चित्रपट परीक्षण :: "मेरे डॅड कि मारुती"

रेडीओ वन कडून फुकट मिळालेल्या पासेसचा वापरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने 'आत्मा' आणि 'मेरे डॅड की मारुती' ह्या दोन्ही चित्रपटांपैकी एक पहायचा नक्की केले होते !

आत्मा मधील भूत खुपच रटाळ आहे असे तिकिट काउंटरवरच्या मुलाने सांगून मला ते तिकिट घेण्यापासून वाचवले, मग अस्मादिकांनी BLIND FOLDED म्हणतात तसा - मेरे डॅड की मारुती ह्या नवोदित कलाकारांच्या अभिनयावर बेतलेल्या चित्रपटावर सट्टा लावला.... ! ( म्हणजे तिकिट घेतले)

टिव्ही वर 'बडे अच्छे लगते है' फेम राम कपूर आणि त्याच्या वात्रट पोराचे ट्रेलर्स पाहून थोडी कल्पना आली होती, परंतु प्रत्यक्षात चित्रपट पाहिल्यावर मात्र 'आत्मा' च्या ऐवजी हा चित्रपट निवडल्याबद्दल माझे मलाच बरे वाटले,

राम कपुर उर्फ 'तेज' हा एक व्यावसायिक आपल्या पोरावर कायम उखडून असतो, आपली सगळी पुण्याई पोरगं कॉलेजमध्ये टाईमपास करून उधळणार असे त्याला वाटत असते, मारूती ८०० पासून सुरुवात करून , मग स्विफ्ट घेऊन मारुतीच्या प्रेमात पडलेला राम कपूर स्वतःच्या मुलीला लग्नात नवीन मारुती इर्टिगा गाडी गिफ्ट देण्याचे ठरवून ४-५ दिवस आधी गाडी घरी आणतो - घरात लग्नाची तयारी चालूच असते - त्याचा पोरगा समीर हा कॉलेजमधल्या अत्यंत हॉट अश्या जॅझलीन नावाच्या पोरीला इंप्रेस करण्यासाठी ती नवीन आलेली गाडी कशीबशी बाहेर काढून पार्टीला जातो, तिथे एक गाणे गाउन हिरॉइनला परत घरी सोडून पुन्हा पब मध्ये पिण्यासाठी जातो, तिथे निम्म्या टाईट अवस्थेत वॅले च्या ऐवजी एका दुसऱ्यालाच गाडीची किल्ली देतो ! तो मनुष्य अगदी लॉलिपॉप सारखी हातात आलेल्या गाडीतून तिथल्याच पब बाहेर फिरणाऱ्या एका पोरीला ड्राइव्ह वर फिरवण्यासाठी जातो परंतु मध्येच पोलिस दिसल्याने तो गाडीतून पलायन करतो.. गाडी तशीच सोडुन, पोलिसही पोरीला स्टेशनवर नेतो परंतु ती गाडी हलवून नेण्याची तसदी घेत नाही !

इकडे समीर पब मधून बाहेर आल्यावर गाडी नाही पाहून शॉक होतो, तिथे थोडी बाचाबाची होउन कसाबसा गाडी शोधायला बाहेर पडतो, मग गाडी हरवल्यामुळे आणि 'बा' ची भीती बाळगून थोडी बनवाबनवी करतो - म्हणजे सेम टु सेम चोरीची गाडी विकत घेण्याचा प्रयत्न, शो-रुम मध्ये जाउन टेस्ट ड्राईव्ह ची गाडी तासभर आपल्या घरी लावणे, त्याच मॉडेलची गाडी भाड्याने घेणे वगैरे... त्यामध्ये कशी मजा होते, कोण कोण कॅरेक्टरस समोर येतात, समीर कसा अडचणीत सापडतो, त्याची ती हॉट मैत्रीण आणि जिवलग मित्र त्याची मदत कशी करते, आणि ह्या गाडी च्या प्रॉब्लेम पायी पोलिस, लग्नमंडप, बाप-पोरगा, जिजु-साला, बहीण-भाऊ, प्रेमीका-प्रेमी, मित्र-बित्र ह्या सगळ्या नात्यांचा आढावा घेत गोड शेवट करत चित्रपट संपतो.

संपुर्ण चित्रपटात त्याचा खास मित्र म्हणून वावरणारा गट्टू चांगलाच लक्षात राहतो ! रवी-किशनचा छोटासा रोल चांगला आहे ! राम कपूर कॉमेडी रोलमध्ये छान वावरला आहे, त्याचे आणि समीरचे चुरचुरीत संवाद आणि खास पंजाबी टच आपल्याला हसवतो, संपुर्ण चित्रपटात थोड्या थोड्या कालावधीनंतर 'पंजाबीयाँदी बॅटरी चार्जड रेहती है' ह्या गाण्याचा बॅकग्राउंड व्हॉइस चित्रपटाचा वेग कायम ठेवण्यात मदत करतो. 'हॉट इज हॅपनिंग', किंवा "दिखता है वोह बिकता है" ह्या उक्तीला स्मरून नायिकेने पेहरावाच्या बाबतीत दिपिका पदुकोण शी संपुर्ण स्पर्धा नव्हे तर तिला ऑलमोस्ट मागे टाकले आहे.

अर्थात 'आत्म्या'शी एकरुप न होता 'मेरे डॅड की मारुती' शी समरस होऊन मी २ तासांचा विरंगुळा पदरी पाडून घेतला - सहज जमल्यास पहा आग्रह नाही, पाहिला नाही तरी चालेल (मी देखिल फुकट पासावरच पाहिलाय)!

--

आशुतोष दीक्षित.