सांगावा

नमस्कार,

मनोगतावर मी लेखन सुरू केले त्याला बराच काळ लोटला. छंदबद्ध कविता कशी असते, ती लिहावी की लिहू नये पासून सुरू झालेला माझा लेखन प्रवास आता वेगवेगळ्या टप्प्यांवर आला आहे. फाउंटन म्युझिकतर्फे माझा "सांगावा" नावाचा गीतांचा अल्बम प्रकाशित होतो आहे. त्यात " थोडे हसून गेली "ही मनोगताच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेली गझल फेरबदल करून स्वरबद्ध केली आहे.

दुवा क्र. १

महेश वेलणकर तसेच २००५ दरम्यान मनोगतावर छंदबद्ध लेखन वाढावे म्हणून प्रयत्न करणारे प्रवासी, आपटे, चित्तरंजन भट, फणसे, अदिती छायाताई, मीराताई, जयंता ५२, नीलहंस, कुमार जावडेकर, अनिरुद्ध अभ्यंकर, मृदुला, वैभव जोशी, प्रदीप कुलकर्णी, वरदा या सर्वांचा माझ्या लेखन प्रक्रियेत सकारात्मक सहभाग आहे.

टीका अथवा टीकाकार दोघांवर माझा आकस नाही, त्यांची भीती तर मुळीच वाटत नाही. मनोगतावर टीकाकारांची परंपरा वाखाणण्याजोगी आहे. मी कारकून या टोपणनावाने इथे लेखन केले, अनेक विडंबने केली. त्यावेळी गणमात्रा यांचा घोळ आणि आशय नाही म्हणून जी टीका झाली त्यातून मला शिकायलाच मिळाले. टोपणनाव घेऊन इथे वेगवेगळे लेखनाचे प्रयोग मी केले. त्या सर्व लेखनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनोगतींची मी आभारी आहे. मनोगतावर छंदबद्ध लेखनास प्रोत्साहन देण्याची परंपरा अजूनही सुरू आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. आता मनोगत विस्तारले आहे ही गोष्टही जुनी झाली. सुरुवातीच्या काळात एकत्र वावरणारी मंडळी नेमाने येतात असे नाही. तरी अधिकाधिक दर्जेदार लेखन करण्याचा समान धागा आपल्या सर्वांना जोडतो यात शंका नाही. त्या सर्व मंडळीच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत असे मी मानते.

हे तुझे नाव आहे ना म्हणून अनेक नावे माझी अशी विधाने गंमतीने सांगणारे विनायक काका, पोहे केले आहे ये असे हक्काने म्हणणाऱ्या रोहिणी हे मनोगतावरचे, एकमेकांवर सच्चे प्रेम करणारे एक जोडपे. या दोघांच्या ऋणात राहणे मी स्वीकारेन. या अल्बममधले शेवटचे गीत- पद्मा वाडकर यांच्या आवाजातली ठुमरी आहे - ते लिहिताना माझ्या डोळ्यासमोर फक्त रोहिणी होत्या.

कुणाची पात्रता ठरवण्याचा हक्क माझ्याकडे आहे असे मला कधीच वाटले नाही. पण एखादी गोष्ट प्रकाशित झाली की त्यावर परखड मत देण्याचा श्रोत्यांचा आणि वाचकांना हक्क मला मान्य आहे. हा अल्बम जुलैच्या २० तारखेपासून फाउंटनच्या वेबसाइटवर विक्रीस असेल. साधारण त्यानंतरच्या दोन- तीन आठवड्यात दुकानात उपलब्ध होईल. या अल्बममधली गाणी ऐका, तुमचे प्रतिसाद कळवा, ते वाचायला आवडतील.

या दुव्यावर अल्बमची एक झलक पाहता येईल.

धन्यवाद

सोनाली