मे १२ २०१३

नाटाचे अभंग... भाग ६

५) सर्व सुखाचिया आशा जन्म गेला । क्षण एक मुक्ति यत्न नाहीं केला ।
 हिंडतां दिशा शीण पावला । माया वेष्टिला जीव माझा ॥१॥
 माझें स्वहित नेणती कोणी । कांहींच न करिती मजवांचूनि ।
 सज्जन तंव सुखाची मांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥धृ॥
 काय सांगों गर्भींची यातना । मज भोगितां नारायणा ।
 मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥३॥
 मज चालतां प्रयाणकाळीं । असतां न दिसती जवळी ।
 मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥४॥
 आतां मज ऐसें करीं गा देवा | कांहीं घडे तुझी चरणसेवा ।
 तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥५॥

 उत्पत्ती-स्थिती-लयरूप असणार्‍या जगत् व्यवहारात जीवाला अनिच्छेने परंतु आवश्यकपणे नानाविध क्लेष सहन करावे लागत असतात. असे असतानासुद्धा मायेच्या प्रभावामुळे जीव सत्यत्व जाणून न घेता त्याच्या जीवनामध्ये भ्रम-प्रमादादी स्वरूपात प्राप्त होणार्‍या ‘अनुकूल वेदना’ म्हणजेच सुख (अनुकूल वेदनीयं सुखं ।) इच्छित राहातो. जीव ज्या सुखांची अनुभूती घेत राहतो, ती अनंत प्रकारची असतात. अशी सुखे अनंत वेळा उपभोगावयास मिळाली, तरी त्यापासून जीवाला अखंड समाधान अथवा तृप्ती लाभत नाही. इतकेच नव्हे तर, एखाद्या प्रकारचे सुख प्राप्त झाले असता अन्य प्रकारचे सुख कसे भोगता येईल, याचाच विचार जीव निरंतरपणे, अमर्यादित स्वरूपात करीत राहतो. अग्नीत लाकडे किंवा तूप जितके टाकावे, तितका अग्नि भडकतच जातो. तद्वत्, जीवाच्या ठिकाणी भ्रामक सुखाची अभिलाषा वाढतच जात असते. प्रत्येक इंद्रियाला त्याची त्याची भूक आहे. त्या त्या इंद्रियाचे विषय हे त्याचे खाद्य असते. इंद्रिये त्यांची भूक भागविण्यासाठी जीवाला आटापिटा करावयास लावीत असतात. निरनिराळ्या तथाकथित सुखाच्या मागे लागून संपूर्ण आयुष्य उध्वस्व होते, तरीसुद्धा जीवाला स्वस्वरूपाचा पडलेला विसर जाणवत नाही. निदान मानवयोनीत आल्यावर तरी आत्मकल्याण साधून घ्यावे, असा विचार प्रापंचिक सुखाच्या विवंचनेत रत असलेल्या माणसाच्या मनाला स्पर्शही करून जात नाही. खरे तर प्रपंचातील सर्व सुखे ही कडू गोळीला साखरेचे वेष्टण असावे, तशी असतात. ती दुःखांकितच असतात. किंबहुना, त्यांचा शेवट दुःखप्राप्तीसच कारण होतो, हे माणसास कळते पण वळत नाही. तसल्या सुखाबद्दलची अनास्था निर्माण होत नाही. हीच परिस्थिती तुकोबाराय साधकांचे प्रतिनिधित्व करीत या अभंगात विशद करीत आहेत्.
 पहिले पद ‘सर्व’ हे ‘जन्म गेला’ या पदाशी जोडलेले आहे. ‘सुखाच्या आशा करीत सर्व जन्म गेला’. जन्म-मरणाच्या चक्रात अडकलेला जीव, मग कोणत्याही योनीतील असो, त्याच्या मर्यादेतील सुखाच्या शोधात राहात असतो. ‘आहार निद्रा भय मैथुन’ या चौकटीत राहून जीवाचे व्यवहार चालू राहतात. केवळ मनुष्य योनी ही एकच विवेक धारण करण्यास सक्षम असलेली योनी आहे. त्यातही बुद्धी प्रगल्भ होऊन सदसद्विवेक रुजणे ही मनुष्ययोनीची सार्थकता मानली जाते. हा सदसद्विवेक ईश्वरी अनुग्रह म्हणून