मडो आणि काउ!

असं म्हणतात की माणसांना जिंकून घेण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो. माणसाची जीभ हा मोठा विलक्षण  अवयव देवाने घडवला आहे. अन्न हे आपल्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. आपल्या संस्कृतीमधे तर त्याला पूर्णब्रह्माचा दर्जा दिलेला आहे. आणि अन्नग्रहणाला यज्ञकर्म मानायला सांगितले आहे. जर अन्नग्रहणात उदरम् भरणम् एवढाच उद्देश देवाला अपेक्षित असता तर त्याने रसग्राही अशी रसना म्हणजे जीभ कशाला निर्माण केली असती? पण काही म्हणा, जिभेचे चोचले पुरवण्यातला जो काही आनंद आहे तो अवर्णनीयच म्हणायला हवा.

सध्या ग्लोबलायझेशनच्या युगात केवळ देशातल्याच नाही तर जगातल्या विविध प्रांतांमधले खाद्यपदार्थ आपल्याला अगदी सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यातून पुण्यासारख्या खव्वैय्यांच्या नगरीत तर हल्ली काय वाट्टेल ते खायला मिळतं. तरीही गेली साठ सत्तर वर्षे पुण्या - मुंबईच्या जिभांवर अधिराज्य गाजवणारे काही खास जिन्नस म्हणजे मिसळ, बटाटेवडा, पावभाजी आणि अस्सल उडुपी पद्धतीच्या उपहारगृहांमधून मिळणारे दाक्षिणत्य पदार्थ.

यातल्या पांढऱ्याशुभ्र वाफाळत्या चविष्ट इडलीने तर आपला सगळा देश केव्हाच काबीज केला आहे. आणि या इडलीचा तिच्याइतकाच लोकप्रिय असलेला जगज्जेता भाऊ म्हणजे डोसा. माझ्या माहितीत डोसा न आवडणारा एकही माणूस नाही. उलट गेली अनेक वर्षे आमच्या घरी ’बाहेर  जेवायला जाणे’ ही संज्ञा ’डोसा खायला जाणे’ याला समानार्थी म्हणून वापरली जाते. अर्थात डोसा इतका आवडतो की घरीही तो अनेक वेळा होतो. तरी पण हॉटेलात जाऊन डोसा खाण्याची मजा काही औरच असते हे मात्र खरे. घरच्या डोशाची सर हॉटेलातल्या डोशाला येत नाही पण हॉटेलातल्या डोशची चव कधीच इतरत्र सापडत नाही. मला दोन्हीही प्रकार आवडतात. त्यातल्या त्यात हॉटेलमधे जाऊन डोसा खाणे हा एक स्वतंत्र अनुभव असतो. तिथे जायचं हे ठरल्यावर अगदी पोटातून आनंद होतो. नकळत आजवर खाल्लेल्या चविष्ट् डोशांच्या अनेक आठवणी मनाला गुदगुल्या करून जातात. डोसा या शब्दातच काहीतरी जादू असते. त्या शब्दात चविष्ट, स्वादिष्ट असं एक प्रॉमिस असतं. रसनेबरोबरच अंतरात्मा तृप्त करण्याची अमोघ शक्ती त्या सगळ्याच खाद्यानुभवात असते. आणि त्या डोश्याची वाट पाहण्यात एक अप्रूप असतं एक अपूर्वाई असते. मग प्रत्यक्ष हॉटेलमधे पोचल्यापासूनच त्या परिचित अनुभवाच्या पुनःप्रत्ययासाठी मन अगदी उत्सुक होऊन जातं. थोडा वेळ वाट पाहिल्यावर तिथला वाढपी डोशाची ती तांबूस सोनेरी वळकटी सांबारा-चटणीच्या लवाजम्यासकट आपल्या पुढ्यात आणून ठेवतो. डोश्याच्या अतिप्रिय वासाचा घमघमाट सुटलेला. सगळ्या बाजूंनी छान सोनेरी झालेला तो कुरकुरीत डोसा. जरा दाब पडला की मोडणारा. त्याची जादू मला अगदी वेढून टाकते. त्याने काटे चमचे समोर ठेवायच्या आधीच हाताने डोशाचा तुकडा मोडून खायला सुरुवात करायची असते. कारण डोसा ही काट्याने खायची चीजच नव्हे. त्याचा तो गरम कुरकुरीत स्पर्श हाताला होतो तिथपासून आपण त्याचा आस्वाद घ्यायला लागतो. अशा वेळी तर मला एरवी जीव की प्राण असणारी ब.ची भा. सुद्धा कस्पटासमान वाटायला लागते. सगळ्या तोंडभर त्याची  चव पसरते. नाकाला वास आधीपासून जाणवत असतो. आपल्या कल्पनेतली डोश्याची चव आणि प्रत्यक्षातली  डोश्याची चव एकमेकींशी जुळली की मला अगदी पोटापासून आनंद होतो. मी त्या चवीत बुडून जाते.  डोशाचा पहिला घास जिभेवर ठेवताना त्या घासाबरोबर अंतर्भूत असणारं ते खमंग चवीचं प्रॉमिस, त्याचा तो खरपूस तांबूस सोनेरी स्पर्श, आणि तो घास निर्माण करत असलेले तृप्तीचे तरंग हे सगळं आधी मनाला जाणवतं आणि मग ते जिभेलाही जाणवतं. मग हळूच एक तुकडा सांबारात बुडवायचा आणि जिभेवर ठेवायचा. तो घास अक्षरशः तोंडात विरघळतो आणि त्या चवीची अपूर्वाई, तिच्याबद्दल वाटणारं अप्रूप पुन्हा नव्याने जाणवतं. त्या चवीत बुडून जाताना एक अवर्णनीय असा आनंद पुन्हापुन्हा अनुभवायला मिळतो. जणू काही मी माझ्या जिभेशी एकरूप होऊन जाते. तुकड्या तुकड्याने समोरचं ते पूर्णब्रह्म पोटात जातं आणि अंतरात्मा तृप्त होऊन जातो. त्याची तुलना एक तर पहाटेच्या साखरझोपेशी करता येईल किंवा एखाद्या गोड अशा सुखस्वप्नाशी करता येईल.
अशीच मजा भरपूर कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून केलेला उत्त्प्पा खाताना येते. तेलावर दोन्ही  बाजूंनी खमंग खरपूस भाजलेला तो जाडसर उत्तप्पा खाताना काटे चमचे वापरायची हौस व्यवस्थित भागवता येते. उत्तप्याचा शेवटचा घास घेताना मला नेहमी ’थोडासा अजून खायला हवा होता’ असं वाटून जातं. पण पोट तर भरलेलं असतं. जीभ इथेही भलतीच खूश होते पण तरी हॉटेलात जाणे या घटनेच्या हिरोचं काम उत्तप्प्याला कधीच मिळत नाही. तो मान मात्र केवळ डोशाचाच! 

