जगण्यास अमृताची आली जणू खुमारी!

जगण्यास अमृताची आली जणू खुमारी!
रिचवीत फक्त गेलो प्याले तुझे विषारी!!

थकलीस तू न केव्हा मज वीष पाजताना.....
येवू दिली न केव्हा मीही मला शिसारी!

नाही तुला म्हणालो दे ऎसपैस जागा;
पडवीतही मनाच्या टाकेन मी पथारी!

आकाश दंग झाले! धरणी चकीत झाली!
पंखांविनाच जेव्हा मी घेतली भरारी!!

आजन्म हिंडलो मी रानात जीवनाच्या....
केव्हा शिकार झालो, झालो कधी शिकारी!

दोघांमधे हिरीरी खेळात जिंकण्याची;
मीही जणू जुगारी, तूही जणू जुगारी!

चालून भाग्य आले होते घरी तुझ्याही....
तू मानलेस त्याला दारातला भिकारी!

छळतो तुझा दुरावा, केव्हा तुझा अबोला;
मज वाटते असे की, तलवार तू दुधारी!

आभास हा कुणाचा? चाहूल ही कुणाची?
हृदयात का अचानक उसळे अशी उभारी?

                 ...........प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
    फोन नंबर: ९८२२७८४९६१