केव्हा का होईना, मनुष्य योनीतच प्राप्त होणारा आहे. असा सदसद्विवेक अंतःकरणात जागृत झाला की कधीतरी केवळ सुकृताची जोडी म्हणून पश्चात्तापदग्ध होऊन जीवाला ईश्वराचा आठव येतो. तुकोबारायांची ही अवस्था पहिल्या चरणातून व्यक्त होत आहे. सारा जन्म सुखासाठी उटारेटा करण्यात व्यर्थ गेला. असा उटारेटा करीत असताना देवाचा आठव झाला असेलही, पण तो लौकिक फळाच्या प्राप्तीसाठी केला गेला होता. उपरती होऊन संसारबंधनाचा उच्छेद व्हावा, मुक्ती मिळावी, यासाठी देवाचा आठव संपूर्ण आयुष्यात क्षणभरही झालेला नाही, मग मुक्तीसाठी यत्न करणे दूरच. ‘दिशा हिंडणे’ यात मृगजळामागे उरफोड करून घेणार्‍या हरणाचा भाव आहे. धाव धाव धावताना तहान तीव्र होऊन हतबलता हरणाच्या पदरी पडते. तद्वत् माणसाची गत होत असते. जन्मामागून जन्म मिळूनही या परिस्थितीत फरक पडलेला नाही. तुकोबाराय या परिस्थितीला ‘जीवाचे मायेने घेरले जाणे’ म्हणतात. म्हातारपणी सर्व इंद्रिये दुर्बल झाल्याने पराकोटीचे परावलंबित्व माणसास भोगावे लागत असते. सर्वांकडून होणारी उपेक्षा, केला जाणारा तिरस्कार यांमुळे जिणे नकोसे होत असते. इंद्रिये कार्यक्षम असताना जन्म-मरणाच्या कोड्यातून सुटण्याचा यत्किंचितही प्रयन्त केलेला नाही, याची जाणीव अशा वेळी होते.
 प्रापंचिक सुखांचे फोलपण उमगणे, मृत्यूची अनिवार्यता कळणे आणि मुक्तीची इच्छा होणे ही सदसद्विवेक प्रगल्भ होऊन मुमुक्षुत्व प्राप्त होण्याची अवस्था असते. या अवस्थेत ‘स्वहित’ उमगते. खर्‍या स्वहिताची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार मानवयोनीसच ईश्वराने दिलेला आहे. स्वर्ग हा सुखाच्या उपभोगाचा ‘डेड् एण्ड’ आहे. तो प्रारब्धाचाच एक भाग आहे. संचित संपले की, तिथला मुक्काम हलवून पुन्हा अन्य योनीत यावे लागते. मुक्तीचा लाभ हवा असेल, तर देवांनाही मानवयोनीशिवाय पर्याय नाही. मानव योनीत आलेल्या जीवास मुक्तीचा अधिकार जरी असला तरी ईश्वरी माया तिचा खेळ संपन्न करण्यासाठी जीवाला आदीपासून अंतापर्यंत ठकवत राहते. जीव पुनरुत्पादनाला सक्षम झाला की, ही माया त्याच्या अंतःकरणात प्रपंचाची ओढ निर्माण करते. येन् केन् प्रकारेण जीव स्वतःला प्रपंचात अडकवून घेतो. त्याच्याभंवती गोतावळा उभा राहतो. हा गोतावळा जीवाला गुंतवून ठेवतो. बंधनात अडकलेला जीव अगतिक होतो. त्याचे स्वजन त्याच्याशिवाय काहीही करण्यास तयार नसतात. प्रत्येक कार्यात जीवाला गुंतवत जातात. स्वहित कशात आहे, याचा विचार कोणीच करीत नाही. त्यासाठी कुणी चार शब्द त्याला सांगतही नाहीत. असा उपदेश करण्यासाठी ईश्वराने सज्जन-संतजन नेमलेले असतात खरे, परंतु त्यांच्याकडे जाण्यासाठीचा अवसर लाभत नाही. किंबहुना, तशी बुद्धी बंधनात अडकलेल्या जीवाला होत नाही. ‘वेळीच जागे व्हा’ असे या धृपदाद्वारे येथे तुकोबारायांचे इशारेवजा सांगणे आहे.
