सापडला म्हणून -- !

  " आजोबा तुमचा फोन" माझ्या नातीने फोन माझ्या हातात देत म्हटले. सध्या आमच्या  घरातील फोन हा आमचा नावापुरताच असतो बहुतांश तो तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी,त्यांच्या शाळेत होणाऱ्या कार्यक्रमांविषयी किंवा एकमेकीच्या डिफिकल्टीज सोडवण्यासाठी असून त्यांच्या कानाशी  तो नसला तरच आम्हाला हाताळायला मिळतो त्यामुळे तिचा फोन बंद असताना आलेलाही फोन तिचाच असणार म्हणून आम्ही पहिला अग्रक्रम तिलाच देतो आणि तिचा नसलाच तर ती नाइलाजाने तो आमच्या ताब्यात देते.तसेच त्यावेळी झाले. आणि मी फोन कानाला लावला व  " काय आहेत का श्यामराव ?" हे उद्गार ऐकल्यावर ही व्यक्ती कोण असावी याविषयी  तर्क करू लागलो. त्या व्यक्तीच्या आवाजावरून ती कोण आहे हे मी ओळखावे अशी तिची अपेक्षा असणार हे उघड होते अश्या वेळी माझी पंचाईत होते.थोडा वेळ बोलल्यावर कधी कधी लहानपणी "संदर्भासह स्पष्टीकरण करा " अश्या प्रश्नासाठी लागणारी बुद्धिमत्ता वापरून मी त्या व्यक्तीचे नाव ओळखू शकतो व मग आमचा संभाषणप्रवाह सुरळीत चालू लागतो. 
      पण आता फारसा विचार  करावा न लागता हा सान्यांचाच फोन हे मी ओळखले कारण परवाच  ज्येष्ठ नागरिक संघात त्यांची गाठ पडली होती..त्यांच्या व माझ्याही एका मित्राच्या सुनेचा  नाट्यगीत गायनाचा कार्यक्रम त्या ज्येष्ठ नागरिक संघात त्यांच्या सूचनेवरून ठेवण्यात आला होता.अश्या कार्यक्रमात साथीदार ( आणि वाद्ये)ही आपलीच घेऊन जावे लागते. तबल्याची साथ तिचा नवराच करणार होता.पण हार्मोनियमच्या साथीचा प्रश्न होता.तिने मला विनंती केली व अडल्या नडल्याची गरज भागवण्यास नकार देणे मला जमत नसल्यामुळे मी तिला होकार दिला.  या सर्व कार्यक्रमाची योजना सान्यांची.पण कार्यवाही ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यवाहांची होती व त्या गृहस्थांना या कार्यक्रमातील कलाकार म्हणजे फक्त आमच्या मित्राची मुलगी असे वाटले की काय कोण जाणे.निदान मंचावर उपस्थित आमचे आणखी एक गायक मित्र व आम्ही साथीदार एवढे लोक आपल्याच विनंतीला मान देऊन आले आहेत हे कळण्याइतपत समजही त्यांना नव्हती असे दिसले. कार्यक्रम झाल्यावर कलाकारांचा सत्कार करण्याच्या वेळी फक्त गायिकेचाच काय तो पुष्पगुच्छ व बंद पाकीट देऊन त्यांनी सत्कार केला इतरांना पुष्पगुच्छ देण्याचेही सौजन्य दाखवले नाही ही गोष्ट सर्वच उपस्थितांना खटकली. सान्यांना तर ती गोष्ट लागणे स्वाभाविकच होते.
     पण तरीही आज परत फोन करून आपली नाराजी ते व्यक्त करतील अशी अपेक्षा नव्हती.  कालच त्यानी आपल्या मनातील ही खंत बोलून दाखवली  होती." हा सगळा प्रकार मला फारच लागला .सचिव व अध्यक्षांशी मी बोललो व आता मी ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासदत्वही सोडणार आहे." असे उद्गार त्यानी काढले त्यावर मी " जाऊ द्याहो एवढे मनाला लावून घेण्याचे कारण नाही.अगोदर मी काही अपेक्षेने आलोच नव्हतो.मित्राच्या मुलीची अडचण सोडवायची एवढाच उद्देश होता.कदाचित त्यांचा पुष्पगुच्छाचा अंदाज चुकला असावा व त्यांच्याकडे उरले नसतील" असे त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.
