माझी दैनंदिनी-ईशान्य भारत प्रवास

तसा मी  दर वर्षीच या भागात येत असतो. सर्व प्रथम मी शिलौंग ला आलो तो मे २००९ मध्ये. ते ही प्रशांत महामुनी यांचे प्रोत्साहनाने. इकडे येण्याची स्फूर्ती मिळाली ती श्री सुनीलजी देवधर यांच्या प्रभावी भाषणाने. ईशान्य भारताच्या समस्या त्यांनी आपल्या दोन दिवसाच्या प्रबोधनाने इतक्या परिणामकारक व आंतरिक कळकळीने मांडल्या की, निवृत्ती नंतर माझा काही समाज कार्य करण्यासाठी कार्यक्षेत्राचा सुरु असलेला शोध तिथेच मला गवसला. सौ. पुनम मेहता, डॉ. खंडेलवाल व डा. देसाई हे मला मुंबईला वसतिगृहाच्या व्यवस्थापकांच्या बैठकीला घेऊन गेले. तिथे भैयाजी जोशींचे प्रबोधन ऐकायचा योग आला. संघाची कार्यपद्धती बघायला मिळाली. परत आल्यावर पुनमताईंनी रत्नागिरी येथे असलेल्या नागालँड वसतिगृहात राहून येण्याचा सल्ला दिला. तिथे मी २० दिवस राहून आलो.
तेथील वास्तव्यात समाज सेवेत मी काय काम करावयाचे याची निश्चिती झाली. हिशेबाचे काम तसे कंटाळवाणे असते आणि त्यामुळे सर्वच क्षेत्रात ते मागे पडते रत्नागिरी येथे वसतिगृहाचे हिशेब ही असेच मागे पडलेले मला जाणवले. बैंकेच्या अनुभवाचा मला येथे खूप फायदा झाला. हिशेब हा माझा आवडीचा विषय त्यात टॅली सॉफ्टवेअर शी मी नुकताच बया पैकी खेळत होतो. तिथे कॉम्प्युटर होता व अपेक्षेप्रमाणे तो पडित अवस्थेत होता. माझे कॉम्प्युटर वर विशेष प्रेम होते व तो आत्मसात करण्यासाठी मी या आधी विशेष श्रम व धन खर्च केले होते. त्याचा फायदा घेण्याचे मी ठरविले. अकाउंट चे गट्ठे मी  माळ्यावरून काढले. दोन तीन वर्षांपासुन धूळ खात असलेले ते निर्जीव कागद मग जिवंत झाले आणि मग मी त्यांचा एका अर्थाने उद्धारच केला. तेथील पदाधिकाऱ्‍यांना मी आडिट रिपोर्ट सादर केल्यावर मलाच कृतकृत्य झाल्यासारखे झाले. तेथून जवळच प. पु. गुरुजींचे गोळवली हे जन्मगाव असून तेथे एक मोठा समाज- सेवेचा प्रकल्प उभा राहत होता. तेथील पदाधिकाऱ्यांनी मला मग आत्मीयतेने तेथे नेऊन तो प्रकल्प दाखविला. समाजातील लोक आपल्या परीने एखाद्या कामात कसे झोकून देतात व त्या कामाला कशी गती येते व ते पूर्णत्वाकडे झपाट्याने वाटचाल करते याची चुणूक मला तेथे दिसली. एक मराठी वृद्ध जोडपे तिथे ३ वर्षे राहून गेले होते व त्या ठिकाणी आपल्या कामाच्या पाऊल खुणा तिथे उमटवून गेले होते. तिथला परिसर हा फुलझाडांनी सजला होता. एक छोटेसे झोपडीवजा घरकुल व तिकडे जाणारी पाऊल वाट त्यांचा झालेला वावर दर्शवित होती. सभोवतालचा परिसर स्वच्छतेचे प्रतीक होते. हे सर्व त्या वृद्ध जोडप्यांनी केल्याचे तिथे मला समजले. आता वय झाल्याने व काम होत नसल्याने ते आपल्या मुलाकडे परतल्याचे कळले. परतीच्या प्रवासात मी त्याच विचारात बसमध्ये रमलो होतो. मनामध्ये काहीतरी निश्चय होत होता. पुण्यात परतल्यावर मी जनकल्याण ऑफिस मध्ये माझे अकाउंटचा अनुभवाचा काही उपयोग करण्याचे मनोगत व्यक्त केले. तेथे ही अकाउंटचा मोठा पसारा असल्याचे मला कळले. सर्व काम मॅन्युअली होत असले तरी, व्यवस्थित होत होते. पण कामाचा व्याप सतत वाढता असल्याने ते काम टॅलीवर घेण्याचे मी सुचवले व ते करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी ही आनंदाने संमती दिली. तेथे बसून हे काम करणे सोयीचे नव्हते. मग मी उपाय सुचवला. रोज एक रजिस्टर घरी नेऊन ते टॅली वर टाकायचे. ते झाले की मग ते परत देऊन दुसरे न्यायचे. असा क्रम सुरु केला. १५ दिवसात ते काम पूर्ण झाले.
