जानेवारी २६ २०१३

वन्ही तो चेतवावा रे ...

॥ श्रीराम समर्थ॥
वन्हि तो चेतवावा रे.......... दुवा क्र. १
महाराष्ट्रदेशीं संताचा महान वारसा आहे. भागवत संप्रदाय, नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय अशा अनेक समॄद्ध परंपरा आहेत. सर्व प्रकारची आस्मानी आणि सुल्तानी संकटे पचवून या साऱ्या परंपरा महाराष्ट्रात आणि भारतवर्षात केवळ टिकूनच नव्हे तर दिवसेंदिवस वर्धिष्णु होत आहेत, हे महाराष्ट्राचे परम भाग्यच!
असाच एक प्रखर संप्रदाय - रामदासी संप्रदाय! १६ व्या शतकांत साडेतीनशे वर्षाची काळरात्र नष्ट करणाऱ्या शिवसुर्याचा उदय झाला आणि हिंदूपदपातशाही- मराठयांचे स्वराज्य निर्माण झाले. या स्वराज्य स्थापनेला आवश्यक ती सामाजिक मशागत आणि अध्यात्मिक आधिष्ठान रामदासी संप्रदायाने केले हे तर सर्वश्रुतच आहे. गावोगावचे मठ, महंत, शिष्य, बलोपासना, रामजन्मोत्सव, मारुती मंदिरे आणि सांप्रदायिक उपासनापद्धती याद्वारे समर्थ रामदास स्वामींनी सारा महाराष्ट्र ढवळून काढला आणि शिवबांच्या धर्म-संस्थापनेसाठी समाजमन तयार केले.
समर्थ रामदास स्वामींचा सारा कर्तृत्वकाळ तात्कालीन महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आणि अध्यात्मिक उन्नत्तीसाठीच होता. वयाच्या केवळ आठव्या वर्षी आपल्या आयुष्याची पूर्ण blue print बनवून तसे कार्य घड्वून आणणारे समर्थ रामदास स्वामी हे अवतारी पुरुष होते, प्रत्यक्ष रामरायाने त्याने अनुग्रहीत करुन श्री हनुमंतांच्या स्वाधीन केले होते. समर्थांनी केवळ तत्कालीन महाराष्ट्राला जागे केले असे नव्हे तर आपल्या अलौकिक प्रतिभेद्वारे भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ होईल असे अक्षर वाड्मय निर्माण करुन ठेवले. भारतव्यापी निस्पृह महंतांची संघटना आणि मठांचे जाळे निर्माण केले. आद्य शंकरांचार्यांच्यानंतर अशा प्रकारचे देशव्यापी संघटन उभे करणारे समर्थ रामदास एकमेवच होत.
श्री.समर्थांचे एकूण वाड्मय ३५००० ओव्यांचे आहे. त्यापैकी दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम हे तीन ग्रंथ समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हणून मानले जातात. मनाचे श्लोक म्हट्ले अथवा ऐकले नाहीत असा मराठी माणूस विरळा! त्यातील साधे सोपे आणि गेय विवेचन अनेकांना मार्गदर्शक ठरले आहे. विनोबांनी म्हणूनच मनाच्या श्लोकांना "मनोपनिषद"असे म्हंट्ले आहे. तसेच दासबोधाइतका अध्यात्माबरोबरच व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्व विकास आणि व्यवस्थापन कौशल्ये सांगणारा सुबोध आणि रसाळ ग्रंथ मराठी वाङ्-मयात खचितच असेल आणि आत्माराम ही तर साधकांसाठी पर्वणीच होय. तसेच करुणाष्ट्के , आरत्या, ११ भीमरुपी, सवाया, अभंग असे उदंड वाड्मय समर्थांनी आपल्याला दिले आहे.