     आणि आज  पुन्हा सान्यांचाच फोन आला पुन्हा त्यानी कालच्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला व मी त्याना धीर दिला पण त्यानंतर एकदम त्यानी  सुर बदलून वेगळा प्रश्न केला,
"अहो तुम्हाला कोणी तबला शिकवणारा माहीत आहे का ?"असा प्रश्न केला अचानक हा प्रश्न कसा उद्भवला याचे मला नवल वाटले.
"का तुमच्या नातवाला शिकावयाचा आहे का?" सान्यांचा नातू दहा बारा वर्षाचा असल्यामुळे बहुधा त्यालाच शिकायचे असेल असा माझा अंदाज होता
"नाही मलाच शिकायचे आहे"सान्यांच्या स्वरात जरा ओशाळल्याची भावना दिसत होती. आता या वयात हा उपद्व्याप याना का सुचला असे मला वाटेल असा त्यांचा समज असावा.होता.तसा मी आश्चर्याने थक्क झालोच कारण आता त्यांचे वय पंचाहत्तर वर्षाचे होते.त्याहून महत्त्वाची गोष्ट ज्येष्ठ नागरिक संघाचा तो कार्यक्रम सोडता आतापर्यंत संगीताच्या कुठल्याच अंगाविषयी त्यानी फारशी उत्सुकता दाखवल्याचे मला आठवत नव्हते.अर्थात हा वयाचा व रस दाखवण्याचा मी लावलेला निकष कदाचित चुकीचा असेल व सान्यांनाही संगीतात रस असू शकेल असा मनाशी मी  विचार करत असतानाच सानेच पुढे म्हणाले "अहो आज सकाळी माळा साफ करताना एकदम तेथे तबल्या डग्याची जोडी सापडली.फार वर्षापूर्वी मी शिकत होतो.मध्यंतरी आमच्या जावयांनी नेली होती आणि ती परत आणून देऊनही बरीच वर्षे गेली तेव्हांपासून ती माळ्यावर पडून होती.ती काल सापडली तेव्हा म्हटले उगीच कशाला तशीच पडू द्यायची म्हणून म्हटल आपणच पुन्हा एकदा शिकायला सुरवात करावी"
  "वा वा उत्तम !"मी त्यांना शाबासकी देत म्हणालो."या वयात तुमचा उत्साह मात्र कौतुकास्पद आहे."
"तस काही नाही" जरा लाजतच ते म्हणाले,"अनायासे सापडला आहे तर म्हटले---- "
या वयात या माणसाचा शिकण्यातील उत्साह पाहून हे ऐकून मला खूपच आनंद झाला.तशी तबला हीच खरी माझी मुख्य आवड आहे.इतर वाद्ये कामापुरती मी हाताळतो त्यामुळे मी लगेचच"अहो मग त्याला दुसऱ्या कोणाची काय आवश्यकता आहे,मीच शिकवीन की तुम्हाला" असे  म्हणताच सान्यांना खूप आश्चर्य वाटले असे दिसले कारण लगेचच त्यानी आश्चर्य व्यक्त केले.व ते म्हणाले,
 "अरे वा तुम्ही तबला पण वाजवता वाटत?काल तुम्ही हार्मोनियम वाजवत होता म्हणून  मला  वाटले की कोणी तबलावादक तुमच्या माहितीतला असेल."
"हो खर तर मी तबलाच वाजवतो,त्या दिवशी हार्मोनियमला कोणी मिळाला नाही आणि मित्राचीच सून होती म्हणून मी साथ केली. तेव्हां काहीच काळजी करू नका" आणि पुढे हसत हसत  "मी तबला शिकवेनच आणि काही फी पण घेणार नाही" असेही सांगून टाकले.