माझे लक्ष्य ईशान्य भारतात काम करणे हे असल्याने मग त्या बाबत विचार सुरु झाले. शिलाँग मध्ये कार्यरत असलेले प्रशांत महामुनी यांची जनकल्याण कार्यालयात भेट झाली. प्रशांत ३२ वर्षाचे तरुण गेले १२ वर्षे मेघालयात कार्यरत आहेत. वयाच्या २० व्या वर्षापासून तेथे असल्याने तेथील खासी भाषा त्यांनी आत्मसात केली असून तेथील जनजातीशी ते समरस झाले आहेत. इतके की पुढे त्यांनी तेथील जयंती या मुलीशी लग्न करून ते तिकडीलच झाले आहेत व तेथील समाजाच्या उत्थानासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांचे कडे मेघालयातील सेवा भारतीचे दायित्व होते. तेथे ते सेवा भारती तर्फे अनेक प्रकल्प राबवीत होते. त्यात  मोबाईल डिस्पेन्सरी, शाळा, बुक वँक आदि प्रमुख होते. हे प्रकल्प डोनेशन चे आधारावर असल्याने आयकर सूट मिळविण्यासाठी या संस्था आयकर विभागाकडे पंजीकृत असतात व ही सूट मिळण्यासाठी त्यांना नियमित आयकर विभागाला आडिट रिपोर्ट सादर करणे गरजेचे असते. त्यासाठी अकाउंट्स नियमितपणे ठेवणे ओघाने आलेच. ईशान्य भारतात कार्यकर्त्यांची खूप वानवा आहे. त्यात जे कार्यरत आहेत त्यांच्या वर कामाचा इतका ताण आहे की जनसंपर्काचे काम करून पुन्हा अकाउंट नियमित ठेवणे म्हणजे कर्म कठीण. त्यांनी मला तिकडे खूप काम आहे तुम्ही शिलाँग ला या म्हणून निमंत्रण दिले. पाय ठेवायला जागा मिळाली या आनंदात मग मी जाण्याची तयारी केली. नागा मुलांच्या वसतिगृहात राहून आल्याने, जनकल्याण समितीने मी नागालँड ला जावे असे निश्चित केले व माझे दिमापुर चे तिकीट काढले. एक गोष्ट सांगायची राहून गेली. जनकल्याण समिती ही ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड व मणीपूर या राज्यातील लहान मुलां मुलींना  महाराष्ट्रात आणून त्यांना येथील शाळांमध्ये १२ वी पर्यंत शिकवण्याचा प्रकल्प राबविते. ईशान्य भारतात ख्रिश्चन धर्मांतरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. वेगवेगळ्या कॢप्त्या वापरून मिशनरी येथील जनजातींना ख्रिश्चन करण्याचा चंग बांधून उतरले आहे. ही प्रक्रिया गेल्या १५० वर्षांपासून सुरु असून काही भागात मुख्यत: नागालँड, मिझोराम व मेघालय या राज्यात ८० टक्क्यांपर्यंत धर्मांतरण झाले आहे. ह्या धर्मांतरित जनजातींमध्ये फुटीरता पण पेरल्या गेली आहे. भारतापासून हा भाग वेगळा करण्याचा गुप्त अजेंडा या मागे आहे असे बोलले जाते. अतिरेकी कारवायांना खत पाणी घालण्याचा देखील प्रयत्न हे मिशनरी करतात. काही कारणाने मला वाटेत काही कामा निमित्त उतरावे लागले व नंतर विमानाने मी प्रथम गोहाटी ला पोचलो. प्रशांत महामुनींना फोन ने संपर्क साधल्यानंतर त्यांनी एअर पोर्ट हून शिलाँग ला थेट शेअर टॅक्सी मिळते व त्यांनी येण्यास सांगितले. २५० रुपयात शेअर टॅक्सीने मी शिलाँग ला पोचलो.  
गोहाटी ते शिलाँग हा मार्ग खरोखर मन वेधून घेणारा आहे. मेघालयाचे पहाड व निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. एप्रिल महिना असूनही आपण मेघालयात जात आहोत ही जाणीव तासाभराने आल्हाद दायक थंड पण सुसह्य हवा अनुभवताच होते. शिलाँग ला पूर्वेकडील स्कॉटलंड कां म्हणतात याची अनुभूती त्या शहरात व आसपासच्या गावात फिरल्यावर होते. गावात फिरताना स्वच्छ रस्ते व इंग्लिश पद्धतीची टुमदार घरे आणि पाश्चात्य संगीताचे घराघरातून येणारे स्वर ऐकून आपण परदेशात आलो कि काय अशी शंका निर्माण होते. या प्रवासात मी मेघालयातील गावा गावात हिंडलो. पुण्याहून मुलांना घेऊन आलेले व पालकांना भेटण्याच्या उद्देशाने आलेले अत्यंत उत्साही श्री अरविंदराव देशपांडे त्यांचा मुलगा राहुल, मुलींच्या वसतिगृहाचे काम बघणाऱ्या ज्योत्स्नाताई यांचे बरोबर मला देखील विद्यार्थ्यांच्या घरी जाण्याचा योग आला व मेघालयाच्या जनजातींच्या एकंदर राहणीमानाची कल्पना आली. ख्रिश्चन धर्मांतरणाचा ओघ थोपवणारी व आपल्या संस्कृतीची जिद्दीने पाठराखण करणारी ही मंडळी, आपली मुले मिशनरी शाळेत जाऊन त्यांच्या बालमनावर विपरित परिणाम होऊ नये या उद्देशाने आपल्या बछड्यांना हजारो मैलावर महाराष्ट्रात शिक्षणासाठी पाठवतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने येथे गेल्या ५० वर्षात उभारलेले प्रचंड काम व येथील जनजातींमध्ये निर्माण केलेला विश्वास कौतुकास्पद आहे यात शंका नाही. नवीन पिढीवर संस्कार करून त्यांना परत पाठवून धर्मांतरणाला आळा घालण्याचा हा प्रयत्न स्तुत्यच आहे आणि याला जनमानसातूनही मदतींचा हात मिळत आहे.
या नंतर माझा दरवर्षी या भागात प्रवास होतच राहिला. या प्रवासात अरुणाचल प्रदेशातील बराचला भाग, नागालँड, व आसाम मध्ये फिरणे झाले. येथे विद्या भारतीने शिक्षणाची गंगाच आणली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. आसाम च्या बयाच भागात निरनिराळे अतिरेकी गट कार्यरत आहेत. सामान्य लोकांचे अपहरण करणे त्यांच्या कडून खंडणी वसूल करणे न मिळाल्यास त्यांना ठार मारणे असे प्रकार इथे कायम सुरु असतात. येथील पोलीस व इतर यंत्रणा मात्र असहाय व बघ्याची भूमिका घेऊन असतात. लोकांना ही याची सवय झालेली जाणवली. भ्रष्ट सरकारी यंत्रणांचा अतिरेक इथे बघावयास मिळतो. जंगल राज म्हणजे काय याची प्रचिती या भागात आल्यावर व येथे वावरताना मला झाली. सेवा भारतीने देखील आपले सेवा कार्य निरनिराळे प्रकल्प राबवून मोठ्या प्रमाणावर यशस्वी करून दाखविले आहेत. न्युरोथेरपी, आरोग्य मित्र सेवा, विद्यार्थ्यासाठी छात्रावास, जैविक कृषी प्रकल्प, गौशाला प्रकल्प आरोग्यम प्रकल्प, सोशल ऒडिट सेवा, सेल्फ हेल्प ग्रुपस, सिलाई प्रशिक्षण केंद्र असे अगणित प्रकल्प राबवून कार्यकर्ते येथील विपरित परिस्थितीत अविरत कार्यरत असताना बघून कौतुक वाटते. त्यांना या कामी समाजाकडून मिळणारी मदत ही चर्च ला मिळणाऱ्या अमाप पैशापुढे अगदीच तुटपुंजी असली तरी त्यांचा उत्साह मात्र कांकण भर देखील कमी दिसत नाही. संपूर्णं देशातून त्यांच्या या कामाला आर्थिक, व सेवेद्वारे हातभार मिळाला तर येथील परिस्थितीचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. तसा मदतीचा ओघ सुरु आहेच पण देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत आज तरी तो नगण्य आहे असे म्हणावेसे वाटते.
