रात्र जेव्हा बांधुनी येते स्मृतींची पैजणे.....

गझल
रात्र जेव्हा बांधुनी येते स्मृतींची पैजणे.....
दरवळू लागे पुन्हा श्वासात माझ्या चांदणे!

एकटा असुनी न तेव्हा एकटा मी राहतो!
सोबतीला राहती माझीतुझी संभाषणे!!

जाहली तिन्हिसांज, परतू लागल्या वाटा घरी....
चल निघू, आता इथे, नाही बरे घोटाळणे!

चेहऱ्यांनी हासऱ्या जेव्हा मला कवटाळले;
जाणले तेव्हाच मी संभावितांचे टाळणे!

ठेवुनी बाजूस थोडा वेळ त्यांचे वागणे;
पाहिले हेतू किती दिसतात त्यांचे देखणे!

कैद झालेल्या कळ्यांनी गंध वाऱ्यांना दिले....
जागच्या जागीच सारी कैद झाली कुंपणे!

भक्त काही मोजके दारात त्यांनी पाळले!
काम ज्यांचे फक्त होते वेळ पडता भुंकणे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर   
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१