मे १७ २०१३

नाटाचे अभंग... भाग ९

८. जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन ।
 जगज्जीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥१॥
 जो या भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं ।
 पाउलें समचि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥धृ॥
 जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ ।
 खेळे हा लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥३॥
 जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी ।
 रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥४॥
 जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा ।
 जयाचे गळां वैजयंती माळा । तया वेळोवेळां दंडवत ॥५॥
 जयाचें नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी ।
 जो हा तेजःपुंज रासी । सर्वभावें त्यासी तुका शरण ॥६॥

 हा नाटाचा अभंग पाहाता असे दिसून येते की, तुकोबारायांनी जे आराध्य दैवत निवडले आणि त्यांनी जी साधना केली त्याविषयीचे त्यांचे हे आत्मनिवेदन आहे. यामागचे हेतु दोन असावेत असे म्हणता येते. एक तर जिज्ञासूंना मार्गदर्शन मिळेल आणि दुसरा हेतु हा की, जी अलौकिक अनुभूती तुकोबारायांना प्राप्त झाली, त्याबद्दल देवाला पोचपावती देता येईल. यातील पहिल्या हेतुबद्दल तुकोबारायांच्या मनात आशा आहे की, माझे हे निवेदन सगळ्यांच्या कानावर पडले तर भाग्यवशात् साधकांच्या वृत्तीत पालट होणे शक्य आहे. या निवेदनाचा परिणाम कुणावर, कधी, कशा प्रकारे आणि काय स्वरूपात होईल याचा विचार मात्र ते करीत नाहीत. दुसर्‍या हेतुबद्दल असे म्हणता येईल की, भगवंत हा आत्माराम आणि संपूर्णतः अनपेक्ष असा आहे. त्यामुळे त्याच्या स्तवनाने तो प्रफुल्लित होईलच, असे नव्हे. मात्र या स्तवनाने देवाच्या उपकारातून अल्पसे उन्‍ऋण झाल्याचे समाधान आपल्याला मिळेल, अशी तुकोबारायांची भावना आहे.
 हा अभंगाचे वाचन केले असता एक गोष्ट लक्षात येते. ती अशी की, अभंगाच्या पहिल्या ओळीतील अर्धा भाग ‘जेणें हा जीव दिला दान’ हा प्रत्येक कडव्याच्या शेवटव्या अर्ध भागाशी जोडून तुकोबारायांनी त्यांच्या साधनेची रूपरेषा कथन केली आहे. ‘जेणें हा जीव दिला दान... गाईन गुण तयाचे’, ‘जेणें हा जीव दिला दान... अंतरी धरोनि राहेन’, ‘जेणें हा जीव दिला दान... तयाच्या भाळ पायांवरी’, ‘जेणें हा जीव दिला दान... राहे पाताळीं स्वामी माझा’, ‘जेणें हा जीव दिला दान...तया वेळोवेळां दंडवत’ आणि शेवटी, ‘जेणें हा जीव दिला दान...सर्वभावें त्यासी तुका शरण’. दुसरी एक गोष्ट ध्यानात येते ती अशी की, पहिले कडवे सोडल्यास, प्रत्येक कडव्यात भगवंताचे रूप आणि त्याचे गुण-सामर्थ्य यांची सांगड घातलेली आहे.