"मग बरेच झाले,"सान्यांच्या स्वरात एकदम मोकळेपणा आला.आणि पुढे तेच म्हणाले,
  " मग तुम्हाला कोणता टाइम सोयिस्कर आहे ?" त्यानी विचारलं.अशा बाबतीत मला एकूण व्यवहारज्ञान कमीच.त्यामुळे आपली डायरी बघून सांगतो वगैरे म्हणण्याचे कधीच मला सुचत नाही त्यामुळे मी नेहमीच्या बेपर्वाईने म्हणालो,
 "केव्हांही या की,आता काय आपण सेवानिवृत्त माणस त्यामुळे केव्हांही मोकळेच की"
" तसे नाही पण तुमच्या वेळेचा खोळंबा व्हायला नको" इति साने.
"मग सोमवारी येता संध्याकाळी ?"मी म्हणालो आणि तेही माझ्यासारखेच मोकळे असल्याने होकार देतील अशी माझी कल्पना पण ती त्यानी फोल ठरवली.
"सोमवारी नको कारण त्यादिवशी आमचा ब्रिज खेळण्याचा वार असतो."
" मग बुधवारी या " मी उगीचच एकदिवसाचा गॅप घेऊन आपणही अगदीच मोकळे नाही असे दाखवण्याचा प्रयत्न केला.
" तो आमचा दासबोधाचा दिवस असतो.आमचे दासबोधमंडळ त्यादिवशी आनंदनगर गणेश मंदिरात जमते.तुम्ही पण या की एक दिवस " सान्यांनी मलाच त्यांच्या मंडळात ओढण्याचा प्रयत्न केला.पण प्रश्न माझ्या दासबोधमंडळात जाण्याचा नसून त्यांचा माझ्याकडे तबला शिकायला येण्याचा आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत शेवटी मी म्हणालो ,"मग तुम्हीच सांगा तुम्हाला केव्हां शक्य आहे ते "म्हणजे तबला शिकण्याच्या त्यांच्या जरुरीपेक्षा तबला शिकवण्याची निकड आता मलाच असल्याचा भास निर्माण झाला.
" असं करूया मग.मंगळवारी संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास मी येत जाईन,चालेलना ?"सान्यांनी आपली वेळ जाहीर केली.अर्थात असा सत्शिष्य लाभणार असल्यामुळे शिवाय मला खरोखरच काही अडचण नसल्यामुळे मी होकार दिला.नाहीतरी हा आमच्या दोघामधीलच मामला असल्यामुळे ते फोन करूनच येणार होते आणि माझी काही अडचण असेलच तर मी त्याना तसे सांगू शकत होतो.
"ठीक आहे तर मग.आमचे घर तुम्हाला माहीतच आहे.या फोन करून."खरे तर त्यांची पत्नी साधना माझ्या बहिणीची वर्गमैत्रिणच होती,त्यामुळे मी पुढे,
" साधनालाही घेऊन आलात तरी चालेल.ती बसेल गप्पा मारत माझ्या बायकोबरोबर आणि आपले तबला शिक्षण होईल." म्हणून त्याना निरोप दिला.
   मध्ये तीन चार दिवस गेले आणि मंगळवारी पाचच्या ठोक्याला फोन वाजला.नेहमीप्रमाणेच मी सानेअध्याय विसरून गेलो होतो,यावेळी नात घरात नसल्याने  कोणाचा बुवा फोन असे पुटपुटत मी फोन घेण्यापूर्वीच आमच्या दक्ष शत्रुपक्षाने नेहमीप्रमाणेच त्यावर कब्जा केला होता व मला फोन न देता " साने येताहेत"  असा निरोप देऊन पुढच्या तयारीला ती आत गेली साने कशासाठी येत आहेत हे तिला माहीत असल्यामुळे त्यांच्या आगमनाची तयारी करण्याचे काम तिने स्वत:वरच घेतले कारण सान्यांना जरी माळ्यावर अडगळ काढताना अगदी विनासायास तबला सापडला असला तरी आमचा तबला मात्र तिने मोठ्या बंदोबस्तात ठेवलेला असतो.त्याचे एक कारण म्हणजे  आमच्या सदनिकेत जागेचा अभाव असल्यामुळे त्याच्यावरील आवरणासकट तो एका मोठ्या उभ्या कोठीत ठेवून त्यावर शिलाईचे हातमशीन स्थानापन्न करण्यात आले होते,अशा कडेकोट बंदोबस्तातून तबला काढण्याचे काम मी केल्यास होणारा गोंधळ निस्तरणे हे तिच्या कोष्टकात बसत नसते.शिवाय कोणत्या क्रमाने कोठीवरील व आतील वस्तु काढून त्या कोठे ठेवायच्या  याबाबतीत तिची तंत्रे सांभाळणे हे माझ्या आवाक्याबाहेरचे काम असल्यामुळे तिने तबला काढून बैठक मांडून त्यावर तो सुस्थापित करेपर्यंत सान्यांची वाट पहाण्याचे कामच केलेले बरे म्हणून मी स्वस्थ राहिलो.
