लखलख चंदेरी

काल संध्याकाळी सहज म्हणून फिरायला बाहेर पडले. पलिकडच्याच रस्त्यावर एका माणसाने आकाशकंदिलाचं छोटांसं दुकान थाटलं होतं. दोन उंच झाडांना साधारण मध्यावर एक दोरी बांधून त्या दोरीला तऱ्हेतऱ्हेचे आकाशकंदील अडकवले होते. त्या प्रत्येक कंदिलात एकेक विजेचा दिवाही सोडला होता. वाऱ्यावर झिरमिळ्या थुईथुई नाचवत ते सगळे कंदील विविध रंगांच्या प्रकाशाची उधळण करत होते.ते दृश्यच मोठं मनोहारी होतं. मला तर असे अनेक आकाशकंदील एकत्र लावलेले पाहिले की दिवाळीचं एक वेगळंच मूर्त रूप पाहिल्याचा आनंद होतो. दिवस लहान होत जातात. हवाही कोरडी होते. पाऊस संपलेला असतो आणि शरदाचं चांदणं आसमंतावर शीतल वर्षाव करत असतं. रात्री, पहाटे कच्च्या बाळकैऱ्यांसारखी अर्धीमुर्धी थंडी पडायला लागते. आणि ध्यानीमनी नसताना एक दिवस रस्त्यावर असे आकाशकंदील विकणारी माणसे दिसायला लागतात. त्यांना पाहिल्यावर माझं मनही थुईथुई नाचून उठतं आणि माझी खात्री पटते की दिवाळी आली आहे!
असं म्हणतात, की आकाशकंदिलाचा जन्म जपानमधे झाला. त्याचं असं झालं, की एका धनिक जपानी शेतकऱ्याला दान मुलं होती. त्यांची लग्नं करून देऊन त्याने दोन सुंदरशा सुनाही घरी आणल्या होत्या. एकदा, कसल्याश्या सणाच्या निमित्ताने दोघी सुना माहेरी निघाल्या होत्या. तेव्हाच त्यांची परीक्षा घ्यावी असा विचार त्यांच्या सासूबाईंच्या मनात आला. त्यांनी एका सुनेला सांगितलं, परत येताना तू कागदात बांधून हवा आण. आणि दुसरीला सांगितलं, परत येताना तू माझ्यासाठी कागदात बांधून उजेड आण. कागदाच्या घड्या घालण्याचं शास्त्र् अर्थात ओरिगामीमधे दोघीही अगदी निपुण होत्या. त्यामुळे एकीने कागदाचा सुरेख पंखा करून आणला तर दुसरीने एक सुरेख आकाशकंदील आणला. त्या आकाशकंदिलात इवलीशी पणती ठेवली की त्यातून कागदाच्या रंगाचा सुरेख प्रकाश बाहेर पडत असे. आपल्या सुना केवळ शोभेच्या बाहुल्या नसून चांगला विचार करणाऱ्या हुशार मुली आहेत हे पाहून सासूबाई बेहद्द खूश झाल्या. तर असा झाला आकाशकंदिलाचा जन्म.
पूर्वी जेव्हा आत्तासारखा विजेच्या दिव्यांचा झगमगाट नव्हता तेव्हा घरापुढे लावलेला मंद प्रकाश फेकणारा हा आकाशदिवा किती साजिरा दिसत असेल याची कल्पनाच केलेली बरी. आणि आता तर काय प्लॅस्टिकचे , चांदण्यांचे, कापडाचे , हाताने केलेल्या कागदाचे असे अनेक प्रकारचे आकाशकंदील मिळतात. त्या बाबतीत ग्राहकाची अवस्था ’अनंतहस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने’ अशी न झाली तरच नवल!
आकाशकंदील घरी करायलाही खूप धमाल येते. माझा मामा कौशल्याने थर्माकोल कापून फुलपाखराचा सुंदर आकाशकंदील घरी तयार करतो. माझे आजोबा लहानपणी करायचे तो पैशाचा आकाशकंदील. या कंदिलातील विशिष्ट वायुवीजनामुळे तो म्हणे आपल्याभोवती गोल फिरायचा. मी चौथी पाचवीत असताना आजोबांनी माझ्यासाठी हौसेने बुरूड आळीत जाऊन बांबूच्या कामट्या आणल्या होत्या. मग त्या एकमेकींना बांधून त्यांनी षट्कोनी आकाशकंदिलाचा सांगाडा केला आणि मग त्यावर पतंगाचे आणि जिलेटिनचे कागद चिकटवल्यावर आणि चांगल्या लांबसडक झिरमिळ्यांच्या शेपट्या अडकवल्यानंतर तो फारच शोभिवंत दिसायला लागला. पुढे दोन तीन वर्षं हा उद्योग चालू राहिला. मग मात्र अभ्यासाचा वेळ जातो या सबबीखाली तो बंद पडला. पण माझी हौसच दांडगी. मी पतंगाचे कागद आणि कार्डबोर्डाच्या पट्ट्या यांच्या मदतीने करंज्यांचा आकाशकंदील करायला सुरुवात केली. त्यात वेळही कमी जायचा आणि कंदील चिकटण्याइतका वेळ नसेल तर सरळ स्टेपलरने पिना मारून वेळ मारून नेता यायची. हा करंज्यांचा कंदील मी अगदी परवापरवापर्यंत करत असे.
पण गेल्या काही वर्षांत घरातली वृद्ध माणसं दृष्ट लागल्यासारखी एकापाठोपाठ एक् देवाघरी गेली आणि माझा या सगळ्यातून जीवच उडाल्यासारखा झाला. ते कागदी खेळणं मनाला आता रिझवेना. शिवाय आकाशकंदील करायला घेतला की हौसेने तो करायला शिकवणाऱ्य आजोबांच्या आठवणीने डोळ्यात पाणी यायचं. जिने कधीच माझ्या कौतुकाखेरीज दुसरा शब्दही उच्चारला नाही त्या आजीच्या आठवणीने सगळं काही नको होऊन जायचं. आज मात्र ते दोरीवर लटकणारे प्रकाशमान गोल पाहून मला वाटलं, माझ्या मनात रुंजी घालणाऱ्या माझ्या आजी आजोबांच्या आठवणींनीच जणू काही माझ्याभोवती तेजस्वी फेर धरला आहे. आकाशात एकीकडे चंद्राचा देवानेच पेटवलेला कंदील आणि दुसरीकडे अशा सुमधुर आठवणी पाहिल्यावर माझं दुःख, उदासी कुठच्याकुठे पळून गेली आणि मी गुणगुणायला लागले ’लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती या!’
अदिती
अश्विन कृ ५, शके १९३४
४ नोव्हेंबर २०१२