 ’जेणें हा जीव दिला दान’ यातील जेणें हा शब्द ’ज्याने’ आणि ‘ज्या कारणाने’ असे दोन अर्थ दाखवित आहे. यातील ‘ज्याने’ हा अर्थ गौण आहे. प्रत्येक जीव देवाच्या कृपेनेच जन्माला येत असतो, हे सारे जाणतात. तथापि, दुसरा अर्थ ‘ज्या कारणाने’ हा मात्र प्रत्येकाला अध्यात्माचा पाया किंवा साधनेचे गुह्य सांगणारा आहे. ‘मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मी कशासाठी आलो आहे’ या प्रश्नांचे चिंतन करणे, हा अध्यात्माचा पाया आहे, हे तुकोबाराय प्रथम स्पष्ट करतात. मनुष्यजन्माची इतिकर्तव्यता एकच आहे आणि ती म्हणजे ‘उद्धरेत् आत्मनात्मानम्’ अर्थात् स्वतःचा उद्धार साधून घेणे. ‘जेणें’ या पदातून मनुष्यजन्माचे दान देण्यात असलेला भगवंताचा हेतु दाखविणे आहे. तो हेतु सतत मनात जागा असला पाहिजे. अभंगातील ‘हा जीव’ हे पद ‘मनुष्य योनीतील जीव’ दर्शविणारे आहे. हे लक्षात घ्यावयाचे आहे की, मनुष्य योनीत जन्म मिळविण्याचे कर्तृत्व जीवाच्या ठिकाणी संपूर्णतः असू शकत नाही. जीवाची ही प्रगत अवस्था त्याचे प्रारब्ध (जे कर्माद्वारे वाट्यास येते) आणि भगवत्कृपा यांच्या संयोगातून मिळत असते. पुन्हा, सत्कर्माची प्रेरणा होणे, हासुद्धा भगवत्प्रेरणेचा परिणाम असतो. त्या भगवंताने हा मनुष्ययोनीतील जीव ‘दान’ दिलेला आहे. येथे ‘दान’ आणि ‘भिक्षा’ यातील अंतर ध्यानात घ्यावयाचे आहे. ‘भिक्षा’ मागावी लागते. अन्य योनीतील जीव ‘मला मनुष्य योनीत जन्म दे’ अशी मागणी करू शकत नाही! येथे ‘दान’ म्हणण्याचे कारण असे की, दानाचे श्रेय तसेच त्यामागील दातृत्व हे दान देणार्‍याकडे जाते. असे अलौकिक दान देणारा कोण आहे, ते तुकोबाराय स्पष्ट करतात -‘जगज्जीवन नारायण’. ‘जीवन’ म्हणजे ‘प्राणधारणा तसेच प्राणधारणेस आवश्यक बाबी (हवा, पाणी, अन्न आदी)’. सार्‍या जीवजगताचे धारण-भरण-पोषणादी करणारा एक भगवंतच आहे. जीवाला हे दान देणारा तो जगत्पालक आदीपुरुष नारायण आहे. अकारण करुणावलय असलेल्या नारायणाने हे दान माझ्या पदरात का टाकले आहे, याचे अखंड चिंतन तुकोबारायांना अभिप्रेत आहे. तुकोबारायांचे हे विचार साधकाला आपापल्या ग्रहणशक्तीप्रमाणे, आपल्या योग्यतेप्रमाणे भगवंताभिमुख होण्यास साहाय्यभूत ठरणारे आहेत. या चिंतनासाठी आवश्यक असलेली प्रगल्भ बुद्धी असली तरी किंवा एखाद्याकडे तशी पात्रता नसली तरी त्या भगवंताचे गुण आवडीने गायचे. हे तितकेच गरजेचे, परिणामकारक आणि इष्ट फलदायी ठरणारे आहे, असे सांगून साधनेचे हे पायाभूत, प्रधान, महत्वाचे अंग असल्याचे तुकोबाराय स्पष्ट करतात.
 शात्र-पुराणांचे मंथन करून ज्याला नारायण हे नामाभिधान दिले गेले आहे, ते प्रत्यक्ष दृष्टीगोचर होणे, हे सर्वांनाच शक्य नाही. म्हणून तोच नारायण, जो जगज्जीवन आहे व तो ज्या स्वरूपात नटून राहिलेला आहे, त्याचा ठावठिकाणा तुकोबाराय पुढील चरणात सांगतात. त्यासाठी ‘या’ हे स्थलवाचक पद योजिलेले आहे. जो अर्थात् नारायण, इथेच, या पृथ्वीतलावरील भीवरेच्या तीरावर उभा आहे. ‘भीवरा’ हे भीमा नदीचे प्रासादिक साहित्यात दिले गेलेले नाव आहे. तो ‘कट धरूनियां करीं’ अशा स्थितीत आहे. या नारायणाचे हे रूपलक्षण वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे येथे सांगितले आहे. साधक आहे तो भीमा अर्थात् विशाल जलप्रवाह असलेल्या नदीच्या एका बाजूस. हा विशाल जलप्रवाह भवसागराचे किंवा सांसारिक जीवनाचे द्योतक आहे. त्याच्या पलीकडील तीरावर हा जगज्जीवन हातात कंबर धरून उभा आहे. पूज्यपाद शंकराचार्यांनी नारायणाचे हे रूपलक्षण ‘पांडुरंगाष्टका’च्या तिसर्‍या कडव्यात विशद करून सांगितलेले आहे. त्यात ते सांगतात, ‘प्रमाणं भवाब्धेः इदं मामकानां नितंबः कराभ्यां धॄतो येन् तस्मात् ।’