         सान्यांचे घर तसे आमच्या सदनिकेपासून फार दूर नसल्याने ते चालतच येणार व फारफार तर अर्ध्या तासात येणार हा माझा अंदाज होता,पण तो खोटा ठरवत ते पाउण तास झाला एक तास झाला  झाला तरी आले नाहीत.यापूर्वी ते बयाच वेळा आमच्याकडे येऊन गेले होते त्यामुळे चुकण्याचा काही संभव नव्हता पण सौ.ला काय शंका आली कुणास ठाउक म्हणून ती बाल्कनीत जाऊन उभी राहिली आणि तिने त्याना आमच्या इमारतीच्या आणखी दोन इमारती ओलांडून पलीकडे असलेल्या इमारतीत शिरताना पाहिले.अर्थातच ते आमच्याकडे येत असल्यामुळे त्या इमारतीत त्यांना थारा मिळणार नाही व ते तेथून बाहेर पडणार हा तिचा तर्क (जो चुकणे शक्यच नसते)खरा ठरून ते बाहेर पडून आमच्या बिल्डिंगपुढे आल्यावर त्यांचे लक्ष वेधून घेऊन तिने त्याना बरोबर दिग्दर्शन करून घरात आणले.
   या सर्व प्रकारात साने खूपच खजील झाले होते." अहो तुमची बिल्डिंग पुढे आहे म्हणून पुढेच गेलो" असे म्हणून त्यानी आपली चूक कबूल केली."पण तुम्ही यापूर्वी बऱ्याच वेळा येऊन गेलात ते अगदी बरोबर आला होतात."मी त्याना धीर देत म्हणालो."त्याचे काय आहे त्यावेळी ही बरोबर होती ना" ही गोष्ट मात्र खरी आतापर्यंत ते एकटे कधी आले नव्हते,आणि साधना बरोबर नसल्यावर त्यांचीही अवस्था शीड तुटलेल्या नावेसारखी होते ही गोष्ट खरे पहाता स्वानुभवाने माझ्या ध्यानात यायला हवी होती.या गोष्टीचा अधिक खल करून त्यांना अधिक शरमिंदा करण्याची मला इच्छा नव्हती म्हणून मी त्याना तबला स्थानापन्न केलेल्या बैठकीकडे नेले.
  " वा छान तबला आहे तुमचा," त्या त्यांच्या माळ्यावरून काढलेल्या तबल्याच्या मानाने नवा कोराच असणारा तबला पाहून ते उद्गारले."आमचा माळ्यावर सापडला.पण अजून चांगल्या परिस्थितीत आहे म्हणून म्हटले त्याचा उपयोग व्हावा अनायासे तुम्हालाच तबला येतो हे कळले हे तर फारच छान झाले." तबला ही वस्तू घरात आहे म्हणून ती उपयोगात आणण्यासाठी तबला शिकण्याचा त्यांचा संकल्प हा त्यांचा विचार कौतुकास्पद होता.नाल सापडला म्हणून घोडा घेणाऱ्या माणसाने आता घोडाच सापडल्यावर घोड्यावर बसायला शिकावे तसेच हे झाले असे माझ्या मनात आले तरी तो विचार त्यांच्यापुढे मांडून त्याना खजील करण्याचे मी टाळले.
