आनंदडोह

प्रत्येक जीवाच्या मनात भय आणि आनंद या दोन वृत्ती जन्मतःच असतात. या दोन्हीचे अस्तित्व अंतःकरणात खोलवर रुजलेले असते व त्यांचे स्वरूप सूक्ष्म (अदृश्य) असते. बाह्यतः आपल्याला जो आनंद किंवा भयाचा परिणाम दिसतो, तो अल्पच असतो. जिथे भय असते, तिथे निर्भेळ आनंद नांदू शकत नाही. तसेच, जेव्हा आनंदाच्या ऊर्मी जागत्या असतात, तेव्हा भय लोप पावलेले असते.
भय आणि आनंद यांच्या परिणामाविषयी असे दिसेल की, भय हे जीवाला स्वातंत्र्य मिळू देत नसते. जीव दडपणाखाली राहिला की, तो परतंत्र होतो. म्हणूनच शिस्त हवी असेल तेव्हा भय निर्माण करणारा कमीत कमी कल्पनेतला बागुलबुवा तरी दाखवावा लागतो. याउलट, जेव्हा जीव आनंदात रममाण झालेला असतो, तेव्हा तो स्वातंत्र्य अनुभवतो. हे स्वातंत्र्य स्वैरचाराकडे झुकणे शक्य असते. मग हा स्वैराचार इतरांना त्रासदायक होत असतो.
तैतिरीय उपनिषदात एक ऋचा आहे - 
भीषास्माद्वात: पवते । भीषोदेति सूर्यः । भीषास्मादग्निश्चेन्द्रश्च । मृत्युर्धावति पञ्चम इति ॥ (तै.उप. ८.१)
परमात्म्याच्या भयामुळे वायु वाहतो, सूर्य प्रकाशत राहतो. तसेच, अग्नी, इंद्र, यम आदी हेही त्याच भयाने आपापली कार्ये करण्यास प्रवृत्त होत असतात. याच अर्थाने कठोपनिषदातही एक ऋचा आहे. ही ऋचा अशी -
भयादस्याग्निस्तपति भयात् तपति सूर्यः । भयादिन्द्रश्च वायुश्च मृत्युर्धावति पञ्चम: ॥(क.उप.२.३.३)
याचा अर्थ असा होतो की, परमात्म्याचे भय पंचमहाभूतांमध्ये खोलवर रुजलेले आहे. याच परमेश्वराशी संवाद साधताना आमचे संत मात्र शिरजोरी दाखवू शकतात आणि परमेश्वर त्यात आनंद मानतो ! मजा अशी आहे की, सृष्टी-उत्पत्तीमध्ये परमेश्वर हा पिता तर त्याच्याच ‘एकोऽहं बहुस्यामहः’ या कल्पनेतून त्याची शक्ती ‘माया’ अलग झाली आणि तिच्या ठायी अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान ही अपत्ये उत्पन्न झाली. यांनाच शास्त्राने तम, रज व सत्व आशी नावे ठेवली. या तिघांपासून पंचमहाभूते झाली. म्हणजेच परमेश्वर हा पंचमहाभूतांचा आजोबा ठरला. या आजोबाला ही नातवंडे घावरतात ! ऋषी-संत ही मंडळी, ज्यांना परमेश्वर उमगला, ती तसे पाहता परवा-परवाची शेण्डेफळे ठरतात. म्हणूनच ही शेण्डेफळे परमेश्वराला चिमटे काढू शकतात आणि परमेश्वर त्यांच्या बाललीलांपासून आनंद उपभोगतो.
आनंदाचे काही प्रकार असतात का ? नाही. आनंद हा आनंदच असतो. तथापि, आनंद ज्याच्यामुळे मिळतो, ती कारणे वेगवेगळी असू शकतात. परमेश्वर स्वतःच आनंदस्वरूप असल्याचे वेद-उपनिषदे एकरवाने उद्‍घोषित करतात. आनंद हा आनंद असतो हे जरी खरे असले तरी या आनंदाचे परिमाण, विस्तार तैतिरीय उपनिषदातील वरील ऋचेनंतर लगेच वर्णन केलेला आहे. आनंदाची ही मीमांसा मोठी रंजक आहे.
आनंदाचे परिमाण सांगण्यासाठी प्रथम एका तरुण युवकाचे उदाहरण घेतात आणि तो युवक किती गुणांनी युक्त आहे, ते सांगतात- हा तरुण श्रेष्ठ आचरण करणारा, वेद कोळून प्यालेला, दुसर्‍यावर हुकुमत गाजवण्यात वाकबगार, धष्ट-पुष्ट, पृथ्वीवरील सार्‍या धनाने संपन्न असा हा युवक. म्हणजे या युवकाला मृत्युलोकातले सारे भोग प्राप्त झालेले आहेत. अशा या युवकाला प्राप्त झालेला आनंद ह ‘एक’ आनंद आहे. अर्थातच, तो मनुष्यलोकातला सर्वात महान् आनंद आहे.