- (आपल्या हातांनी कंबर धरून पांडुरंग भक्तांना असे दाखवित आहे की, भवसागर माझ्या कंबरेइतकाच आहे. तुकोबाराय भीवरेचा उल्लेख करून भवसागर फार खोल नाही, तो तरावयास दुस्तर असा नाही, असे सांगतात. कमरेवर हात ठेवणे, हे स्वतःचे सामर्थ्य आणि स्वीकारावयास सदा सिद्ध असल्याचे दाखविणे आहे. ‘पाणी काही खोल नाही. माझ्या कमरेइतकेच ते आहे. तुम्ही न घाबरता या. तुमचा स्वीकार करण्य़ास मी सदैव तयार आहे’ असे हा भगवंत भक्तांना खुणावत आहे. ’कट’ या शब्दाचा एक अर्थ प्रारब्ध, कष्ट असाही आहे. ‘कट धरूनियां करीं’... भक्तांचे कष्ट, प्रारब्ध या करुणावंत भगवंताने हरण करून आपल्या हाती धारण केले आहेत्. या भगवंताचे दुसरे रूपलक्षण तुकोबाराय सांगतात, ‘पाउलें समचि साजिरीं’. भगवंताचे हे रूप  ‘विठ्ठल’ असल्याचे लक्षात येते आणि तो त्रिभंगी, तीन ठिकाणी वाकडा, नसल्याचे तसेच त्याची पाऊले स्थिर, अचंचल आहेत हे सांगण्यासाठी या भगवंताचे चरण सम असल्याचे वर्णन तुकोबाराय करतात. चरण हे आचरणाचे द्योतक आहे. ते सम आहेत. हा आदिनारायण, हा जगदीश, हा जगज्जीवन जगतातील जीवांकडे पाहताना प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला फळ देत असतो. हे करीत असताना तो कुठलाही आपपर भाव ठेवीत नाही. भगवंताच्या साक्षीभावाचे लक्षण म्हणजे त्याचे समचरण असणे आहे. भगवंताचे पाय सम तर आहेतच, शिवाय ते साजिरे, शोभिवंत, सुंदर आहेत, असे म्हटले आहे. ज्याला या पावलांचे दर्शन झाले, त्याचे अंतःकरण ही पावले आकर्षून घेतात. भगवंताचे हे साजिरे, सम चरण अंतरी धरून राहीन, म्हणजे निरंतर त्याचेच ध्यान धरीन, असे तुकोबाराय या धृपदात सांगत आहेत. ज्याने हा मनुष्यजन्म दान दिला आहे, त्याचा यामागील हेतु लक्षात ठेवून, त्याच्या प्राप्तीसाठी करावयाच्या साधनेतील चिंतनानंतरची ही दुसरी पायरी (ध्यानधारणा) असल्याचे येथे सुचविले आहे.
 पुढील चरणात परस्परविरोधी अशा प्रकारच्या लीला भगवंत करीत असतो, हे सांगण्यासाठी तुकोबाराय असुरांचा नाश व भक्तजनांचा प्रतिपाळ या दोन भगवत् सामर्थ्यांचा उल्लेख करतात. इथेही ‘या’ या स्थलवाचक पदाची रचना करून तुकोबारायांना पृथ्वीलोकावरील दोन प्रवृत्तींकडे वाचकांचे लक्ष वेधावयाचे आहे. असुर किंवा भक्त हे पृथ्वीलोकाचेच वैशिष्ट्य आहे. या दोन वर्गांबाबत भगवंताचे आचरण कसे आहे हे तुकोबाराय आता सांगतात. असुरांचा नाश म्हणजेच असुरी वृत्तींचा नाश आहे तर भक्तजनप्रतिपाळ म्हणजे अंतःकरणात रुजलेल्या भक्तीचे पोषण आहे. भगवंताच्या सम वृत्तीचे हे द्योतक आहे. तुकोबाराय भगवंताच्या या कार्यास खेळ म्हणतात आणि भगवंत या खेळात कुशल (लाघवी) आहे आणि त्याचे हे सामर्थ्य साधकाच्या मनाला सर्वतोपरी धीर देणारे आहे. साधकाच्या मनातील दुष्प्रवृत्तींचा नाश करून त्याच्या मनात भक्ती फुलविण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी एकवटले आहे, त्याच्यापुढे साधकाने नम्र होणे, ही शरणागतीची स्वाभाविक अशी पूर्व अवस्था आहे, असे तुकोबारायांना सांगावयाचे आहे. ‘तयाच्या पायांवरी भाळ’ याचा व्यापक अर्थ असा आहे की, भगवंताच्या क्रियांचा समन्वय स्वरूपात आपल्या बुद्धीद्वारे अर्थ लावू गेल्यास आपला बुद्धीभ्रम होण्याची शक्यता आहे. देहात बुद्धीचे प्रमुख, प्रधान स्थान मस्तक हे आहे आणि म्हणून अखिल भावभावना, स्वतःची बुद्धी, अहंकार सारे या भगवंताच्या पायांवर वाहावयाचे आहे. ‘जेणें हा जीव दिला दान... तयाच्या भाळ पायांवरी’ हे साधनेचे पथ्य येथे सांगितले आहे.