   सुरवात करायला सोपे जावे म्हणून मी त्यांच्यापुढे तबला ठेवून तुम्ही काय शिकला ते जरा वाजवा असे त्याना सांगितल्यावर त्यानी तीन ताल व दादरा असे दोन ताल वाजवून दाखवले.तसे वाजवण्यात सफाई नसली तरी ते ताल ते बऱ्यापैकी वाजवत होते.तरीही आता व्यवस्थितच शिकायचे असा निर्धार व्यक्त करून त्यानी आपल्या पिशवीतून वही पेन्सिल काढून तालाचे बोल उतरून घ्यायला  सुरवात केली.सर्व साधारणपणे जे ताल वाजवले जातात त्यांचे बोल मी त्याना उतरून दिले.ते उतरून घेऊन त्यातील काही वाजवण्याचा त्यानी प्रयत्न केला.
    त्यांच्या वादनाचा थाट संगीत दिग्दर्शकांच्या वाद्यमेळ्यातील वादकांसारखा होता म्हणजे वादकांसमोर स्वरलिपी कागदावर लिहिलेली असते त्यानुसार ते वाजवत असतात त्त्याचप्रमाणे साने वही मांडीवर  ठेवून त्यातील बोल पहात वाजवण्याचा प्रयत्न करत होते.त्याना थांबचून बोल पाठ करून व हातावर टाळी वाजवत ताल कसे म्हणायचे याचे प्रात्यक्षिक मी दाखवले बोल पाठच व्हायला पाहिजेत असे सांगितले.त्याचबरोबर तबला वाजवताना लयीसाठी मेट्रोनोम जवळ ठेवून सराव करायचा सल्ला दिला.इतके सगळे ऐकून
"कोणातरी जाणकाराचे मार्गदर्शन आवश्यकच आहे आणि आता ते तुमच्याकडे मिळेल त्यामुळे आता काही काळजी नाही" असे उद्गार काढीत "आता पुरे झाले" असाही निर्णय त्यानीच घेतला व त्यानंतर चहापानाची तयारी सौ.ने ठेवली होती."खरे तर याची आवश्यकता नाही मी प्रत्येक आठवड्यात येणारच "असे उद्गार काढले
     पुढील आठवड्यात मीच सान्यांच्या घरी गेलो.अर्थात अगोदर फोन करूनच.
"बर झाल तुम्हीच आलात,आमचा तबला कसा आहे तेही कळेल"सान्यांनी हसतमुखाने माझे स्वागत करीत म्हटले.तबल्याकडे लक्ष गेल्यावर तो  माळ्यावरून काढून ठेवणे एवढाच उपचार सान्यांनी पाळलेला दिसला.सौ.सान्यांना त्यांच्या तबलावादनाशी काही देणे घेणे नसल्यामुळे त्यांचा हात त्यावरून फिरवलेला नव्हता आणि सान्यांची अशा बाबतीत सगळी भिस्त आपल्या सौभाग्यवतीवर असल्यामुळे तबल्याला हात लावताच धुळीचा थर माझ्या हातावर चढला.तो अनेक वर्षे माळ्यावर ठेवलेला असल्याने त्यातून आवाज निघत नव्हता त्यासाठी त्याचे गट्ठे ठोकणे आवश्यक होते.पण तबल्याबरोबर हातोडी काही माळ्यावर सापडली नाही त्यामुळे तात्पुरता त्यांच्या इंजिनियर मुलाच्या वर्कशॉपमधील भला मोठा हातोडा "तात्पुरते याच्यावर काम भागवायचे का?"असे संकोचाने विचारत त्यानी माझ्या हातात दिला.
        माझी परिस्थिती सौ.साने यानी पाहिली व त्या एक नापसंतीचा कटाक्ष टाकत म्हणाल्या,"अहो त्या तबल्यावर किती धूळ आहे पाहिलीत का?" आणि तबला डग्गा माझ्याकडून घेऊन एका मोठ्या फडक्याने स्वच्छ पुसून त्यानी ते माझ्या स्वाधीन केले.