मेघालयातील  वेस्ट गारो हिल्स या जिल्ह्यात बेलबारी येथे २०० मुलामुलींची निवासी शाळा आहे. तेथे मी ४ दिवस होतो. या वर्षी त्या शाळेत अद्ययावत सायन्स लेबोरेटरी निर्माण केली आहे तसेच कॉम्पुटर वर्गासाठी कॉम्प्युटर आणले गेले आहेत. शाळा १० वी पर्यंत असते. दुर्दैवाने येथे सायंस व कॉम्प्युटर शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाही. प्रिन्सिपल नी आपली व्यथा मांडताना सांगितले की ते खूप ठिकाणी फिरले पण ते देत असलेला तुटपुंज्या पगारात (५०००) कुणीही यावयास तयार नाही. निवृत्त शिक्षक सेवा भावाने जर येथे एक सेशन साठी मिळत गेले तर ही शाळा या भागातील १ नंबरची शाळा होऊ शकते. शाळेला सायंस व कॉम्प्युटर शिक्षकाची नितांत आवश्यकता आहे. सध्या प्रिन्सिपॉल रोज ७ वर्ग घेतात. ते स्वत: ७०  वर्षांचे असून या शाळेला १ नंबर वर नेण्याची जिद्द बाळगून आहेत. ते मध्यप्रदेशतून गेल्या ३ वर्षापासून येथे सेवा भावी म्हणून काम करीत आहेत. असे व्यक्तित्व मला या भागात अनेक भेटले आणि त्यांच्या सेवा भावा पुढे मी नतमस्तक झालो.
कोक्राझार हा आसाम मधील बोडो अतिरेक्यांमुळे त्रस्त जिल्हा आहे. बोडो जमातीचे बाहुल्य असल्याने याला बोडोलैंड असेही म्हणतात. मला ५ दिवसांसाठी येथे जावे लागले. व्यापाऱ्यांचे व शाळेत जाणाऱ्या मुलांचे खंडणीसाठी अपहरण येथे कायम होत असते. संध्याकाळी ६ नंतर तुम्ही फिरताना दिसले तर तुम्ही लुटल्या गेले हे निश्चित. मारहाण तर नक्की होणार. गावात नागरिकांनी सुरक्षा समित्या नेमल्या असून रोज ५-६ लोकांचा गट रात्री १२ पर्यंत गस्त घालीत असतो. ज्याच्या घरी मी मुक्कामाला होतो त्याची त्या रात्री गस्तीची ड्यूटी होती. गोसाईगाव हे तसे सब डिवीजन असलेले गाव. पण नागरी सुविधा नावाला पण नाही. आलेला सरकारी पैसा हा अधिकारी फस्त करतात. विचारणारे कुणी नाही. अतिरेक्यांना त्यांचा हिस्सा दिला की रान मोकळे. ५ वर्षांपूर्वी जो सुमार परिस्थितीत होता तो आज करोडपती आहे. सामान्य नागरिकास याची जाणीव आहे पण तो असहाय आहे. जिथे दाद मागायची तोच मुळी भ्रष्ट आहे. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार. अरुणाचल प्रदेशात तर केंद्र सरकारची करोडो रुपयाची ग्रांट दरवर्षी येत असते व ती आपसात वाटून घेणे हा सर्रास चालणारा एकमेव उद्योग. शाळेकरिता आलेले करोडो रुपये खर्च दाखविले पण शाळेचा मागमूस तेथे नाही. ऑडिट करायला आलेल्यांना जिवाच्या धमकीने परत पाठविले गेले असा किस्सा ऐकायला मिळाला.   
अशा एकंदर परिस्थितीत सेवा भावी संस्था आपले पाय घट्ट रोवून गेले अनेक वर्षे आपले सेवा कार्य अविरत करीत आहेत. त्यांच्या या कार्यात मी हिशेब करून देण्याचे काम गेले ४ वर्षे करीत असतो. त्यांच्या या महान कार्यात अप्रत्यक्षपणे आपला देखील खारीचा वाटा असावा हा एकमेव स्वार्थी विचार. तेवढेच पुण्य पदरी.!  
५/१२/२०११
या वेळचा माझा हा पूर्वोत्तर भारताचा प्रवास चौथ्यांदा होत होता. यावेळी मी जास्त काळ राहावे अशी उल्हासजींची इच्छा होती त्यामुळे मी ३ महिने राहण्याची मनाने तयारी करूनच निघालो होतो. घरी देखील तशी कल्पना दिली होती. पुण्यात मला सोडायला मुलगी व जावई आले होते. आज त्यांची आरोही च्या शाळेत पेरेंट मीटिंग असल्याने आरोही घरीच होती व तिच्यासाठी आजी घरीच राहिली होती. मुंबई हून माझी प्लाईट व्हाया दिल्ली होती. दिल्ली ला संध्याकाळी सहा ला पोचलो. पुढील फ्लाईट दुसरे दिवशी सकाळी ९ ला होती. पुणे व मुंबई ला हवामान डिसेंबर असूनही सामान्य होते. त्यामुळे सर्व गरम कपडे मी लगेज मधील बैग मध्ये टाकले होते. केवळ लॅपटाप सोबत होता. दिल्लीला पोचल्यावर तेथील थंडी बघून गरम कपडे काढावे या हेतूने दिल्लीला मी माझी लगेज ची वाट पाहत बसलो. तिथे कळले की माझे लगेज गोहाटी पर्यंत मला मिळणार नाही. आधीच कडाक्याची थंडी त्यात विमानतळ वातानुकूलित व अंगावर केवळ एक हाफ शर्ट. ती रात्र मी कधीच विसरणार नाही. थंडी मुळे रात्रभर झोप झाली नाही. दुसरे दिवशी १ ला दुपारी गोहाटीला पोचल्यावर मला घ्यायला गाडी आली होती पण रात्रभराच्या जागरणाने मी कार्यालयात गेल्यावर झोपेच्या आहारी गेलो. रात्री सडकून ताप भरला व दोन दिवस त्या आजारात गेले.