 सर्वसामर्थ्याने युक्त असलेल्या या भगवंताच्या स्वभावाचे वैशिष्ट्य तुकोबाराय पुढे वर्णन करतात. पुन्हा या चरणातही ‘या’ पदाने पृथ्वीलोकावरील दुसर्‍या दोन वर्गांचा, ‘गोपाळ’ आणि ‘बळी’ असा, तुकोबाराय उल्लेख करतात. ‘गो’ म्हणजे इंद्रिये. त्यांचे पालन करणारा, तो गोपाळ. संत हे खर्‍या अर्थाने गोपाळ असून त्यांच्या मेळाव्यात त्यांच्याबरोबर हा ‘वनमाळी’ बरोबरीच्या नात्याने खेळत राहातो. भक्तीचा, प्रेमाचा मळा जिथे फुलला आहे, अशा वनाचा हा माळी आहे. भक्तीच्या रोपांना - गोपाळांना - काय कमी-जास्त हवे, ते प्रेमाने, आस्थेने पाहणारा, त्यांची काळजी वाहणारा हा वनमाळी आहे. या गोपाळांच्या विषयी त्याच्या मनात सख्यभाव आहे. त्यांच्याशी खेळताना तो स्वतःचा पराभवही मान्य करतो आणि त्यांचे बोलही स्वीकारतो. तो गोपाळांच्या मेळ्यात आपले सामर्थ्य विसरतो. तोच हा भगवंत प्रसंगी भगवंताचा आदर करणार्‍या परंतु देवांना बलहीन करणार्‍या ‘बळी’ला आपल्या विलक्षण सामर्थ्याचा प्रत्यय दाखवून सन्मानही देतो आणि त्याची सेवा करीत त्याच्या पदरी राहतो. येथे ‘पाताळी राहणे’ म्हणजे ‘स्वतःकडे कमीपणा घेऊन दुसर्‍यास आनंद देणे’ असा घेतल्यास चुकीचा ठरू नये. असा दिलदार असलेला जगज्जीवन हाच एकमेव सर्व जीवांचा स्वामी असल्याचे तुकोबाराय पटवून देतात व त्याचाच आश्रय घेण्यास सांगतात. ही शरणागतीची दुसरी पायरी आहे.
 तुकोबारायांनी ज्याला स्वामी म्हणून स्वीकारले, त्याचे लाघवी सामर्थ्य वर्णन केल्यानंतर हा जगज्जीवन जीवाच्या सर्वेंद्रियांना सुखदायी वाटणारा असल्याचे सांगण्यासाठी भगवंताचे वर्णन ते ‘लावण्यपुतळा’ असे करतात. सर्वांगसुंदरता हे ईश्वरी लक्षण आहे. लावण्याने स्वतःच स्वतःला मूर्तरूप घेतलेले आहे. त्यामुळे पाहणार्‍याची नजर खिळून राहात आहे. डोळ्यांना अन्य विषयाची ओढ राहिलेली नाही. हा भगवंत केवळ दिसायला असामान्य आहे किंवा त्याचे सौंदर्य शब्दातीत आहे असे नव्हे तर त्याच्या अंगी सर्व प्रकारचे कौशल्यही एकवटलेले आहे. याच्या लाघवी कळा मानवी बुद्धिगम्यतेच्या आवाक्यात येणार्‍या नाहीत. त्याच्या लावण्याला जोड मिळाली आहे, ती दिव्य वैजयंती माळेची. बाह्यांगावरील हे एकमेव अद्वितीय लक्षण दुसर्‍या कोणत्याही देवाच्या ठिकाणी पाहावयास मिळत नाही. अंतरंगाने आणि बाह्यतःदेखील ज्याचे वर्णन करताना वाचा कुंठित होते (यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह), त्यापुढे एकच करावयाचे शिल्लक राहते, ते म्हणजे त्याच्या पायाशी दंडवत घालणे. प्रथम ‘पायांवर भाळ ठेवले’. आता या अलौकिक भगवंताला आठही अंगे (दोन हात पुढे पसरून जोडलेले, दोन गुडघे, दोन पाय, छाती आणि मस्तक) जमिनीवर लावून नमन करायचे आहे. हे एका अर्थाने देहाने देवाला समर्पित होणे आहे.
