एक अपघाती अनुभव

तो शुक्रवार होता, वेळ तिन्ही  सांजेची होती, मी नुकताच दोन फेर्‍या मारून परतलो होतो, शेजारीण पाणी ह्या विषयावर गार्‍हाणे गात होती, भ्रमणध्वनीने लक्ष वेधले. माझा मोठा मुलगा बायकोला घ्यायला कार्यालयात गेलेला होता, तो मला नगर रस्त्याच्या इनऑर्बीट मॉलच्या समोर सिग्नल जवळ लवकर येण्याची घाई करत होता. मी आमच्या अल्टो गाडीला मॉलच्या पुढील चौकातून वळवली होती व चारही पिवळे दिवे लावून त्या अंधारात मुलाचा शोध घेत गेलो. रस्त्याच्या डाव्या बाजूला मुलगा उभा होता. त्याच्या छातीवर रक्ताचे डाग दिसले. १० - १२ टगे जमलेले होते. मी शांतपणे खाली उतरलो. एक टग्या माझ्या कडे आला.

टग्या - "ओ काका तुमच्या मुलाला जरा गाडी चालवायला शिकवा, दुसर्‍याला दोष देता!"
मी - "कोणत्या गाडीने ठोकले, तुम्ही चालक आहात का, तुमचे नाव ओळख पत्र, गाडी कोणत्या बाजूने आली????"
टग्या - "मी सतिश, मी गाडी चालवत होतो, पण चूक तुमच्या मुलाची आहे!"

चित्रात दाखवलेला प्रकार घडला होता असे जमलेल्या बघे मंडळींनी सांगितले. वाहतुकीचा हिरवा दिवा होता, रस्ता मोकळा होता, मारुती गाडी चुकीच्या बाजूने टग्याने घुसवली होती, गाडीचे दिवे वीज कपातीमुळे (?) बंद होते. त्या अंधारात असे काही समोर असणार असे समजायला वेळ मिळाला नव्हता.

माझा मुलगा - "बाबा मला खूप त्रास होतो आहे, ह्याला सोडू नका, १००, १०१ सगळे क्रमांक अस्तित्वात नाही, उत्तर देत नाही, कोणी पोलीस ला बोलवा हो!"

तेवढ्यात दोन वाहतूक पोलीस हजर झाले, ते त्या टग्याचे मित्र निघाले, "चला पोलीस चौकीत चला, तुमच्या गाड्या घेऊन या!"
सतिश अपघाताचा गुन्हा व पुरावे मिटवण्यात सराईत वाटत होता कारण त्याने त्याची मारुती गाडी एका पानाच्या टपरी समोर अशी लावली होती की हा सरळ रस्त्याने वळत असताना ह्या दुचाकीने त्याला धडक दिली असेच दिसावे.

मी - "साहेब मला कोणतीच तक्रार करायची नाही, मला पोलीस खात्याचा चांगला अनुभव आहे, तुम्ही व्यक्ती म्हणून तसे नसाल, पण माझा पोलीस व्यवस्थेचा अनुभव वाईट आहे, आम्ही आपसात एकमेकाला समजून घेऊ, चौकशी केलीत धन्यवाद!"

पोलिसाने काय समजायचे ते समजले असावे, ते दोघे पोलीस निघून गेले. सतीशच्या मित्राला मी गाडीत घेतले, मुलाला व सुनेला जवळच्या अपघात निवारण केंद्रात नेले. धाकट्या मुलाने अपघात झालेली पल्सर चालू केली व घरी नेली, कारण गाडी रस्त्यावर सोडून जाणे सुरक्षित नव्हते. त्या अपघात केंद्रातील प्रकार "रोज शेकड्याने मुडदे हाताळण्याची सवय, तुम्ही कोण? म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे" असा काहीसा होता. तिथल्या नवशिक्या बाईने सुनेचा पाय असा काही वळवला की त्याच क्षणी जीव जातो की काय असे झाले होते. "उगीच अपघात करता आणि आम्हाला त्रास देता!" असा काहीसा तो प्रकार असावा असे त्या क्षणी तरी मला जाणवले. क्ष किरण प्रतिमा नाटक पार पाडले. सुनेच्या प्रतिमा घेतल्या पण मुलाच्या डोक्याच्या, छातीच्या प्रतिमा घेण्याची जरूर नाही असे सांगण्यात आले. मात्र त्याच्या डोक्याला झालेल्या जखमेचा रक्तस्त्राव थांबावा म्हणून टाके न घालता धातूच्या "स्टेपल" बसवल्या, त्या कामात सुबकता नव्हती. श्वानाला मिळणार्‍या सोयी व त्या कामातील कुशलतेतील तफावत मला जाणवली व त्याचे कारण धक्का देऊन गेले.