गोहाटीला श्री भास्करराव कामानिमित्त आले होते. उल्हासजीं मला जवळच्या गावी हस्तकला प्रशिक्षण केंद्राच्या समारोपाचा कार्यक्रमाला घेऊन गेले सोबत भास्करजी होते. तेथील कार्यक्रमात भास्करजींनी प्रशिक्षणार्थी महिलांसोबत ज्या आत्मीयतेने संवाद साधला तो माझ्यासाठी एक विशेष अनुभव होता. सर्व महिला समरस होऊन त्यांचे प्रबोधन ऐकत होत्या. एखाद्या कामात आपण जेव्हा एकरूप होतो तेव्हा ते काम कसे जिवंत होऊन समोर उभे ठाकते व त्यात आपण कसे एकात्म पावतो याची प्रचिती तेथे मला आली. भास्कर जींच्या व्यक्तिमत्त्वाने मी भारावून गेलो होतो. परत आल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही मालीगाव येथील शाळा-वसतिगृह व हस्तकला वर्गाच्या प्रकल्पावर गेलो.  
गोहाटी मध्ये मालीगाव या १२ कि. मी अंतरावरील एका टेकडीवर हा प्रकल्प उभा राहत आहे. येथे १०  वी प्रर्यंत विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळेची सोय केल्या गेली आहे "कामाख्या चैरिटेबल ट्रस्ट" या नावाने हा प्रकल्प असून येथे, महिलांना हस्तकला प्रशिक्षण दिल्या जाते. ईशान्य भारतातील निरनिराळ्या जमातीच्या स्त्रिया व मुले इथे स्वावलंबनाचे धडे घेतात. येथील सर्व खर्च समाजातील मिळणाऱ्या देणगी द्वारे भागविल्या जातो. १ एकरात पसरलेल्या या टेकडीवर, शाळा, वसतिगृह व योग प्रशिक्षण व हस्तकला प्रशिक्षण या साठी इमारत बांधण्याचे काम सुरु आहे. हस्तकला प्रशिक्षण केंद्राची इमारत ही नागा जमातीच्या परंपरागत वास्तुनुरूप उभी राहत आहे. देणगी हा मुख्य स्रोत असल्याने बांधकामाची गती देखील त्याप्रमाणे आहे. पण उल्हासजींची कामाची झेप व दांडगा विश्वास व त्यात त्यांची कल्पकता यातून ह्या वास्तू लवकरच मूर्त स्वरूपात उभ्या राहतील यात शंका नाही.
गोहाटी चे काम माझे २० डिसेंबर पर्यंत पुरले. अरुणाचल मध्ये वनवासी कल्याणाश्रम ही संस्था अरुणाचल विकास परिषद या नावाने कार्यरत आहे. अरुणाचल प्रदेशाच्या सुदूर प्रदेशात या संस्थेचे जाळे पसरले असून कार्यकर्ते अविरत आपले काम करीत आहेत. अकोल्याचे संदिप कविश्वर या विभागाचे काम बघतात. याचे मुख्यालय इटानगर या राजधानी चे शहरात आहे. त्यांनी मला त्यांचे कामासाठी १ महिना देण्याबद्दल कळविले होते त्यानुसार मी २० डिसेंबर ला इटानगर ला पोचलो. याच दरम्यान संघाचे सर संघचालक मोहनजी भागवत यांचा प्रवास पासीघाट ला ५ ते ८ जानेवारी दरम्यान होता त्याची पूर्व तयारी साठी संदिपजींना जायचे असल्याने त्यांनी माझी गाठ मुख्यालयातील श्री रमेशची व निवारणजी यांचेशी घालून दिली व ते पासीघाट ला रवाना झाले.  
त्या दरम्यान पुण्याला अखिल भारतीय जनजाती क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यात पूर्वोत्तर भारतातील खेळाडूंना निवडून व त्यांना सराव उपलब्ध करून देऊन पुण्याला पाठविणे असे अजस्र कार्य विकास परिषद ने आयोजित केले होते. त्यानुसार अरुणाचलमधुन १०० स्पर्धकांना २१ डिसेंबर ला निरोप समारंभ होता. त्याला मी उपस्थित झालो. या सर्व खेळाडूंना विवेकानंद केंद्रातर्फे ट्रॅक सूट भेट दिल्या गेला त्याचा ही कार्यक्रम केंद्र प्रमुखांनी आयोजित केला होता. हा कार्यक्रम इटानगर हून ३० कि. मी वरी ल निर्जली या गावी विद्या भारती च्या शाळेच्या इमारतीत होता.  त्यांना निरोप देऊन आम्ही रात्री ९ ला इटानगर ला पोचलो व माझे काम सुरु केले. ३१ डिसेंबर ला कल्याणाश्रम चे संस्थापक श्री बाळासाहेब बापटजी यांचा जन्मदिवस उत्साहाने साजरा केला जातो. विकास परिषदेच्या शाळेच्या लहान मुलांचे विविध कार्यक्रम होतात त्यात मला आमंत्रित केले गेले. तो बहारदार कार्यक्रम लहान मुलांनी सादर केला होता. आपल्या चिमुकल्यांचे कार्यक्रम पाहण्यासाठी व कार्यक्रमानंतर त्यांना परत नेण्यासाठी पालक देखील उत्साहाने आलेले होते.
अरुणाचल मध्ये मिसिंग जमात प्रामुख्याने वास्तव्य करते. ख्रिस्तीकरणाला आळा घालण्याचे दृष्टीने या जमातीचे लोक ३१ डिसेंबर ला कार रैली काढतात. भल्या सकाळी एका ठिकाणी जमून व जमातीचे चिन्ह म्हणून डोनी पोलो (सूर्य - चंद्र) चितारलेले झेंडे आपल्या मोटारीवर दिमाखाने मिरवत ही मिरवणूक शहर भर फिरून एका मैदानात जमते. येथे राज्याचे मुख्यमंत्री या सभेला संबोधन करतात व अल्पाहार-भोजनानंतर याची सांगता होते. मला देखील यात सहभागी होण्याचे निमंत्रण विकास परिषदेने दिले होते त्यामुळे मी देखील उत्साहाने यात सामील झालो. ही विशाल रैली म्हणजे अनेक कॢप्त्या वापरून भोळ्या जनजातीला प्रलोभनाने धर्मांतरित करणार्‍या मिशनरी व चर्चच्या तोंडात चपराक असते. यावेळी ही मंडळी असहायतेने या मिरवणुकीकडे बघत असतात.