पण हल्ली तो माझ्या आठवणीतला अपूर्वाईचा डोसा कुठेतरी हरवला आहे. हा नक्की कशाचा परिणाम आहे हे माझं मलाच कळत नाही. कदाचित डोसा हॉटेलातून बाहेर पडून हल्ली रस्तोरस्ती मिळायला लागल्याचा हा परिणाम असेल. अतिपरिचयादवज्ञा म्हणतात ना तसं काहीसं. कारण हल्ली दावणगिरी डोशापासून ते अगदी पावभाजी डोसा , चिनी डोशापर्यंत डोशाचे अनेक प्रकार रस्त्यावर खायला मिळतात. हॉटेलांची संख्याही हल्ली चिकार वाढलेली आहे. त्यामुळे पूर्वीसारखं मुद्दाम वेळ काढून वगरे डोशाला भेटायला जाण्याची गरजच उरलेली नाही. शिवाय कॉलेजात गेल्यापासून घराबाहेर राहण्याचा वेळ चिकार वाढल्यामुळे गेल्या काही वर्षांमधे भूक लागली की पटकन पोटभरीचा आणि खाल्ल्यावर जडत्व न आणणारा म्हणून डोसा - उत्तप्पा खाल्ला जातो. हेही एक कारण असेल कदाचित. आणि ऑफिस कॅन्टीनमधे तर काय तो रोजच उपलब्ध असतो हेही कारण असू शकेल. किंवा कदाचित तो निरागस आणि निर्मळ आनंद उपभोगायची क्षमताच नष्ट झाली असेल.  हे असगळं मला खूप अस्वस्थ करून सोडतं.

अशा वेळी वाटतं, पुन्हा एकदा लहान व्हावं, परीक्षेत चांगले मार्क मिळाल्याबद्दल डोसा खायला जायचा बाबांकडे हट्ट करावा आणि प्रत्यक्ष हॉटेलात पोचल्यावर बाबांनी काय खाणारेस असं विचारल्यावर अभिमानाने त्यांना सांगावं "मडो आणि मग काउ" आणि बाबांनी विचारावं "दोन्ही दोन्ही संपेल ना तुला? नाहीतर शेवटी मला संपवायला लावशील"!

अदिति
भाद्रपद शु १० शके १९३३,
२५ सप्टेंबर २०१२