त्या रात्री निरीक्षणाकरता मुलाला व सुनेला तिथेच झोपायला जागा मिळाली, रात्रभर सुनेला ट्रॅकशन - कमरेचा पट्टा व त्याला पुढे वजन लावलेले होते. डॉक्टरने सांगितलेले औषध आम्ही आणले, त्याने वेदनांचा त्रास तात्पुरता कमी झाला पण दोघांचे तोंड आतून सोलून निघाले होते. शनीवारी सकाळी एक पोलीस अपघाताची तक्रार घेण्या करता आला होता. मुलाने पोलिसी डोके दुखी टाळण्या करता चक्क सांगितले "दुचाकीच्या पु्ढ्ल्या चाकाचा ब्रेक थोडा आधी लागल्याने गाडी हवेत उडाली त्यामुळे अपघात झाला, आमची तक्रार काही नाही व आमचा रूग्णालयातील खर्च आमचे मित्र सतीश देणार आहे."

पोलिसाने त्याचे रंग उधळले. अपघाताची नोंद केलेल्या कागदावर सुनेची सही घेतली. त्यानंतर दोन वाक्य त्यात घुसवली, "माझ्या नवर्‍याने हेल्मेट घातली नव्हती व त्याने समोरून येणारी गाडी न बघता वेग वाढवला त्यामुळे मी हवेत उडून खाली पडली.... (जय महाराष्ट्र, पोलिसी झटक्याचा जयजयकार असो). मुलाचे सासरे तिथेच होते त्यांनी ते वाचले व आक्षेप घेतला, ती वाक्ये नीट खोडून घेतली. पोलिसाने सासर्‍याला बाहेर नेले व जावयावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा सुरू केला. त्यांनी तो साफ नकाराला. माझा धाकटा मुलगा हे सगळे बघून चिडला होता. त्याने टग्या सतिशला तातडीने रूग्णालयात बोलावले व पोलीस काय प्रयत्न करतो आहे ह्याची कल्पना दिली. सतीशच्या मित्राला बघितल्यावर पोलिसाने तक्रार रद्द करण्या करता काही हजाराची रक्कम मागितली. सतीशच्या मित्राने कोणत्यातरी वरिष्ठाला त्या पोलिसाला समज देण्याचे सांगितले. चाके फिरली तो पोलीस चहापाण्याची रक्कम घेऊन निघून गेला.

माझ्या मुलाच्या छातीतील वेदना १४ तासा नंतर कमी झालेल्या नव्हत्या, म्हणून क्ष किरण प्रतिमा नाटक पार पडले. वास्तविक हे सगळे रूग्णालयात दाखल करतानाच होणे आवश्यक होते. परिचारीकेने झोपेतून उठवून सलाईन बाटली लावण्याचा कारण नसताना सारखा आग्रह केला होता. संध्याकाळी आम्हाला घरी जाण्याची परवानगी मिळाली. ठरल्या प्रमाणे सतीश रूग्णालयाचा खर्च द्यायला आलाच नाही, मीच खर्च दिला. एका छोट्या कागदावर पावती मिळाली होती.

अपघाताचा तिसरा दिवस, मी मुलाला व सुनेला माझ्या विश्वासातल्या वैद्य बाईंचा सल्ला घेण्या करता नेले. त्यांनी तीन औषधे लिहून दिली. मुरिवेण्णा तेल, धरासणा लेप, वाताचा त्रास न होण्या करता गोळ्या. ह्या अपघातात मुका मार व त्याच्या वेदना फार त्रास देत होत्या ह्या तेलाने व लेप लावून त्या पुढील तीन दिवसात खूप कमी झाल्या. सतिशने रूग्णालयाचा चार हजाराचा खर्च फक्त तीन हजार पाचशेच दिले व पाचशे पोलिसाचे चहा पाणी म्हणून कापले होते. डॉक्टरने सीटीस्कॅन करण्याचे सांगितले होते त्याचे तीन हजार सतिशने दिले नाहीत. चूक कबूल न करण्याची टगेगिरी अजून दाखवली वरून आम्हालाच समज दिला " ओ काका माणुसकी म्हणून खर्च दिला म्हणून काय मन मानी करता काय, जा कुठे तक्रार करायची तिथे जा!"

रूग्णालयाने रीतसर खर्च पावती व संबंधित पत्रांचा घोळ घातला. सुनेच्या नावाने पत्र व पावती तयार केली होती मुलाचे त्यात नाव नव्हते. ते निस्तरण्यात तीन दिवस गेले. तो पूर्ण आठवडा रूग्ण भेट व मोफत सल्ला ऐकण्यात गेला "शहाण्याने पोलीस कडे जाऊ नये, तो वेडे पणा तुम्ही केलात नाही हे बरे झाले ... देव पावला थोडक्यात बचावले नाहीतर जन्म भर अपघाताचा त्रास सहन करावा लागला असता." वगैरे ऐकावे लागले. कोणीही पुष्पगुच्छ आणले नव्हते हे चांगले झाले, अहो त्या पुष्पगुच्छांचे सोबती माशा आणि चिलटांचा त्रास चार दिवस उगीचच सोसावा लागला असता.
 
असो अती साखरेच्या त्रासाचा किस्सा पुन्हा कधीतरी सवडीने !!!!!!!