३ जानेवारी २०१२ ला मी गोहाटी ला विकास परिषदेचे काम आटोपून परतलो. पासीघाट ला ३ दिवसाच्या शिबिरात येण्याचे निमंत्रण असल्या ने मी २ दिवस गोहाटीला थांबून ६ तारखेच्या रातराणी ने पासीघाट ला निघालो. सकाळी ९ ला पासीघाट च्या ६ कि. मी आधी विद्या भारतीच्या शाळेचा परिसर आहे तेथे या शिबिराचे आयोजन केले होते. आकर्षक स्वागत द्वार व शिबिराचे आयोजन खूपच भव्यतेने केले होते. इतक्या दुर्गम भागात एवढे प्रशस्त्त, आकर्षक व विशाल आयोजन व तेही शिस्तबद्ध येथील स्थानिक कार्यकर्ते व त्यांच्यात ही प्रेरणा निर्माण करण्यासाठी नि:स्वार्थ बुद्धीने व निरंतर कार्यरत असणारे व आपल्या परिजनांना सोडून इतक्या लांब आपल्याच पण एकट्या पडलेल्या देशबांधवां शी आत्मीयतेचा पुल बांधणारे संघाचे प्रचारक व त्याच्या या कार्याबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आलेले व त्यांच्यातलेच एक होऊन ३ दिवस राहिलेले सरसंघचालक यांच्या परिश्रमाचे द्योतक होते. शिबिराचा समारोप पासीघाट येथे सरसंघचालकांच्या प्रबोधनाने झाला. शिबीर स्थान ते जाहीर सभा हे अंतर संघ गणवेशात स्वयंसेवकाच्या संचलनाने पार पडले व संपूर्णं अरुणाचली हे शिस्तबद्ध आयोजन कौतुकाने पाहत होते.  
शिबीर आयोजनापूर्वी अनेक कार्यकर्ते ६ महिने झटत होते व शिबिरानंतर ही ८ दिवस पासीघाट मध्ये आवरण्यात गेले. शिबिराचे खर्चाच हिशेब जुळवणे हे काम मी इमाने इतबारे करून आपला वाटा उचलला.
या शिबिराच्या यशात जसा येथील स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता तसा यात सहभागी होण्यासाठी तवांग सारख्या सुदूर भागातून देखील स्वयंसेवक आले होते. तवांग ते पासीघात हा पल्ला ५ दिवसांचा असून २५०० रुपये भाडे लागते. यातच या कार्यक्रमाचे महत्त्व स्वयंसेवकात किती होते याची प्रचिती येईल. संघाचे अस्तित्व या भागात गेल्या ६० वर्षापासून निरनिराळ्या संस्थांद्वारे प्रगट होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सेवा भारती, विद्या भारती, विकास परिषद, वनवासी कल्याण आश्रम हे वटवृक्ष आपली छाया येथील लोकांसाठी पसरवीत आहेत. आणि ख्रिस्तीकरणाला बऱ्याच प्रमाणात खीळ बसली आहे. ख्रिस्ती झालेले अनेक बांधव भ्रमनिरास झाल्यानंतर आता पुन: परतीच्या प्रवासाला लागले आहेत. अरुणाचल प्रदेशामध्ये झालेले भव्य दिव्य शिबीरा साठी राब राब राबलेले कार्यकर्ते व संघाचे प्रचारक वर्ध्याचे प्रदिपजी, नांदुर्‍याचे राजेशजी, अकोल्याचे संदिपजी व दिपकजी ह्या मराठी लोकांना बघितले की आपण मराठी असल्याचा विशेष अभिमान वाटतो.
२० जानेवारी ला आम्ही सर्व नहरलगुन ला परतलो. येथे संघाचे कार्यालय आहे व प्रचारकांचे मुख्यालय. सेवा भारती येथे लेखी या गावात सेवा देण्याचे कार्य करते. येथे आरोग्य सेवा, हे प्रमुख कार्य होते. येथील माझे काम ४ दिवसात आटोपले व मी २५ ला पुन्हा गोहाटी ला परतलो.
उल्हासजीं सोबत २६ ला मग मी बोंगाइ गाव, गोसाई गाव, गुरुफेला, व डिंगडिंगा या बोडोलैंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाम च्या कोकराझार जिल्ह्याचा दौरा केला. गोसाइगाव येथे सेवा भारती, केशव सेवा समिती म्हणून कार्यरत आहे. येथेच विद्याभारतीची शंकरदेव विद्या निकेतन हि संस्था विद्या दानाचे काम करीत नावारूपाला आली आहे. मिशन स्कूल मध्ये बायबल हा आवश्यक विषय शिकविला जातो व धर्मांतरणाची बाराखडी लहान मुलांच्या मनावर बिंबवली जाते. त्याला आळा घालण्यासाठी व आपल्या बांधवांच्या नवीन पिढीवर आपले संस्कार व्हावे या हेतूने विद्या भारती या भागात काम करते व त्याला येथील जनजातींचा भरघोस पाठिंबा असतो हे येथील शाळेमध्ये पालकांची प्रवेशासाठी होत असलेली गर्दीच दर्शविते. आम्ही गेलो तो दिवस येथील शाळांमध्ये सरस्वती पूजन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे सर्व शाळांना भेटी देणे हा मुख्य कार्यक्रम होता. त्या रात्री गुसाईगाव येथे मुक्काम करून दुसरे दिवशी २७ ला रात्री आम्ही गोहाटीला पोचलो.
दुसरे दिवशी २८ ला आम्ही सकाळी मेघालयातील वेस्ट गारो हिल्स येथील बेलबारी येथे विद्याभारतीचे शाळेतील बैठकीसाठी निघालो. श्री सुनीलजी हे शाळेच्या वसतिगृहाचे अखिल भारतीय व्यवस्थापक प्रमुख आहेत. ते छात्रावासा चे व्यवस्थापना ची पाहणी करण्यासाठी या भागात प्रवास करीत होते. त्यांचे सोबत मग आम्ही आसाम मेघालय सीमेवरील, बेलगुरी, त्रिक्तिकला व बेलबारि य़ा छात्रावासांना भेटी दिल्या. बेलबारी येथे आमचा रात्रींचा मुक्काम होता. तेथून मग आम्ही २९ ला सकाळी तुरा या वेस्ट गारो हिल्स च्या मुख्यालयाच्या ठिकाणी आलो. येथे सेवा भारतीचे अनेक प्रकल्प आहेत. त्यात सोशल आडिट हे काम देखील येथील जिल्हा प्रशासनाने सेवा भारतीला दिले आहे. सरकारच्या निरनिराळ्या योजनांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची पाहणी करणे व त्याबाबत सरकारला वेळेवर अहवाल सादर करणे या कामात सेवा भारती ने अव्वल काम केल्याने जिल्हा प्रशासन सेवा भारतीला हे काम देत असते. त्याच्या अकाउंट चे काम करण्यासाठी मला तिथे राहावयाचे होते त्यामुळे मला सोडून मग बाकी जण गोहाटी ला परतले. तुरा हे गाव म्हणजे पी. ए. संगमा यांचे गाव. अधिकांश ख्रिस्तीकरण झालेली गारो जमात व त्यामुळे फोफावलेला उग्रवाद हे येथील मुख्य आकर्षण.  तुरा येथील काम आटोपून मी मग  २ फेब्रुवारी ला बेलबारी शाळेत आलो. येथे शाळेचे बांधकाम सुरु असून ४-५ एकरात पसरलेला हा परिसर अतिशय रम्य असा आहे मध्यप्रदेशातील ७० वर्षांचे शर्माजी गेले दोन वर्षे येथे प्राचार्य म्हणून सेवा देत आहेत. शाळेत २०० मुले मुली निवासी विद्यार्थी आहेत.  आसपासचे गावातील पालक देखील आपली मुले या शाळेत शिकावी म्हणून गर्दी करतात. जवळच मिशन ची अद्ययावत शाळा आहे पण या शाळेचा निकालाच्या बाबतीत अग्रक्रम आहे. नं१ ची शाळा म्हणून ही गणल्या जाते. येथे अद्ययावत लैब व कांम्पुटर सेंटर असून सध्या मात्र प्राचार्य सायंस व कॉम्प्युटर ला शिक्षक नाही म्हणून चिंतेत होते. आर्थिक अडचण ही या शाळेची कायम व्यथा असून सवलतीचे दराने केरोसिन, मेस साठी तांदूळ व इतर   सामग्री मिळावी म्हणून येथील शिक्षक कायम धाव पळ करीत असताना मी पाहत होतो.