 सज्जन सोडून अन्य कुणीच आदी-अंत जाणत नाहीत, असे तुकोबाराय जे सांगतात, त्याचे स्पष्टीकरण ते पुढील चरणात करतात. ‘आदी’ म्हणजे जन्माच्या पूर्वीची अवस्था. ही निवेदन करताना तुकोबाराय देवाला ‘नारायण’ नावाने संबोधतात. परमेश्वराने सगुण रूप अर्थात् पुरुष म्हणून जे रूप धारण केले, ते नारायणरूप होय. ते आदी-सगुण-रूप होय. पुरुषापासून प्रकृती आणि प्रकृतीने मांडलेला पसारा म्हणजे हे जगत् होय्. प्रकृतीने जगत् निर्माण केले आणि नारायणाला त्यात प्रवेश करण्याची याचना केली. तिच्या याचनेप्रमाणे नारायणाने जगत् व्याप्त करून टाकले आणि त्याला विष्णुरूप प्राप्त झाले. प्रकृतीच्या उपद्व्यापातून अस्तित्व लाभलेला जीव गर्भात आकार घेऊ लागतो. या जीवाची अवस्था तुकोबाराय निवेदन करतात. गर्भात असताना जीव हा मासाचा गोळा असतो. स्वतःच्याच मळ-मूत्रात नऊ महिने त्याचा कोंडमारा होत राहतो. या परिस्थितीत जीव असताना तो ज्या यातना भोगत राहतो, त्या केवळ नारायणच जाणू शकणे, साहजिक आहे. यासाठीच तुकोबाराय नारायणाला संबोधित आहेत. त्या क्लेषांपासून सुटका करण्यासाठी जीव नारायणाचीच करुणा भाकू शकतो व त्याप्रमाणे जीव क्षणोक्षणी नारायणाचेच ध्यान करीत राहतो. (गर्भात असल्यामुळे जीवाची सारी इंद्रिये पराधीन असतात. केवळ पूर्वजन्मींच्या संस्कारांमुळे जीव जागृत झालेल्या त्याच्या इच्छा मातेच्याद्वारे तिच्या डोहाळ्यांच्या योगे भागवून घेत राहतो.) जीवनाच्या प्रारंभी जीवाची अशी दयनीय अवस्था (आदी अवस्था) झालेली असते. जन्माला आल्यावर आणि स्वतःच्या व्यक्तित्वाची जाण आल्यानंतर क्लेषकारक जीवनाला तोंड देत जेव्हा म्हातारपण येते, त्यावेळी जीव, भंवती गोळा झालेल्या गोतावळ्याकडून पुन्हा उपेक्षा, उपहास, तिरस्काराचा अनुभव घेत राहतो. त्यातून मनाला वैफल्यग्रस्त अवस्था प्राप्त होत असते. देहपतन झाल्यानंतर देह मातीशी एकरूप होऊन जातो (ही शेवटची अवस्था म्हणजेच अंत असतो.). काहीही दृष्य राहत नाही. तुकोबाराय सारांशाने शेवटी सांगतात की, केवळ एकमेकांच्या संचिताचा परिणाम म्हणून इथे सारे एकत्र आलेले असतात. जो तो केवळ आपापला भाग वसूल करून घेतो आणि नामानिराळा होतो. ही अवस्थाही ‘आदी’ इतकीच दुःखदायक असते.
 मुमुक्षुत्व प्राप्त झाल्यानंतर जेव्हा वास्तविकतेची ओळख पटते, तेव्हा एका ईश्वराशिवाय अन्य त्राता दिसत नाही. या समयी देवाकडे काय मागावे, याचे मार्गदर्शन तुकोबाराय शेवटच्या चरणात करतात. इथे ते भगवंताला ‘केशव’ नावाने संबोधतात. कंसाने कृष्ण वधाकरता ‘केशी’ नावाचा मायावी असुर पाठविला होता, त्या केशीचा वध ज्याने केला तो केशव. जीवाला मायेने ग्रासलेले असल्याने जीव दुःख भोगत असतो. या मायावी करणीचा अंत भगवंतच करू शकतो. अशा सर्वसामर्थ्यसंपन्न भगवंताला विनंती करावयाची आहे की, ‘ या प्रपंचाशी शत्रुत्व माझ्या अंतःकरणात रुजव. कर्तृत्वशक्ती व बुद्धी असताना, जे करावयास पाहिजे, ते मी केलेले नाही. आता कुठलेही सामर्थ्य व वेळ आता माझ्याकडे नाही. मला या मायावी संसारापासून मुक्त कर आणि कुठल्याही प्रकारे योग्य त्या उपायाने माझ्यामागे लागलेल्या जन्म-मृत्यूच्या बंधनाचे खंडण तू कृपाळूपणे कर.’

(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)

Post to Feed
Typing help hide