नव्या नव्या उपचार पद्धतींचे पेव कितपत विश्वास ठेवण्याजोगे

नव्या नव्या उपचार पद्धतींचे पेव येते आणि जाते...आजार मात्र तसेच राहतात. गेल्या २०-२२ वर्षांचा आढावा घेतला गेला तर अनेक रोगनिवारक गोष्टी वावटळी सारख्या लोकांमध्ये पसरल्याचे आणि तितक्याच वेगाने ओसरल्याचे दिसते.
१० वर्षापूर्वी सकाळी फिरायला गेल्यावर जागोजागी गव्हाच्या रसाच्या गाड्या दिसायच्या. इतकेच काय घरपोच पण हे पाउच दिल्या जायचे. कर्करोगासारख्या दुर्धर रोगावर हा रामबाण उपाय सांगितल्या जायचा. आज अचानक हा गव्हाचा रस लुप्त झाला आहे. रोग बरे करण्याचे दावे पण दिसत नाहीत. 
उच्च रक्तदाब कमी करणारी जपानी गादी देखील तशीच. एम एल एम करणाऱ्यांनी  आपले खिसे भरले...लोकांचा आजार मात्र आहे तसाच राहिला. 
नोनी नावाचे एक पेय सध्या अशीच धूम करत आहे. फायद्यांची यादी लांबलचक आहे असे सांगितले जाते. वापरून बघणारे हुरळून जातात पण रोग निवारण कितपत होते कळत नाही. लिंबाची साल, दालचिनीची पूड, विविध तेले, दुधीचा रस हे सगळेच लाख दुखो की एक दवा असा दावा असतो. 
माझा मुद्दा असा की अशी जादूची कांडी कुठे असती तर सगळ्या आजारांना पळता भुई थोडी झाली असती आणि वर्षानुवर्ष संशोधनांची, अभ्यासाची गरज उरली नसती. दवाखाने उरले नसते. सगळेच निरोगी राहिले असते. 
या व असल्या अनेक औषधांची उपयुक्तता मी नाकारत नाही...काही तरी गुण असणारच पण जे दावे केल्या जातात ते अतिरंजित वाटतात ज्या मुळे कधी कधी दिशाभूल होते. आपल्या प्रतिक्रिया व अनुभव कळवावे....