पत्रकारिता! नक्की कशाची?

                पत्रकारिता हा भारतीय लोकशाहीचा स्तंभ मानला जातो, हे एक सत्य किती मोठं आहे हे आपल्या कोणालाच नवीन सांगायची गरज नाही. अगदी टिळकांच्या केसरी पासून ते आतापर्यंतच्या लोकसत्तेपर्यंत किंवा दृकश्राव्य माध्यमातील सह्याद्री वाहिनीपासून झी-२४ तास पर्यंत, सगळ्यांनी रोजच्या घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेऊन त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो वसा उचलला आहे, तो अगदी नियमित चालू आहे. फरक तो एवढाच की सध्या पत्रकारितेचं बाजारीकरण झाल्यामुळे, महत्त्वाच्या घटनांपेक्षा नको त्या घडामोडींचाच उहापोह जास्त आढळून येतो. भारतात नसल्यामुळे एका मराठी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर काल बातम्या पाहण्याचा योग आला.देशातील महत्त्वाच्या समस्यांऐवजी मोठी बातमी हि होती की राजकारण वर्तुळातल्या एका व्यक्तीने त्याच्या राजकीय विरोधकाला (किंवा सख्या-चुलत भावाला) रुग्णालयातून स्वतःच्या गाडीने घरी सोडले. त्याच विषयाला धरून वाहिन्यांवर महाचर्चा होती की ह्याचे राजकीय वर्तुळावर काय पडसाद उमटतील.खरंच का ही बातमी एवढी महत्त्वाची आहे?

                  महाराष्ट्र राज्यात पाऊस पडत जरी असला तरीही तो पुरेसा नाही आणि त्यामुळे होणारे शेतकऱ्यांचे हाल, राष्ट्रपती आणि उप-राष्ट्रपतिपदाची निवडणूक, मुंबई सारख्या शहरातील पावसाळी समस्या ह्या आणि अश्या बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांच्या उपस्थितीत वर नमूद केलेला मुद्दा जास्त की कमी महत्त्वाचा हे कळणे फार सोपे आहे पण मग माशी शिंकते कुठे? काही महिन्यांपूर्वीसूद्धा, एका अभिनेत्रीचे बाळंतपणामुळे वाढलेले वजन हा चर्चेचा विषय होता. आता कोणाचं का वजन वाढेना, त्याच्याशी सामान्य जनतेचं काय घेणंदेणं? काय झालं भारतीय पत्रकारितेला? पूर्वी तर असं काही नव्हतं मग आताच का आणि कसं? बरेच लोक म्हणतील की आम्हाला हवी आहे माहिती ह्या सगळ्याबाबतीतसुद्धा तर ठीक आहे पण मग म्हणून २४ तास आपलं तेच.आणि पत्रकारितेची हि दुर्दशा फक्त भारतात नव्हे तर जवळ-जवळ सगळीकडेच आहे. 
                    माझं असं म्हणणं नाही की सगळेच पत्रकार किंवा वाहिन्या ह्या अश्याच आहेत, पण बरेच वेळा आपल्याला ह्याच चुका आढळून येतात. जेसिका लाल हत्या प्रकरण ज्यांनी उघडकीस आणले, २जी स्केम आणि आदर्श घोटाळा ज्यांनी प्रकाशात आणला, नैसर्गिक किंवा अन्य कोणतीही आपत्ती आली तरी सामान्य जनतेला सावध करणारेसुद्धा हेच पत्रकार. असं असूनही कोणत्या बातम्यांना किती महत्त्व देणं हे काही ठराविक पत्रकारांना कधीही न उमगलेलं कोडं आहे. परिस्थिती सुधारावी अशी अपेक्षा आहे.