मनुष्ययोनीतील अत्युच्च प्रतीचे भोग भोगणारे सत्-शील पुरुष हे श्रेष्ठ योनीत उन्नत होत असतात. या योनींचा उल्लेख हे उपनिषद पुढे करीत जाते आणि मनुष्यलोकीच्या महदानंदाचे ‘एक’ हे परिमाण धरून शतपटीत आनंद मोजून दाखविते. मनुष्ययोनीपेक्षा श्रेष्ठ योनी म्हणजे मनुष्यगंधर्व योनी. त्या योनीत लाभणारा आनंद हा मनुष्यलोकीच्या महदानंदापेक्षा शतपटीने मोठा असतो. त्या पुढची श्रेष्ठ असलेली योनी देवगंधर्वांची. सृष्टीच्या आरंभकाली जे देवतास्वरूप गंधर्वयोनीत उत्पन्न झाले, ते देवगंधर्व होत. मनुष्यगंधर्व योनीतील महदानंदाच्या शतपटीने मोठा आनंद देवगंधर्वयोनीत उपभोगता येतो.
देवगंधर्व योनीपेक्षा श्रेष्ठ असलेली योनी म्हणजे चिरकाल पितृलोकात वास करणार्‍या श्रेष्ठ पितृजनांची. देवगंधर्व योनीत मिळणार्‍या आनंदापेक्षा शतपटीने मोठा आनंद त्या पितृजनांना उपभोगता येतो. चिरलोकातील पितृजनांच्या योनीहून उन्नत योनी सांगितलेली आहे, ती आजानजदेवांची. विशेष पुण्यकर्म केल्यामुळे ही योनी प्राप्त होत असते. पितृलोकात मिळणार्‍या आनंदापेक्षा शतपटीने मोठा आनंद आजानजदेवांना प्राप्त होत असतो.
देवयोनीतील देवांचे वर्ग येथे आपल्याला पाहावयास मिळतात. आजानजदेव हा देवांमधील कनिष्ठ प्रकार. त्यापेक्षा श्रेष्ठ आहे ती कर्मदेवांची योनी. त्यांना आजानजदेवांपेक्षा शतपटीने मोठा आनंद उपभोगता येतो. या देवांपेक्षा श्रेष्ठ योनी आहे ती देवयोनी. या योनीतले देव हे स्वभावसिद्ध देव असतात. त्यांना कर्मदेव उपभोगत असलेल्या आनंदापेक्षा शतपटीने अधिक आनंद उपभोगावयास मिळतो. देवांचा राजा इंद्र. त्याला मिळणारा आनंद देवांना मिळणार्‍या आनंदापेक्षा शतपटीने मोठा असतो तर देवांचा गुरु असणारा बृहस्पती, त्याला प्राप्त होणारा आनंद इंद्राला प्राप्त होणार्‍या आनंदापेक्षा शतपटीने मोठा असतो.
आनंदाची ही मोजदाद अजूनही पुढे चालूच राहते. इंद्रापेक्षा श्रेष्ठ असणार्‍या बृहस्पतीपेक्षा शतपटीने मोठा आनंद प्रजापतींना होत असतो. आणि या प्रजापतींचा पिता असलेल्या ब्रह्मदेवाला त्यांच्यापेक्षा शतपटीने मोठा आनंद प्राप्त होत असतो.
आता या सार्‍या गणिताचा विचार केला तर, मनुष्ययोनीतील सर्वश्रेष्ठ आनंद हा ‘एक’ आनंद आणि दहाव्या पायरीवर उन्नत असलेल्या ब्रह्मास प्राप्त होणारा आनंद किती महान् आहे, हे सांगायचे झाले तर, ‘एकावर अठरा शून्ये’ इतक्या परिमाणाचा तो आनंद ठरतो. हा आनंदही परमोच्च आनंद नव्हे ! (आणि तोसुद्धा खरा आनंद नाही, कारण ब्रह्मदेवही कालाच्या अख्यतारीत मानला जातो. त्यालाही पुनर्जन्म आहे.)
ब्रह्माला मिळणार्‍या महत्-महत्-महत्.... महदानंदाच्या भोगाच्या लालसेने ज्याचे मन ग्रस्त नाही, त्या भोगाला जो तुच्छ समजतो, जो एकमात्र परमानन्दस्वरूप परमेश्वराच्या प्राप्तीचीच करीत असतो, जो वेदांचे रहस्य यथार्थतः जाणत असतो अशा विरक्त पुरुषाला म्हणजे श्रोत्रियाला तो परमानंद स्वये, सुखे प्राप्त होत असतो.
आनंदाचे हे गणित उपनिषद मांडते, ते एवढ्याचसाठी की, पूर्णानन्दस्वरूप परमेश्वराच्या प्राप्तीपुढे हे सारे आनंद तुच्छ होत. निरनिराळ्या योनीतील जीव जो आनंद उपभोगत असतात, तो आनंद परमात्मस्वरूप आनंदाचा केवळ एक कणमात्र असतो आणि अधिकाधिक आनंदाच्या अभिलाषेने जीव आपले जीवन जगण्यासाठी प्रयास करीत असतो. भारतीय विचारांचे हे सार आहे. परमोच्च आनंदाची अशी अभिलाषा एकदा मनात रुजली की, असमाधानाला वाव राहत नाही. मग मनाला भीतीचे ग्रहणही लागत नाही.