येथील काम आटोपून मी ७ फेब्रुवारी ला तुरा येथे आलो तेथे प्रतापजी म्हणून कार्यकर्ते आहेत त्यांना हिशेबाचा अहवाल देऊन त्यांचे घरी जेवण करून रात्रीच्या रातराणी ने गोहाटी ला परतलो. मध्ये ८ दिवस मग मी गोहाटी येथील प्रकल्पांना भेटी व तेथील काम आटोपून १३ ला परत गोसाई गाव येथे जाण्यास निघालो. दुपारी ३. ३० ला निघणारी ट्रेन ४. ३० ला निघाली व रात्री ८. ३० ला गोसाईगाव ला पोचणारी रात्री ११. ३० पोचली. तेथील कार्यकर्ते श्री सोनानदा मला घेण्यासाठी स्टेशन वर वाट पाहत होते. त्यांचे सोबत रात्री एका व्यापारी कार्यकर्त्याकडे माझी झोपण्याची व्यवस्था होती. रात्री खूप उशीर झाल्याने मी जेवण घेण्यास नकार दिला.  
दुसऱ्या दिवशी ८ ला सकाळी दुसरा एक कार्यकर्ता मिलनदा मला घेण्यास आला त्याचे सोबत मी ३० कि. मी अंतरावरील डिंगडींगा या गावी गेलो. तेथे केशव सेवा समिती कार्य करते. तेथे मुक्काम करून मी तेथील काम आटोपले. दुसरे दिवशी  ९ तारखेला मला घ्यावयास मिलनदा बाईक घेऊन तयार होते त्यांचे सोबत मग मी गुरुफेला येथे ज्यूट प्रोसेसींग, शाळा व गो ग्राम प्रकल्प आहे तेथे गेलो. येथे सर्वदूर कार्यकर्ते खूप मन लावून प्रकल्प राबवितात परंतु त्याचे हिशेब लिहिण्यात मात्र गडबडतात. मी त्यांना सोप्या रितीने हिशेब कसे लिहावयाचे हे सांगतो. ही सोपी पद्धत मग ते अंगिकारतात व तसे काम सुरु करतात. त्यांचे मग सुरळीत झालेले हिशेब बघून ते व मी आम्ही दोघेही सुखावतो. तिथून मग मी गोसाईगाव येथे मुक्कामाला आलो.
गोसाइगाव येथे सेवा भारती कॉम्प्युटर सेटर चालविते. मिशन च्या कॉम्प्युटर सेंटर वर १५०० रुपयाच्या फी च्या तुलनेत हे सेंटर ६०० रुपये आकारते. त्यामुळे या सेंटर वर वेटिंग लिस्ट असते. एक होतकरू व प्रशिक्षित कार्यकर्ता हे सेंटर उत्कृष्ट रित्या चालवीत असून गावात या केंद्राचे खूप नाव आहे. पण या व्यापात गेल्या ३ वर्षात तो निट हिशेब लिहू शकला नाही. मी ३ दिवसात केंद्राचे ३ वर्षाचे आडिट रिपोर्ट तयार करून दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मी कृतकृत्य झालो. १३ फेब्रुवारी ला मग मी गोहाटी ला परतलो. दरम्यान मी मुंबईचे परतीचे तिकिट २८ चे काढले होते पण त्या अगोदर मला मणीपुरचे काम पूर्ण करावयाचे होते. गोहाटी ला पुन्हा काही काम पूर्ण करून मग २० ला इंफालचे तिकीट काढले.
मणीपुरला इनर लाईन परमीट लागत नाही परंतु रस्त्याने जायचे झाल्यास रस्ता नागालँड मधून जातो. व नागालँड मध्ये इनर लाईन परमीट लागते. दुसरे असे की नागालँड मध्ये दहशतीचे वातावरण कायम असल्याने तो एक धोका असतो व बी एस. एफ चे जवान या प्रकाराने खूप कंटाळलेले असल्याने ते प्रवाशांना देखील त्रास देतात. हा पल्ला देखील खूप लांबचा व वेळ खाऊ असल्याने विमान प्रवास हाच उत्तम मार्ग आहे. ४० मिनिटात इनर लाइन परमिट शिवाय आपण गोहाटिहुन इंफाल ला पोचतो  त्यानुसार मी ११. ५० ला निघून १२. ३० ला इंफाल ला पोचलो. रणबीर सिंग हा मैती कार्यकर्ता मारुती ८०० ने मला घ्यावयास आला होता.  कार्यालयात जाऊन मी माझ्या कामाची पूर्वतयारी केली व मग जेवून कामाला सुरुवात केली.  येथील माझ्या कामात मुख्य सूर्याजी पिसाळ म्हणजे येथील लोड शेडिंग २० तास येथे लाईट नसतात. विज सकाळी ६-८ व रात्री १० ते १२. अशा परिस्थितीत मागील काम पूर्ण करणे, त्याचे प्रिंटस काढणे व पुढील काम कसे करायचे याचे शिक्षण देणे हे सर्व २२ ला रात्री मी पूर्ण केले व हुश्श केले. सेवा भारती तर्फे येथे न्य्रुरो थिरेपी चा प्रकल्प राबविला जातो. रास्त फी आकारून  सेवा भावी वृत्तीने चालणाऱ्या या प्रकल्पाला स्थानिक लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. मणीपूर सेवा समिती या नावाने बाल संस्कार वर्ग चालविले जातात. ख्रिस्तीकरणापासून लहान बालकांचा बचाव करून त्यांचेवर चांगले संस्कार करून त्यांना सुजाण नागरिक बनविणे हा उदात्त हेतू.  २३ ला मग मी  साईट सिइंग ला जायचे ठरविले इंफाल हून ४० कि. मी दूर माइरैंग येथे आझाद हिंद सेनेचे वार मेमोरियल या नावाने सुभाषचंद्र बोस यांच्या युद्धकालीन आठवणी जोपासल्या आहेत. त्या वास्तूला भेट देणे हा माझा मुख्य उद्देश होता.
