आमच्या वेळी असं नव्हतं.....(असे सूपर-हीरो'ज)

'आमच्या वेळी असं नव्हतं ' हे वाक्य मी अत्यंत Positively उद्गारत आहे.....

माझ्या लहानपणी मी सूपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, इ. इ. सुपर हीरोज पाहत मोठा झालो...

तेव्हा सूपरहीरो ची व्याख्या ही ह्या 'मॅन' लोकांच्या वागणुकीएवढीच मर्यादित होती,

 आपला इंडियन सूपरहीरो - हनुमान (सोसायटीतली काही मुले हनुमॅन म्हणायची)  होता पण हनुमानाला एवढे ग्लॅमर दिले गेले नाही, रामानंदसागर यांच्या रामायणात हनुमानाला बच्चेकंपनीला भुरळ पडेल असा त्याचा संपूर्ण रोल किंवा त्याची पूर्णं ताकद दाखवणे जमले नाही....  किंबहुना त्याचा संदर्भ रामायणापलीकडे कधी वापरलाच गेला नाही, त्यामुळे  हा पराक्रमी सूपरहीरो साईडट्रॅक ला गेला..

आता आताच्या काळात  ऍनिमेटेड रामायण सिरीज किंवा  बाल हनुमान ने मात्र हनुमानाला भरपूर प्रसिद्ध केले....आणि अगदी अलीकडे आलेल्या भयपटांमधील (१९२०, फुंक वगैरे)  मारुतीरायाच्या चमत्काराने तर भल्या भल्यांना त्याचा भक्त बनवले !!

सांगायचा मुद्दा काय, तर आमच्या  लहानपणी सूपरहीरो होते ते म्हणजे पाश्चात्त्यांचे'च , आणि आठवतो तो म्हणजे पॉपॉय-द सेलर मॅन !!  - अंगकाठीने अगदी सामान्य असलेला हा माणूस डबाभर  स्पिनीच (पालक) खाल्ल्यावर जो काही पैलवान व्हायचा की बास रे बास... 

दंडात ज्वालामुखी काय फुटायचे, छातीची लोखंडी तटबंदी काय, हाताचा हातोडा काय... म्हणजे एकंदरीत कमालच करायचा तो, त्या नादात आम्ही पण एक दोन वेळा स्पिनीच चा पाला खाऊन पाहिला... पण तसे काहीच झाले नाही !  

गेल्या ५-६ वर्षात परिस्थिती एवढी बदलली आहे की,  श्रीकृष्ण-बलराम, छोटा-भीम  ह्या लोकांनी छोट्या पडद्यातून घरी प्रवेश कधी केला आणि ह्या पन्नाशी गाठलेल्या सुपरहिरोंना मागे कधी टाकले कळलेच नाही...  आणि इंडियन-सूपरहीरो ह्या टायटल खाली त्यांना जबरदस्त प्रसिद्धी मिळाली.

श्रीकृष्ण आधीपासून लोकप्रिय होताच, त्यात त्याचे ऍनिमेटेड मोहक रूप, अगाध लीला हे  सगळे मनाला एकदम भावले ! मध्यंतरी पांडवाज हि अनिमेटेड सिरिज सुद्धा छान काढली होती, त्यामध्ये असलेले  श्रीकृष्णाचा अवतार तर खूपच छान होता,.

छोटा भीम ह्या कॅरेक्टरने तर बच्चेकंपनीत अक्षरशः: कमाल केली आहे !  माझी भाची, पुतण्या, आमच्या लेन मध्ये राहणारी चील्ली पिल्ली सगळेच फॅन आहेत ह्या छोटा भीम चे.... कपाळावर नाम(गंध) लावलेला, गळ्यात एक माळ, हाता पायांत वाळे, आणि केवळ केशरी रंगाची धोती घालणारा, लड्डू खाऊन असीम ताकद येणारा भीम आणि त्याचे सहकारी खूपच कमी वेळात भारताच्या कानाकोपऱ्यात पोचले....आधी फक्त इंग्रजी मध्ये येणारी सिरियल बहुदा आता सर्व भारतीय भाषांमध्ये प्रसारित होत आहे.  पोगो वर बहुदा दिवसातले २४ पैकी १८ तास छोटा-भीम साठी राखीव असावेत.  'तेनाली रामा' ची फक्त पुस्तके किंवा एखादीच टीव्ही सीरियल(खरी खुरी माणसे असणारी) पेक्षा , 'Tales ऑफ TENALI RAMAN' ह्या कार्टून सिरिजने तेनालीची उपजत बुद्धी ही कधीकधी सूपरहीरोच्याही पुढे जाते हे सर्बषृत केले... !

परवाचीच गोष्ट,  मी "छोटा-भीम - थोर्न ऑफ बाली " हा ऍनिमेटेड चित्रपट पाहिला,  एकतर रेडिओ वन कडून मिळालेली तिकिटे १० तारखेच्या आत वापरणे भाग होते, आणि त्यासोबत दुसरे लागलेले चित्रपट म्हणजे डोक्याला शॉट होते ! म्हणून हाच नक्की करून पाहिला... :D त्यात त्यांनी बाली बेटांवरील कहाणी दाखवली आहे, रंगडा राक्षसिणीच्या जाळ्यात अडकलेली बाली बेटे, बराँड नावाचा सिंहरूपी देव सोडवतो, परंतु ती राक्षसीण पुन्हा जन्माला येऊन विनाशाच्या तयारीत असताना छोटाभीम आणि गँग बालीच्या राजकुमारासोबत तिचा वध करतात, माणसाच्या आतला आवाज, मन, चांगले काम करण्याची प्रेरणा म्हणजेच तो बराँड नावाचा सिंहरूपी देव हा साक्षात्कार करून सिनेमा संपतो.. अर्थात मोठे झाल्यावर हा सिनेमा पाहणे ही वेगळी बाब असू शकते कारण तोवर आपल्या विचारसरणीत जमीन अस्मानाचा फरक पडतो !! 

ह्या चित्रपटात भीम लांडग्यांना मारताना, गुंडांशी लढताना, आणि राजपुत्राशी शर्यत करताना सिनेमा हॉल मधली मुले इतकी Cheer-up करत होती की सगळे सभागृह दणाणून गेले होते. 

फिरंगी सूपरहीरो मध्ये पण थोडा बदल झालेला दिसतो, अलीकडच्या काळात आलेली चायनीज पोकेमॉन आणि डोरेमॉन पण बरेच प्रसिद्ध झालेत... बेन-टेन पण जोडीला आहेच... ! तरीही ह्या इंडियन सूपरहीरोज ला कॉम्पिटिशन देणे सोपे नाही, कारण ह्या लोकांनी अल्पावधीतच आपले स्थान बळकट केले आहे, आणि आता तर हे सगळे स्कूल-बॅग, कंपॉसपेटी,कपडे, टोप्या सगळ्यांवर दिसू लागले आहेत...अजून चितळे/काका हलवाई/जोशी/ देसाई वगैरे मंडळींनी आपल्याकडचे लाडू , काहीतरी ऍडिशन करून 'छोटा-भीम चे लड्डू; म्हणून  विकायला काढले नाहीत हे नवल आहे !    

मला ह्याचा खूप आनंद झाला की जे आपले म्हणता येतील असे सूपरहीरो माझ्यावेळी नव्हते, ते आत्ताच्या लहानग्यांना सहज उपलब्ध आहे, फक्त देशी-विदेशी चा वाद नाही, पण चॉइस असताना जे आपल्याकडे आहे ते सोडून उगीच कशाला ना पळत्यापाठी ?  

-

आशुतोष दीक्षित