त्यागले सर्वस्व अन्‌ समृद्ध झाला

त्यागले सर्वस्व अन्‌ समृद्ध झाला
सोडुनी घरदार गौतम बुद्ध झाला

हरकती, मुरक्या प्रियेच्या गोड स्मरल्या
कंठ गाताना अचानक रुद्ध झाला

दुर्गुणांना कांचनाचा कोट केला
क्षाळली गंगेत पापे, शुद्ध झाला

दंगलींनंतर निरंतर षंढ चर्चा
कोण कोणावर कशाने क्रुद्ध झाला

हार शास्त्रार्थात गेला जो न कोणा
शाहिरी कोड्यापुढे हतबुद्ध झाला

भोगले आल्या क्षणाला, तोच जगला
'भृंग' मन मारून केवळ वृद्ध झाला