ये २०१२ है बॉस... ना तमीज से राहा जाता है, ना तमीज से देखा जाता है!

नव्या पिढीचा पुरस्कर्ता हीरो कोल्ड ड्रिंक आणि मॅच च्या नादात, हॉल मध्येच झाडांच्या कुंड्या आणून ठेवतो.. का तर म्हणे, सारखं उठायला लागू नये हा आळशीपणा आणि त्यासाठी केलेली  "सोय" !   वर आपल्याच नादात म्हणतो ये टी२० है बॉस... ना तमीज से खेला जाता है..ना तमीज से देखा जाता है !!

जाहीरात बघून पहिल्यांदा मनात आलं ते म्हणजे -तमीज आणि बदतमीज ह्या शब्दातला फरक !
आजकालच्या युगात (२०१२) बहुतांश सगळ्याच गोष्टी ज्या आधी "बदतमीज" मध्ये गणल्या जात होत्या त्याची व्याख्या "फॅशन/ट्रेंड/जनरेशनNext" इ. इ. गोंडस नावे देऊन "तमीज" ह्या कॅटेगरी मध्ये आणल्या जात आहे.... !
आम्ही कितीही तरुण आणि नव्या पिढीतले असलो, तरी अनेक ठिकाणी आपल्या लाडक्या  पु.लं'चे  "आमच्या वेळी असं नव्हतं ! " हे वाक्य नेहमीच अगदी फिट्ट बसते...!  
अगदी शाळेपासूनच घ्या ना... आजकाल गॅदरिंग मध्ये सुद्धा लहान लहान मुले-मुली "शीला की जवानी / मुन्नी बदनाम हुई / चिकनी चमेली" इ गाण्यांवर नाचताना दिसतात... आणि हाईट म्हणजे त्यांचे पालक'च त्यांच्याकडून हे डान्स बसवून घेतात म्हणे !
कॉलेजमध्ये तर सगळाच आनंद आहे - शाळेत, घरात जे जे करायला मिळत नाही ते सगळं कॉलेजमध्ये आल्यावर करता येतं ! - आता कॉलेजमध्ये आम्ही पण गेलो, आम्ही पण सगळ्या गोष्टी केल्या, पण लेकांनो दुसऱ्या माणसाला तोंड उघडायला जागा न ठेवता केल्या ! झाकली मूठ सव्वा लाखाची  - हा नियम काटेकोरपणे पाळून! 
वर्जित गोष्टी तुम्ही राजरोसपणे उघड उघड करता आणि वरून बाकीच्यांना म्हणता की OLD GENERATION ?
नदीकाठचा रस्ता म्हणजे तर ह्यांचेच अड्डे !  पेन्शनरांनाच काय पण कोणत्याही फॅमिली मॅन ला तिथे संध्याकाळी फिरायची लाज वाटावी !  बदतमिजी Unlimited !!
हे झाले तरुणांचे, आता वरिष्ठांचे पण ऐका,
पहाटे ४ वाजता तर वॉचमन पण झोपलेले असतात राव... हे लोक ३.३० - ४ पासूनच प्रभात फेरी मारायला म्हणून बाहेर पडतात.. आणि बाकी लोकं जागी होण्याआधीच कोणाची फुलेच तोड, कोणाच्या बागेतली मातीच पळव, तुळस/दूर्वाच काढून ने !! अरे काय हे ? फिरायला आला आहात तर फक्त फिरून या... जमलं तर थोडा व्यायाम करा, पण हे असले चोरापोरांचे धंदे कशाला ?
हीच गत कुत्री फिरवण्यासाठी येणाऱ्यांची !  हे लोक रस्ते खराब करण्यासाठीच कुत्री पाळत असावेत आणि आळीपाळीने रस्त्यावर ह्या घाणेरड्या रांगोळ्या काढायची जबाबदारी घेत असावेत... जर्मन शेफ़र्ड वाला आज डावीकडून गेला तर उद्या उजवीकडून जाणार...कारण ग्रेड डेनला डावी बाजू P1/P2 तत्त्वावर दिलेली असते वगैरे... !
ह्या लोकांसाठी परदेशी सरकार हवे -- प्रत्येक वेळी सफाईसाठी दंडाची रक्कम घेतली गेली पाहिजे ! आणि पुनःप्रत्ययाच्या वेळी डबल चार्ज हवा !
पण, आपल्याला चांगल्या गोष्टीचे अनुकरण करणे जमतच नाही... त्यांचे "वाईट" ते घ्यावे कारण जमानाच बदतमीचा झाला आहे ना..
सकाळी सकाळी "गाऊनवर" फिरणाऱ्या बायका बघितल्या की तर शिसारीच येते   इतर वेळी झक-पक असणारा स्त्री समाज इतके ओंगळवाणे कसे राहू शकतात ...? परदेशात "गाऊन" हि CONCEPT फक्त  बेडरूम च्या आत असते ही बाब सोयिस्करपणे विसरली जाते... आणि वस्त्र-परिधान स्वातंत्र्याच्या नावाखाली असले "गाऊन" घालून फिरले जाते....कपडे घालण्याचा एवढा कंटाळा का ? आराम आणि सुटसुटीतपणाच हवा असेल तर सलवार कमीज किंवा तत्सम ऑप्शन उपलब्घ आहेतच की...
मुलींचे तोकडे कपडे म्हणजे फॅशनेबल ही तर इतकी वाईट बाब आहे की काही विचारू नका... मुली सर्रास मिनीज,मिडीज,हाफ पॅंट घालून फिरत असतात...आणि त्यांचे आई बाप त्यांना प्रोत्साहित करतात....ज्यांचे करत नाहीत, त्यांना टिप्स देण्यासाठी DELHI-6 आणि तत्सम सिनेमा माईलस्टोन आहे असे वाटले होते, पण नंतर कळले की सिनेमामध्ये ह्या ट्रिक्स मुलींनीच सुचवल्या होत्या... खूप आधीपासून त्या ह्या वापरतच होत्या....!
मुलींच्या टीशर्ट्स -टॉप्स बद्दल न बोललेच बरे....मुलांची बरोबरी करता करता इतक्या खालच्या थरावर जाऊन पोहोचतील हे कधी वाटले नव्हते... !! एक तत्त्व मला पटते... जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर आपले पैसे/दागिने उघड्यावर ठेवू नयेत !  "शोले" मध्ये सुद्धा जय-विरू डाका टाकायचा प्लॅन तेव्हाच करतात जेव्हा ठाकुर तिजोरी उघडून दाखवतो...  !
ह्या बदतमीजी बद्दल बोलले गेले तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या पाट्या वर काढल्या जातात... पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे ह्या बदतमीज पुरस्कर्त्या मुलींना/लोकांना कधी कळणार ?!
सार्वजनिक बदतमीजी मध्ये "फ्लेक्स-बोर्ड" बाजीमुळे तर सगळ्या रस्त्यांची वाट लागली आहे - एकही दिशादर्शक संपूर्ण दिसेल असे नाही सगळीकडे, काका, मामा, बाबा, तात्या, भात्या इ . इ . ना शुभेच्छा, त्यांचे भलेमोठे फोटो, अमुक मंडळ, तमुक मंडळ, अरे काय हे ?
बाहेरचे लोक नावं ठेवतील नाही तर काय ?
अशी स्वतःची फ्लेक्स लावणे म्हणजे "नाव काढणे" समजणाऱ्यांना खरे तर हे समजावयाला पाहिजे की ह्याला बाहेरचे लोकं "नावं ठेवणे" असे म्हणतात.
असो बाकी काय बोलणार,  
। कालाय तस्मै नमः ।