 अभंगाचा समारोप करताना साधकाच्या आत्यंतिक व अंतिम कल्याणासाठी तुकोबाराय म्हणतात, ‘या लावण्यपुतळ्याच्या रूपाबाबत मतभेद असू असतीलही. परंतु त्याचे अद्वितीय लक्षण व सामर्थ्य असे आहे की, याच्या केवळ नामोच्चाराने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो.’ पुढे तुकोबाराय आणखी एक वैशिष्ट्य सांगतात ते हे की, नसलेले ऐश्वर्य जी देते आणि असलेले काढून घेते, जी सर्वांना सदा हवीहवीशी वाटते, पण इच्छुकांपासून जी दूर राहते, ऐसी (अशी) लक्ष्मी या भगवंताची दासी झालेली आहे. ही लक्ष्मी समुद्रमंथनाच्या वेळी सागरातून उत्पन्न झाली. सागरात असताना तिला दिव्य कूर्माच्या रूपातील भगवंताचे दर्शन झाले होते. त्याने मंदार पर्वत पाठीवर धारण केला होता. सागरातून बाहेर आल्यावर या लक्ष्मीला तोच भगवंत मंदार पर्वताच्या शिखराला आधार देत असलेला दिसला. सागरातून जी काही रत्ने निघत होती, त्यांकडे अजिबात लक्ष न देता, त्याचे लोककार्य चाललेले होते. त्या कार्यातच तो दंग होता. तिने सर्वांवर नजर फिरवली. देव-असुरांना सहाय्यभूत होणार्‍या या भगवंताशिवाय अन्य सारे देव-असुर तिच्याकडे अभिलाषेने पाहत होते. हा उदार भगवंत सकल जीवांचा पालक असल्याचे तिला जाणवले. त्याला या कार्यात सहाय्य करण्याचे ठरवून आणि त्यासाठी भगवंताचे दास्यत्व पत्करून ती लक्ष्मी त्याला समर्पित झाली. पुढे आलेला ‘सर्वभावे’ हा शब्द  भगवंताच्या तेजःपुंजतेची तसेच शरणागतीचीही व्याप्ती दर्शविणारा आहे. हा भगवंत स्वयंप्रकाशी, तेजाचा पुंज आहे. सूर्य-चंद्राचे जे तेज आहे, ते याच्याचपासून त्यांना मिळत असते. त्यामुळे साहजिकच त्यांचे तेज याच्या तेजापुढे फिके पडते. किंबहुना, सूर्य-चंद्रादी सारेच तेजोगोल याच्या आज्ञेत राहणारे आहेत, त्यांचा तो नियामक आहे. अशा भगवंताला तुकोबाराय सर्वभावे म्हणजे संपूर्ण अंतःकरण चतुष्टय (मन-बुद्धी-चित्त-अहंकार) यासह देहभाव विसरून तसेच आपला जीवभाव आणि देवाचा देवभाव यांचे एकत्रीकरण करून भगवंताला शरण जातात. ही शरणागतीची अंतिम अवस्था आहे. 
 ‘जेणें हा जीव दिला दान’ अशी सुरुवात करून ‘सर्वभावें त्यासी तुका शरण’ अशी अभंगाची सांगता करीत तुकोबारायांनी अल्प शब्दात मनुष्यजन्माच्या सार्थकतेसाठी करावयाच्या साधनेचे मार्गदर्शन केले आहे.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)

Post to Feed
Typing help hide