    मोठ्या हातोड्याने तबल्याच्या गट्ट्या ठोकताना माझी बोटे चेपणार नाहीत याची दक्षता मला घ्यावी लागत होती.शिवाय सौ.साने यानी पुसून दिला असला तरी गट्ठे ठोकल्यावर त्यामागे बसलेली धूळ माझ्या नाकात जातच होती अर्थात ती सहन करणे मला भाग होतेच,कारण त्याशिवाय तबल्यातून आवाज निघणे शक्य नव्हते व ते ठोकण्याचे काम सान्यांच्यावर सोपवले असते तर तबला म्हणजेच साने यांना तबला शिकण्यासाठी असलेले एकमेव कारणच नष्ट झाले असते.गट्ठे ठोकताना तबल्याची वादी पण एका ठिकाणी तुटलेली आहे असे मला आढळून आले व त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे असे मी सुचविले.त्यावर सान्यांनी तत्परतेने हे काम कोठे होईल ही विचारणा केली.
    तोपर्यंत मला माहीत असलेल्या संगीत वाद्यांच्या विक्री व दुरुस्ती केंद्राचा पत्ता मी त्याना दिला व मेट्रोनोमही तेथेच मिळेल असे सांगून त्याना त्यानी मेट्रोनोम अजून आणला नाही याचे स्मरण करून दिले.त्यांचा मुलगा संगणकावर काम करत असल्याने व कारमधून फिरत असल्यामुळे मेट्रोनोम त्याला माहीत असेल व त्याच्या गाडीतून तबला नेऊन दुरुस्ती करता येईल असेही सुचवले.
    तबल्यातून ऐकू येण्याइतपत आवाज येऊ लागल्यावर मी त्यात अधिक नादमधुरता आणण्याचा प्रयास सोडून आहे त्या परिस्थितीतच त्याचेवर रियाज करण्यास मी त्याना सांगितले.अर्थात त्यांच्या वाजवण्यात त्यामुळे फारसा फरक पडला नसता.माझा मुलगा त्याच्या लहानपणी तबला शिकायला जात असताना प्रथम रियाज करण्यासाठी त्याला लाकडी तोंडाच्या तबल्यावरच रियाज करायला सांगितला होता असे त्याने मला सांगितले होते त्यामानाने या तबल्याचा आवाज बराच मंजूळ होता असे म्हणावे लागेल.अर्थात त्या प्रकारच्या रियाजाचा उद्देश प्रत्यक्ष तबल्यावरील बोल अधिक स्पष्ट उमटावे हा होता.तशी शक्यता व आवश्यकता दोन्हीही सान्यांच्या बाबतीत मला दिसली नाही.कारण बोल पाठ करण्यास त्याना त्यांच्या बहुविध कार्यक्रमाच्या दिनचर्येतून वेळ मिळाला नसल्यामुळे आजही त्यानी वही समोर ठेवून त्यातील बोल तबल्यावर काढण्याचा प्रयत्न केला.
     त्याना टाळी वाजवून बोल माझ्यासमोरच म्हणण्यास सांगितल्यावर त्यांचे बोल व टाळी यांचे काही जमेना.टाळीचा उद्देश बोलांचा काल दाखवणे हा नसून ते एक स्वतंत्र वादनच आहे असे त्याना वाटत नसले तरी तसे घडत होते त्यामुळे थोड्याच टाळ्यांचा प्रयत्न करून तो सोडूनच ताल वाजवण्याचा त्याना सल्ला दिला.
"तुम्ही समोर असताना मी बरोबर वाजवतो की नाही हे समजते.मी बऱ्याच वेळा घरात वाजवतो पण ते बरोबर आहे की नाही हे समजत नाही." असे त्यानी म्हटल्यावर मी नेहमीच त्यांच्या समोर असणार नाही म्हणूनच त्यानी मेट्रोनोम घेणे आवश्यक आहे हे मी त्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला.
"या आठवड्यात आणायलाच पाहिजे,"त्यानी मला आश्वासन दिले,"कोणत्या दुकानात मिळेल म्हणालात तुम्ही?"पुन्हा त्यांनी मूलभूत प्रश्न विचारला व त्यला मी माहीत असलेले उत्तर दिले.नंतर मला अजूनही खात्री न वाटल्याने मी त्यांच्या वहीतच मेट्रोनोम हा शब्द व त्या संगीतकेंद्राचे नाव व पत्ता दिला."शिवाय तबल्याची हातोडीही लागेल" त्यातच भर घालत मी म्हणालो.