२४/२/२०१२
आज माझा मणीपूर मधील शेवटचा दिवस. उद्या ११/५० च्या सकाळच्या प्लाईट ने गोहाटी ला जाणार. मणीपूर ला मी २० ला गोहाटीहुन आलो. येथे, सेवा भारती मणीपुर व मणीपूर सेवा समिती या संस्था कार्यरत आहेत. माझे येथील मुख्य काम २२ ला आटोपले. कार्यालय प्रमुख श्री जत्राजींना सर्व समजावून सांगून व आवश्यक ते रिपोर्ट्स देऊन मी मुक्त झालो. त्यांनी दुसरे दिवशी मणीपुरांची सहल करून येण्याबद्दल सुचविले. ते उद्या सकाळच्या फ्लाईट ने सिलचर ला बैठकी साठी जाणार असल्याने त्यांना सकाळी एअरपोर्टवर सोडून मग मी पुढे माइरांग, व परिसरातील स्थळे अवश्य पाहून यावे असा बेत ठरला. त्याप्रमाणे मी सकाळी त्यांना सोडून प्रथम माइरैंग ला गेलो. या स्थळाला सुभाष बाबूंच्या मुळे विशेष महत्त्व आहे. स्वतंत्र भारताचा पहिला ध्वज त्यांनी इथे फडकविला. दुर्दैवाने ब्रिटिश सैन्यापुढे त्यांना येथून माघार घ्यावी लागली. पण त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून येथे त्याचे भव्य स्मारक आहे. त्यात त्यांचे व आझाद हिंद सेनेच्या कर्तृत्वाचे फोटो जतन करून ठेवले आहेत. त्या परिसरात फिरताना आपण नकळत त्या काळात वावरत असतो. हा भाग मणीपूर मधील विष्णुपुर जिल्ह्यात येतो. येथे मणीपूर मधील १०-१२ स्वातंत्र्य सैनिकांचेही फोटो जतन केले आहेत. या व्यक्ती कर्नल मलीक सोबत त्याकाळी वावरले होते. येथे आझाद हिंद सेनेला ब्रिटिश सैन्यापुढे माघार घ्यावी लागली व नंतर ब्रिटिशांनी युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले व नंतर सिंगापूर येथे कैदेत ठेवले. लाल किल्ल्यावर त्यांच्या विरुद्ध चाललेल्या खटल्यात मुक्तता झाल्यानंतर हे सिंगापूर जेल मधून मुक्त झाले व मणिपुरला परतले.
या स्मारका मधील क्षण मनात साठवत मग आम्ही येथून काही मैलावर असलेल्या किबुल लामजाओ जंगल सफारी वर निघालो. येथे आशियातील सर्वात मोठे तळे असून येथे एक विशेष प्रकारचे गवत वाढते व त्याची कोवळी पाने आवडीने खाणारे हरिण मोठ्या प्रमाणात येथे वावरतात त्यांना बघणे हे येथील मुख्य आकर्षण. त्यासाठी ठिकठिकाणी उंच मचाणे बांधली आहेत. या तळ्यात जरी गवत वाढत असले आणि येथे हरिणांचे वास्तव्य असले तरी हे कुरण तरंगणारे आहे. हे ऐकून आश्चर्य वाटले तरी ही वस्तुस्थिती आहे. तरंगण्याचे कारण देखील मजेदार आहे. हे तळ्यात वाढणारे गवत काही काळानंतर वाळते व त्याचे जागी नवीन गवत येते. अशी क्रिया सतत चालू राहिल्याने एक प्रकारे विशाल अशी तराफ तयार होते. व ही तराफ पाण्यावर तरंगत राहते. तलावाचे अस्तित्व कळावे म्हणून हे गवत मोठ्या अजस्र यंत्राद्वारे काढल्या जाते व पाणी मोकळे केले जाते. कितीतरी शेकडो मैलापर्यंत हे तळे पसरले असून आशियातील सर्वात मोठे तळे असा बहुमान यास आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भराव टाकून मध्ये मोठा रस्ता करण्यात आला आहे व नजिकच्या पहाडापर्यंत नेण्यात आला आहे. वरून या तलावाचे व सभोवतालच्या पर्वत रांगांचे दृश्य फारच मनोवेधक दिसते. मणीपूर हे मैती अतिरेक्यांनी ग्रस्त असून हे पर्यटन स्थळ बनू नये यासाठी अनेक अडथळे निर्माण केल्या गेले पण सरकार देखील त्यास पुरून उरले व हे पर्यटन स्थळ तयार झाले. तरी देखील हा विष्णुपुर जिल्हा आजही धोक्याचा गणला जातो व लहान मोठ्या घटना येथे कायम घडत असताना दिसतात. मिलिटरी चे मोठ्या प्रमाणात अस्तित्व येथे जाणवते. आम्ही परत येताना एक लग्नाच्या वऱ्हाडाचा ताफा फुल मिलिटरी प्रोटेक्शन मध्ये जाताना आम्हाला दिसला. गमतीचा भाग म्हणजे येथे २० तास लोड शेडिंग असते. व्हि. आय पी असा एक भाग इंफाल मध्ये आहे जिथे विज दिवस भर व रात्री असते. मी शेवटी माझे काम आटोपण्यासाठी एका व्हि. आय पी भागात माझा लॅपटाप घेऊन काम केले. हा ही एक अनुभव मला नवीन होता. सामान्य जनता मात्र या प्रकाराला सरावलेली दिसली.  
