास्तविकता आहे.

मन स्पर्शासाठी आसुसलंय आणि स्पर्श झाला की आपलं देहभान हरपतंय, आपल्याला स्वत:च, आपल्या अस्पर्शिततेचं विस्मरण होतंय. एका बाजूला स्पर्शाची ओढ आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वविस्मरणाचा धसका आहे, या दुहीत मन दोलायमान आहे आणि हा खरा पेच आहे. स्पर्श होऊन देखील अस्पर्शित्वाचं भान राहणं कसं साधता येईल याचा उलगडा आज तुमच्यासाठी करतोय.
________________________________

आपल्याला कसलाही स्पर्श होत नाही ही वास्तविकता कायम लक्षात असू द्या, एका अर्थानं ते ‘स्वस्मरण’ आहे आणि नामस्मरणापेक्षा किती तरी थोर आहे. ‘नैनं छिंदंती शस्त्राणी’  तितकंसं नजाकतदार एक्सप्रेशन नाही, स्पर्श हे नाजूक परिमाण आहे त्यामुळे त्या अंगानं आपण हा पैलू एक्सप्लोअर करू.

वैराग्य किंवा संसार विन्मुखता हा स्पर्शापासून दूर नेणारा पलायनवाद आहे, तो तुम्हाला स्वत:प्रत कधीही आणू शकणार नाही, तुमचं जीवन निरस होत जाईल. अध्यात्म न कळलेल्या लोकांनी केलेली ती इतरांची दिशाभूल आहे. स्पर्श करून देखील अस्पर्शिततेचं भान हे खरं कौशल्य आहे, ते तुम्हाला स्वरूपाप्रत आणेल.

स्पर्श हा खरं तर सर्व संवेदनांचं मूळ आहे, प्रत्येक संवेदना हा आपल्याला जाणवणारा (होणारा नाही) स्पर्श आहे या अँगलनं तुम्ही सर्व संवेदनांकडे पाहा. जिथे स्पर्श जाणवतोय ‘ती जागा’, ज्याला स्पर्श जाणवतोय ते आकाश, तो निराकार जाणता, आपण आहोत हा बोध तुम्हाला होईल, हे आकाश सदैव अस्पर्शित आहे.     
______________________________

आता मी जे लिहितोय ते अत्यंत शांतपणे वाचा, पुन्हापुन्हा वाचा, तुमच्या धारणा सोडून वाचा, असा उलगडा यापूर्वी कधीही झालेला नाही.

पहिली गोष्ट, आपण कधीही हालत नाही, आपलं हालणं अशक्य आहे कारण स्वरूप स्थिर आहे. आपण काहीही केलं तरी हालू शकत नाही या बोधासरशी तुम्ही शरीरापासून वेगळे व्हाल. अत्यंत नेटानं हा बोध तुम्ही अंतर्तमात स्थिर करा, एका झटक्यात तुम्ही शरीरापासून वेगळे व्हाल, शरीर जसंच्यातसं राहील, त्याची काहीही अवस्था असो, तरुण-वयस्क, स्त्री-पुरुष, सबल-निर्बल त्यानं काहीही फरक पडत नाही; तुम्हाला आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हा बोध होईल, शरीर हालेल पण तुम्ही स्थितं व्हाल.

दुसरी गोष्ट, आपण काहीही झालं तरी व्यक्त होऊ शकत नाही, आपण हरस्थितीत अव्यक्त राहतो ही गोष्ट जाणीवेत दृढ करा, कायमची प्रस्थापित करा. या एका उलगड्यासरशी तुम्ही सर्व प्रकटीकरणापासून मुक्त होता. प्रकटीकरणाच्या धसक्यापासून  मुक्त होता, बरोबर-चूक, श्रेष्ठ-दुय्यम, अलौकिक-सामान्य या कंपॅरिटिव्जपासून मुक्त होता, तुमच्या प्रकटीकरणात सहजता येते.

सर्व प्रकटीकरण हे शरीर (शारीरिक हालचाल, शारीरिक अवस्था आणि शारीरिक कौशल्य) आणि मन (विचार, भावना आणि चित्तदशा किंवा मूड ) या लेवलवर आहे, स्वरूप किंवा आपण सदैव अव्यक्त आहोत. काय वाटेल ते केलं तरी आपण अव्यक्त राहतो ही खूणगाठ एकदम पक्की करा.

आणि तिसरी गोष्ट, आपण बोलू शकत नाही, सर्व संवाद मग ते संभाषण असो की विचार, केवळ मनाच्या लेवलला आहेत, आपण सदैव मौन आहोत ही पराकोटीची स्थिती लक्षात घ्या, ज्या क्षणी तुम्हाला हा बोध होईल, मी जे म्हणतोय तो तुमचा अनुभव होईल, त्या क्षणी तुम्ही मनापासून मोकळे व्हाल. मनाच्या कोणत्याही अवस्थेत तुम्ही अस्पर्शित राहाल, मनाची अविरत बडबड, मनानं केलेली अवहेलना तुमच्यावर काहीही परिणाम करणार नाही, तुम्ही कायम प्रसन्न राहाल.

या तीन गोष्टींचं अध्ययन करा, या लेखाचा प्रिंटाऊट घेऊन या तिन्ही गोष्टी तुमच्या अंतर्तमात इतक्या खोल न्या की त्याविषयी तुम्हाला कोणताही संदेह राहायला नको. तुम्ही शरीर आणि मनापासून संपूर्ण वेगळे व्हाल.

कोणताही प्रसंग, तुमची कोणतीही अभिव्यक्ती, तुमचं कृत्य, मानसिक आंदोलनं तुमच्यावर काहीही परिणाम करू शकणार नाहीत, तुम्ही हरेक स्थितीत अस्पर्शित राहाल, स्वरूप होऊन राहाल, तुमचं जगणं आनंदाच आणि स्वच्छंद होईल.

आता तुमचे अनुभव, त्या अनुभवातून निर्माण झाले तर ते प्रश्न आणि तुम्ही स्वरूपाला उपलब्ध झालात, निष्प्रष्ण झालात तर तो आनंद तुमच्या प्रतिसादातून बरसू द्या. तुमच्या प्रतिसादातून इतरांना हुरूप येईल आणि माझ्या लेखनाचं सार्थक झालेलं असेल.

संजय

मेल : दुवा क्र. १