प्रकाशकांना पत्र

मी गेले वर्षभर मनोगतचा सदस्य आहे. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोगतात उपलब्ध असलेली शुद्धलेखन तपासायची सोय. ऱ्हस्व, दीर्घ ह्याबाबत माझा नेहमी गोंधळ असतो आणि तो अजूनही आहे. त्यामुळे मराठीत लिहिण्यास संकोच असे. मनोगतमुळे आता मी न घाबरता लिहू शकतो. इ-पत्र लिहिताना मी मजकूर प्रथम मनोगतमध्ये लिहितो, ते शुद्धलेखनासाठी तपासतो व मग copy and paste करून इ-पत्रात नेतो.

Phonetic टंकलेखनाची सोय आता बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असते. सुदैवाने मनोगतवर ती आहे. त्याशिवाय लिहायचे तर गती इतकी मंदावते की लिहिणे नकोसे होते.

वर्ष ओलांडून गेले तरी मला मनोगतमधल्या बऱ्याच गोष्टी अजून नीट कळलेल्या नाहीत. मी प्रतिशब्दांचे योगदान केले आहे. पण मला बऱ्याच गोष्टी विचारायच्या होत्या, काही मते व्यक्त करायची होती. पण प्रकाशकाला ह्या कशा विचाराव्या हे कळत नव्हते. दोन तीन वेळा 'साहाय्य' सदर वाचले पण तिथे हा प्रश्न सुटला नाही. शेवटी आज एक नवीन चर्चा सुरू करून ते पत्र लिहीत आहे.

आज पुस्तके सदर बघत होतो. तिथे पुस्तकांवर  review  दिसतात. पण पुस्तकाबद्दल मूळ माहिती (मथळा, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, प्रकाशनाचे वर्ष, पानांची संख्या व किंमत) लिहिलेली नसते.

चर्चा सदरात बऱ्याच चर्चा आहेत. पण कुठल्याही विशिष्ट चर्चेला पोचण्यासाठी बरीच पाने ओलांडावी लागतात.

हे पत्र प्रकाशित झाल्यावर अधिक लिहीन.