"ठीक आहे मग पुढील आठवड्यात  या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो."म्हणजे आजचा त्यांचा रियाजाचा वेळ संपला होता याचे हे सूचक विधान होते.
    पुढील मंगळवारी साने मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर जाणार होते त्यामुळे व त्यानंतरच्या आठवड्यात आम्ही पण गावी जाणार होतो पण मधल्या काळात मेट्रोनोम,हातोडी आणण्याचे व त्यावर रियाज करण्याचे आश्वासन सान्यांनी मला दिले.तबल्याची दुरुस्ती करूनच रियाज करण्याची सूचना मी त्याना केली पण एका महिन्यानंतर आमच्या दोघांच्या यात्रा पार पडून आमची गाठ पडल्यावर त्याना रियाज करता आलाच नाही असे त्यानी सांगितले कारण तबल्याची दुरुस्ती झाली नव्हती त्याचबरोबर माझ्या अपेक्षेप्रमाणेच मेट्रोनोम पण घेण्यास मुहूर्त लागला नव्हता.
     मधल्या काळातील प्रगतीचा असा अहवाल सादर केल्यावर माझ्याकडे आल्यामुळे प्रथेला अनुसरून " वा छान आहे तबला तुमचा " अशी तबला प्रशस्ती करून वही समोर ठेवून त्यानी वाजवण्यास सुरवात केली.त्यांचे ठराविक तालवादन झाल्यावर त्याना मी आणखी काही नवे ताल लिहून दिले व ते कसे वाजवायचे हे दाखवले.त्यानुसार वहीत पाहून त्यानी ते वाजवले व "आता पुरे करूया का?" असा प्रश्न मला विचारला.त्यांना तबल्याच्या परीक्षेला बसवून पास करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर नसल्यामुळे मी त्याना मान्यता दिली यावेळी सौ.साधनापण  बरोबर आल्यामुळे त्या दोघींच्या गप्पा रंगात आल्या होत्या.त्यामुळे आम्हालाही त्याना साथ द्यावी लागली व  सान्यांनीही तबलावादनापेक्षा गप्पाष्टकातच अधिक रस घेतला
   पुढील वेळेस मी जरा जास्त उत्साह दाखवून त्याना तीनतालात एक अधिक बोल असणारा तुकडा लिहून दिला.त्यात सुरवातीस "धिना धात्रक " असे बोल होते.आतापर्यंत सरळ सरळ धाधिंधिंधा व तातिंतिंता" याच बोलांची पुनरावृत्ती करणाऱ्या सान्यांनी तो बोल वाजवताना धिना धा पर्यंत आले की त्यांचे घोडे पाण्यात संताजी धनाजी पाहून बुजणाऱ्या मोगली घोड्यासारखे बुजू लागले.धानंतर ताबडतोब त्रक वर जाणे काही केल्या त्याना जमेना.मी हातावर ताल धरत व टाळ्या वाजवत तो बोल पाठ करायला सांगितला व त्यानीही दोन तीनदा प्रयत्न केल्यावर आता तबल्यावर वाजवा म्हटल्यावर परत वहीत बघून त्यानी वाजवायला सुरवात केली.पाठ झाल्यावर वहीत पहाण्याचे काम नाही असे म्हटले तरी वहीकडे त्यांची नजर वळायचीच व तोंडाने बरोबर म्हटले तरी त्यांची बोटे मात्र त्रक पर्यंत जायला तयार नव्हती,धिनाधा झाल्यावर मध्ये विश्रांती घेतल्याशिवात त्यांची मजल त्रक वर जातच बसे.शेवटी तो नाद सोडून त्यानी "सगळे ताल वाजवून पाहू" म्हणत वहीत बघून सगळे ताल वाजवले व त्यानंतर "आता थांबूया का?असे म्हणून थांबले.
