मार्च १९ २०१३

कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा २०१३ - अंतिम फ़ेरी (वर्ष ४ थे)

३१/०३/२०१३ - सा. ५:३०
३१/०३/२०१३ - सा. ७:३०

ठिकाण/पत्ताः

स्काऊट ग्राऊंड सभागृह (वरील हॉल), सदाशिव पेठ, एस. पी. कॉलेजजवळ, पुणे ३०.

कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ४ थे वर्ष. याही वर्षी अनेक कवी/ कवयित्रींनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्पर्धेसाठी आलेल्या कवितांचे परीक्षण करून साधारण २० कवी निवडणार आहोत. या २० कवींचे काव्य सादरीकरण दिनांक ३१ मार्च २०१३ रोजी होणार आहे. त्यातून पहिले ५ कवी निवडले जातील.

कविता पाठविण्याच्या मुदतीच्या अगदी अखेरच्या दिवसापर्यंत कवींचे फोन येत होते. त्यामुळे आणखी मुदत द्यावी लागली. मात्र आता सर्व कविता आलेल्या आहेत. तसेच परीक्षणही लवकरच पूर्ण होईल.

कै. सुचेता अनंत जोशी म्हणजे माझी आई, अगदी लहानपणापासूनच कविता करायची. कोणतीही सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, इत्यादी गोष्ट कानावर पडली किंवा वाचनात आली तर ती त्यावर लगेचच सुंदर कविता करू शकत असे. माझ्या मते आईच्या एकूण कविता कमीतकमी २५० च्या पुढेच असतील. मात्र कवितेची वही वगैरे तिने फारशी जपून ठेवली नसल्याने माझ्या हातात काही मोजक्याच कविता आहेत. मात्र, तिच्या तोंडून अनेक वेळा काही कवितांचे उल्लेख मी ऐकलेले आहेत. कोणालाही चटकन मदत करण्यासाठी तयार होणारी आई, उत्कृष्ठ लेखनही करीत असे.

काही वर्षांपूर्वी संगीतातील सप्तसूर आणि सृष्टीतील त्यांचे जिवंत स्थान यावर तिने एक कार्यक्रमही लिहिला होता. जो पूर्वीच्या सह्याद्री वाहिनीच्या किलबिल या कार्यक्रमात दाखविण्यात आला. आई चांगले नृत्यही बसवू शकत असे. कारण कै. वडगावकर आणि कै. कृष्णदेव मुळगुंद यांच्याकडून ती ते शिकलेली होती. त्यामुळे या कार्यक्रमात लेखन संहितेबरोबरच नृत्येही आईने बसविली होती, त्याचबरोबर कवितांना चालीही लावल्या होत्या.

लहानपणी माझ्याकडून तर ती नेहमीच काही सादर करून घेत असे. आमच्या शाळेच्या प्रत्येक वार्षिक स्नेहसंमेलनात तर आईने दिलेली कविता आणि माझे सादरीकरण हे ठरलेलेच होते. त्यामुळे नकळतच माझ्यावर कवितेचे संस्कार होत गेले.

एक प्रसंग मला आठवतो आहे की, २००४ साली पुण्याबाहेर एका मोठ्या कार्यक्रमात मला एकदा सूत्रसंचालन करायचे होते. पहाटे ५ - ५ः३० ला मी निघणे अपेक्षित होते. कार्यक्रमाच्या स्वरूपाबद्दल मी आईशी रात्री ११ वाजता बोललो आणि झोपलो. सकाळी मी आवरून ५ वाजता तयार होतो. त्यावेळी आईने माझ्या हातात एक कागद ठेवला. त्या कागदावर तिने माझ्या सूत्रसंचालनासाठी काही कविताच तयार करून ठवल्या होत्या. मला समजले की माझ्यासाठी जवळपास रात्रभर तिने विचार केला असणार आणि या कविता लिहिल्या असणार. खरेतर, त्यावेळी ती कॅन्सरने आजारी होती. आणि फार बरी नव्हती. तिच्या बोन्समध्येही कॅन्सरने शिरकाव केला होता. मात्र, तिच्या मनाला तो स्पर्श करू शकला नाही. तशा अवस्थेतही आईने माझ्यासाठी कविता केल्या. या गोष्टीमुळे मी असे ठरविले की सूत्रसंचालन कवितेतूनच करायचे. आणि त्यासाठी विचार करू लागलो. आईच्या आशिर्वादाचे पाठबळ होतेच. त्यामुळे अखंड तीन तास कार्यक्रमाचे सूत्र संचालन कवितांमधूनच करू शकलो. कविता अर्थातच माझ्या आणि आईच्या होत्या. स्वागता पासून आभारापर्यंत सर्व काव्यमय. हा कार्यक्रम झाल्यानंतर १५ दिवसांनी आईची प्राणज्योत मालविली.

अशा माझ्या आईसाठी मी काय करू शकतो असा विचार करताना काव्यस्पर्धेची संकल्पना सुचली. आणि ती पुढे चालू आहे. या काव्यस्पर्धेतून मी आईला वंदन करतो आणि त्यात सर्वांना सहभागी करून घेतो. प्रत्येकाने आपल्या आईला स्मरावे हाच संदेश पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे जी काव्यस्पर्धा. आतापर्यंत अनेक कवींनी यात सहभाग घेतला, यापुढेही घेतील त्या सर्वांना धन्यवाद..!

Post to Feedउपक्रम
कै. सुचेता अनंत जोशी
कै. सुचेता अनंत जोशी

Typing help hide