हे सारे साहित्य अक्षर स्वरुपात समर्थ भक्तांना आणि अभ्यासकाना उपलब्ध असावे म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी चतु:जन्मशताब्दी समितीने २००८ साली श्री समर्थ रामदासांच्या चतु:जन्मशताब्दी निमित्त दुवा क्र. २ या संकेतस्थळाची निर्मिती केली.केवळ मराठी भाषेतीलच नव्हे तर अन्य देशी आणि विदेशी भाषेत ही समर्थ साहित्य अभ्यासकांसाठी उपलब्ध असावे म्हणून हे संकेत स्थळ सुरु केले आहे व उत्तरोत्तर या खजिन्यात भर पड्त आहे.
या संकेतस्थळाचे ४ विभागात वर्गीकरण असून पहिल्या विभागात समर्थांचे मराठी, संस्कृत, हिन्दी, कन्नड, गुजराथी, सिन्धी या भारतीय भाषांतील आणि जर्मन व इंग्रजी भाषांतील साहीत्य उपलब्ध आहेत. सार्थ दासबोध, मनोबोधाचे विवेचन आणि समग्र समर्थ साहित्य ही काही उल्लेखनीय पुस्तके!
दुसऱ्या विभागात श्राव्य माध्यमातील व्याखाने, प्रवचने, विवेचन, करुणाष्टके, समर्थकृत आरत्या, भीमरुपी स्त्रोत्रे, मनाचे श्लोक, हिंदी मनाचे श्लोक उपलब्ध आहेत. समर्थ शिष्य भगवान श्रीधर स्वामी, स्वामी वरदानंदभारती,आचार्य धर्मेंन्द्रजी, प्राचार्य शिवाजीराव भोसले, चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ.सुषमताई वाटवे, समर्थभक्त श्री.सुनीलजी चिंचोलकर, मुज्जफर हुसेन अशा अनेक मान्यवरांचे विवेचन आणि मार्गदर्शन आपल्याला येथून उतरवून (download) करुन घेता येईल.
तिसऱ्या विभागात वृत्त संकलन आणि प्रसंगविशेष वार्तांकन असा विषय असून सज्जनगड आणि अन्य ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाचे संकलन या विभागात केले आहे. तसेच दर महिन्याचे सज्जन गडावरुन प्रसिद्ध होणारे " रघुवीर समर्थ " हे मासिक ही या विभागात उपलब्द्ध आहे.
चौथा विभाग हा दासबोधाच्या पारायणाचा असून सांप्रदायिक पद्धतीने वाचन ध्वनी स्वरुपात उपलब्ध आहे. या audio files आपल्या संगणकावर अथवा सी डी वर उतरवून घेता येतील अशी व्यवस्था आहे, आपल्या उपलब्ध वेळेनुसार आपल्याला दासबोधाचे श्रवण करता येते.
या संकेत स्थळाला जोडून मनाच्या श्लोकांवरील ब्लोग दुवा क्र. ३ चालतो. दर आठवड्याला एक श्लोक आणि त्या श्लोकांवरील डो. सुषमाताई वाटवे यांचे श्राव्य निरुपण असे त्याचे स्वरुप आहे. या ब्लोगवर चर्चा तसेच त्या त्या श्लोकांवर निरुपण करण्याची सुविधा आहे.
याच बरोबर दासबोधाच्या अभ्यासासाठी दुवा क्र. ४ या संकेत स्थळाची निर्मिती केली आहे पत्राद्वारे आणि ई-मेलद्वारे दासबोधाचा शास्त्रोक्त अभ्यास करता येतो. आणि अनेकांनी त्याचा लाभ घेतला आहे.
श्री समर्थ कृपेने या संकेत स्थळाद्वारे हे सारे समर्थ साहित्य पुण्यातील समर्थ सेवक डॉ. राम साठये यांच्या विशेष प्रयत्नाने आणि सहकार्याने आपल्या साऱ्यासाठी उपलब्ध झाला आहे आणि आपल्या सर्वांच्या भरिव सहकार्याने आणि सक्रीय पाठिंब्याने हा उपक्रम आणि संकेतस्थळ उत्तरोत्तर वृद्धिंगत होणार आहे याविषयी तिळ्मात्र संदेह नाही.
या संकेत स्थळाविषयी आणि इ-मेलद्वारे दासबोध अभ्यासक्रमाविषयी अधिक माहीतीसाठी :
दुवा क्र. ५
दुवा क्र. ६
दुवा क्र. ७

Post to Feed
Typing help hide