   त्यानंतर एक दोन वेळा मी सान्यांच्याकडे गेलो व दोन तीनदा ते आमच्याकडे आले पण त्यानी मेट्रोनोम काही घेतला नाही की त्यांच्या वाजवण्यात काही प्रगती झाली नाही.त्यांच्या शिक्षणात प्रथम मला फोन करून आपल्या येण्याची वर्दी देणे हा पहिला पाठ.त्यानंतर न चुकता आमचे घर गाठणे हा दुसरा पाठ.त्यानंतर मी तबला काढून ठेवला असल्यास " वा तुमचा तबला छान आहे बरका" अशी तबलास्तुती करणे हा तिसरा पाठ.एकदा त्यानी वर्दी देऊनही ते न आल्याने तबला काढण्याची आमची मेहनत वाया गेल्याचे मी त्यांच्या कानावर घातल्यामुळे "मी आल्यावरच तबला काढत जाऊ "असे त्यानीच सुचवल्यामुळे तबलास्तुतीपूर्वी तबला बाहेर काढणे हा तिसरा पाठ व नंतर चौथा तबलास्तुतीचा पाठ.नंतर एकदम त्याना माहीत असलेला व न चुकणारा तीनताल वाजवून दाखवणे  हा पाचवा पाठ व मध्येच "धिनाधात्रक वाजवण्याचा प्रयत्न करणे व धावर घोडे अडणे हा सहावा पाठ त्यानंतर माझे त्यावर त्याना टाळ्या वाजवून म्हणण्याचा आग्रहाचा सातवा पाठ व त्यावर त्यानी " मी घरात प्रॅक्टीस करतो तेव्हां हे कळत नाही असे कोणी तरी सांगणारे असले तर कळते.म्हणून तुमच्यासमोर बसणे आवश्यक आहे"असे म्हणणे हा आठवा पाठ हे ठरलेले असे.या सर्व पाठानंतर एकदा त्याना त्यांच्या लहानपणापासून येणारे सगळे ताल एकदा वाजवून त्यांचा अध्याय समाप्त होत असे.या सगळ्याचा शेवट " आपल्याला काही कोठे तबला वाजवायला जायचे नाही किंवा मेहफिल गाजवायची नाही केवळ तबला आहे म्हणून" हे भरतवाक्यही ठरलेले असते. पण त्यासाठी मला शिक्षा का? हा प्रश्न मी मनात ठेवत असे कारण आमच्या मैत्रीचा शेवट त्यामुळे होऊ नये अशी माझी इच्छा असे.
.  या शिक्षणाचा शेवट अचानक मला कल्पनाही नसताना झाला व तोही एकदम दोन कारणे उद्भवल्यामुळे.त्यात एक म्हणजे माझ्या अमेरिकेतील मुलाने त्याच्या मुलाला तबला वाजवण्यास शिकवावयाचे ठरवले व त्याच्यासाठी म्हणून घेतलेला तबला घेऊन जायचे त्याने ठरवले.त्याचा उद्देश मुलाला समोर बसवून स्वत:  वाजवून दाखवावयाचे व त्यानेही त्याच्याचसोबत वाजवावयाचे अर्थात त्यासाठी लागणारा दुसरा तबला त्याने इकडून घेऊन जायचे ठरवले व आहे तोच तबला घेऊन जावे व मी येथे सवडीनुसार नवा तबला घ्यावे असे ठरले.त्यानुसार आमचा तबला गेला.आता साने यांच्या घरी जाऊन मला शिकवता आले असते पण त्याच वेळी माझ्या पुण्यातील मुलाने दुसरा मोठा फ्लॅट घेतला व तो सान्यांच्या घरापासून जरा अधिक अंतरावर होता.अशी दोन कारणे एकदम उद्भवल्यामुळे सान्यांचे तबला शिक्षण जसे सुरू झाले तसेच अचानक बंदही पडले.तबलावादन तर कधीच सुरू झाले नाही त्यामुळे ते बंद पडण्याचा प्रश्बच नव्हताअ.
मात्र आता अनायासे सापडलेल्या त्या तबल्याचा ते कसा काय उपयोग करतात हेच पहायचे  राहिले आहे.