साधना

एक सोपी, केव्हाही करता येणारी आणि ज्याम इफेक्टीव साधना तुमच्याशी शेअर करतोय.

केव्हाही, कुठेही मांडी घालून आणि पाठ कुशनला टेकवून शांत बसा. उजव्या हातानं उजवं पाऊल आणि डाव्यानं डावं पाऊल सहजपणे धरा. यामुळे तुमचं शरीर स्क्वेअर होईल. स्व्केअरचा अर्थ उजवा गुडघा उजव्या खांद्यासमोर, डावा गुडघा डाव्या खांद्यासमोर असे चारंही पॉइंट्स मिळून एक चौकोन तयार होईल. आता फक्त डोळे मिटा आणि शांत राहा. इतर काहीही करायची गरज नाही.

एका क्षणी अचानक तुम्हाला शरीर बसलंय हे जाणवू लागेल. याचा अर्थ तुमची जाणीव शरीरापासून वेगळी झाली. याला हॉवरिंग द बॉडी म्हटलंय. योगासनात कोणतंही आसन व्यवस्थित जमलं की जे शांत वाटतं ते याच मुळे. जाणीव शरीरापासून वेगळी झालेली असते. या अवस्थेचा आनंद घ्या, त्या अवस्थेत स्थिर राहा.

या अवस्थेचं इंटरप्रिटेशन करण्याचा किंवा तिच्या बाबतीत तुम्ही वाचलेला कोणताही आध्यात्मिक प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. ही निराकार जाणिवेची सहजावस्था आहे आणि शरीराची हालचाल थांबल्यामुळे तुम्हाला ‘आपण देहापेक्षा वेगळे आहोत’ या वस्तुस्थितीचा उलगडा होतोय इतकंच.

 या 'संपूर्ण शरीराच्या बोधात' तुम्ही काही काळ स्थिर राहिलात तर दुसरी एक मजेशीर गोष्ट आपोआप होईल; तुम्हाला आजूबाजूला चाललेलं स्पष्ट ऐकू यायला लागेल. हे मनाची बडबड थांबल्याचं लक्षण आहे. तुमची जाणीव आता  मनापासून वेगळी झालीये.

मनाला एकच गोष्ट करता येत नाही, ती म्हणजे ऐकणं. आपण मात्र दोन्ही गोष्टी करू शकतो, मनामार्फत बोलणं आणि कानांनी ऐकणं. मन फक्त बोलू शकतं ऐकू शकत नाही.

आता तुम्ही शरीर आणि मन दोन्हीपासनं वेगळे झालात, निराकार जाणीव झालात. ही जाणिवेची सर्वात प्रार्थमिक स्थिती आहे (द मोस्ट ऑर्डिनरी स्टेट ऑफ काँन्शसनेस). याला समाधी वगैरे भारी नावं अध्यात्मात दिली असली तरी मुळात समाधी म्हणजे हीच अवस्था.

आता रोजच्या जीवनात तुम्हाला ही अवस्था वापरायची आहे.

केव्हाही वेळ मिळेल तेव्हा, असाल त्या अवस्थेत एकदाच डोळे मिटा आणि संपूर्ण शरीराचा वेध घ्या. ते जमलं की जाणीवपूर्वक आजूबाजूला काय चाललंय ते ऐका, तुम्हाला एकदम शांत वाटायला लागेल.  हे जमलं की सावकाश डोळे उघडा. आपण शरीरात नसून शरीराच्या अवतीभवती आहोत हे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला समोरचं स्वच्छ दिसायला लागेल. मनाचा प्रोजेक्टर काही काळ थांबल्याचं ते लक्षण आहे. आणि त्या स्थितीत तुम्ही काही काळ राहिलात तर....

'आपण प्रसंगात नसून प्रसंग आपल्यात घडतोय' असा रिवर्सल तुम्ही अनुभवाल.... यू आर थ्रू!

ट्राय!