जंगल सफारी मध्ये एक लहानशी दुर्घटना माझ्या बाबतीत घडली. मचाणावरून उतरताना मी उतारांवरून सरळ रस्त्यावर गुडघ्यावर पडलो. जाड पैंट असूनही माझा टोंगळा जबरदस्त दुखावला व चिरल्या गेला. दिवसा मला तारे दिसू लागले. गाडीत असलेले एक फडके घट्ट बांधून मी रक्तस्त्त्राव बंद करण्याचा प्रयत्न केला. व बैंडएड वगैरे तुटपुंज्या साधनांनी पुढील पर्यटन कसेतरी पार पाडले. ४५ कि. मी चा इंफाल पर्यंतचा प्रवास मात्र हवालदिल अवस्थेत गेला. इंफाल मध्ये एका छोट्या क्लिनिक मध्ये जखम पाहिल्यावर डाक्टरनी चार टाके लावून जखम शिवली, टिटैनस चे इंजेक्शन दिले व खूप काही औषधे ५ दिवस पुरतील अशी दिली ही घटना २३ ची २६ ला ड्रेसिंग बदलणे व २९ ला टाके काढणे अशा सूचना दिल्या. या सर्व प्रकाराने २३ व २४ हे दोन दिवस पलंगावर पडून राहणे व औषधे घेणे या शिवाय माझ्या समोर पर्याय नव्हता. या काळात रणबीर व रिकी या तोन मैती तरुणांनी माझी जी देखभाल केली त्याला तोड नव्हती. दोघेही संपूर्णं काळात :"हम बेवकूफ है हमे अक्कल नही आपकी देखभाल भी नही कर सके असे म्हणून म्हणून बेजार करू लागले: त्यांच्या त्या निरागस प्रेमाने मी मात्र खूपच भारावून गेलो. अशा तऱ्हेने  माझ्या मणीपुर प्रवासाचा समारोप झाला..
२७/२/२०१२
 .  
दुखऱ्या पायाचे काल ड्रेसिंग केले त्यामुळे आज पायाला आराम होता. तेव्हा आज थोडा बाजार करून नात, मुलगी व सौ. साठी काही भेट वस्तू घ्यावी या उद्देशाने मी निघालो. पुण्यात आल्यावर जसे तुळशीबागेत गेल्या शिवाय पुणे वारी पूर्ण होत नाही तसे गोहाटी चा फैन्सी बाजार हे येथील मुख्य आकर्षण.  दुपारी तेथे फेरफटका मारून व आवश्यक त्या वस्तू घेऊन मी कार्यालयात परतलो. उद्या सकाळी ८. ५० ची फ्लाईट आहे. जवळूनच एअर पोर्ट साठी बस जाते एअरपोर्ट ला जाण्यास १ तास लागतो. आसाम मध्ये कुठल्याही कारणाने रोड ब्लॉक ची शक्यता असल्याने बस ६. १५ ला सुटते. त्यामुळे सर्व आवरून ६ ला निघणे आवश्यक आहे. येथे पहाटे ४ ला उजाडत असल्याने तशी वर्दळ सुरु होते.
असा हा माझा प्रथमच ३ महिन्याचा प्रवास संपुष्टात आला. १ जुन ला पुन्हा येण्याच्या निश्चयाने मी उद्या पुण्यात पोचणार व आपल्या लोकांमध्ये म्हणजे मराठी वातावरणात पोचणार. या भागात सर्व जण इतक्या आत्मीयतेने वागतात की आपण कुठल्या वेगळ्या संस्कृतीत वावरतो याची यत्किंचितही जाणीव होत नाही. तरी आपल्या भाषेतील वातावरणाची ओढ मात्र कायम असते. आपल्यात इतके दिवस वावरणारा हा माणूस उद्या जाणार याची खंत मला माझ्या आसपास वावरणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे त्यांमुळे मी देखील थोडा उदास आहे.
संध्या ४. ५५ 
२८/२/१२
आज सकाळी ४ ला उठलो. स्नान वगैरे आटोपून ५ ला इथे एकात्मता स्तोत्र होते त्याला बसलो. आज भारत बंद आहे त्यामुळे एकरपोर्ट च्या बसचे तिकीट मिळाले नाही. उल्हासजींनी मग सेवा भारतीची एम्ब्युलन्स ने पोचवण्याची व्यवस्था केली. ५. ४५ ला निघून ६. १५ ला विमानतळावर होतो. सुरज हा गाडी चालवीत होता. पायाच्या त्रासामुळे संतोष मदतीला आला होता. त्याने सामानाच्या ढकलगाडी आणून सामान  ठेवून दिले. उद्या माझ्या लग्नाचा २८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मी सुरज जवळ ५०० रुपये मिठाई आणण्यासाठी व कार्यालयात वाटण्यासाठी दिले. दोघांचे ही चेहरे माझ्या जाण्याने उदास होते. मी परत १ जुन ला येत असल्याचे सांगितल्यावर थोडे उजळले. माणूस आपल्या गोड बोलण्याने कसा जीव लावून जातो याचा अनुभव मी घेत होतो. चार वर्षात ही सर्व मंडळी खूपच जिवाभावाची झाली आहेत. किचन बघणारा राजिव राभा माझ्या पायाला लागल्याने जेवायला खाली न येण्याबद्दल सुचवीत होता. माझे जेवण नियमित वर आणून देत असे. चहा काफी वरच आणून देत असे. तेथील बिना मसाल्याचे व चवीचे जेवण मी कमी खातो हे बघितल्यावर तेलाच्या फोडण्या करून मला देत असे. अरुणाचलच्या विकास परिषदेच्या कार्यालयात इटानगरला देखील माझ्यासाठी गरम पोळ्या करून मला गरम जेवायचा आग्रह करणारी दिदी देखील ज्या मायेने वाढत असे त्याची आठवण झाली. बेलबारी शाळेत देखील तेथील दिदी मी कामात जेवायला जायचे विसरत असे तेव्हा ताट वाढून खोलीत वेळेत आणत असे. तसेही निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी ही मंडळी माणुसकी, आपलेपणा, जिव्हाळा जपून आहेत. नेहमी हसतमुख व आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीत आपलेपणाने संवाद साधणारी ही मंडळी खरेच जिवाला चटका लावून जातात.  तिथला भात व भाज्या आपल्या चवीच्या नसतात. कधी कधी मी मग संध्याकाळी जेवणाचा कंटाळा करीत असे त्यावेळी फळे वगैरे आणून काही तरी खायला भाग पाडणारी ही मंडळी आपली पूर्वजन्माची आप्त मंडळी असावी हा विश्वास दृढ करून जाते.
गोहाटी वरून कलकत्त्याला जाताना विमानात हे सर्व लिहीत आहे. जमिनीच्या वर ३०००० फुटावरून दिसणारे खालचे जग हे मनाला आपण किती क्षुल्लक आहोत व आपले आयुष्य किती क्षणभंगुर आहे याची प्रचिती आणून देते. कलकत्त्याला विमान बदलायचे नसल्याने मी निवांत लॅपटाप वर हे लिखाण करीत आहे. माझ्या आयुष्यातील हा नवीन अनुभव आहे.